शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:39 IST)

कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा – गृहमंत्री ना. अनिल देशमुख

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉक डाऊन’ ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यादरम्यान काही उद्योग आस्थापने सुरु करण्यासाठी शासनाने सूट दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर तथा विभागातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी नागपूर पोलीस विभागाला दिले. कोणीही अनावश्यक बाहेर फिरणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, त्याचप्रमाणे भाजीपाला व अन्नधान्य घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवावी, सोशल डिस्टन्सिंगे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.
 
वीज विभागाच्या विश्रामगृहात गृहमंत्र्यांनी आज परिमंडळनिहाय कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सहआयुक्त रविंद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला व सर्व परिमंडळाचे पोलीस उपायुक्त उपस्थित होते.
 
सील करण्यात आलेल्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित करण्यात यावा, या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, कोणीही उपाशी राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या. बाजार व गर्दीच्या ठिकाणचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करावे असे त्यांनी सांगितले. परिमंडळ तीन मध्ये सतरंतीपुरा, मोमिनपुरा व शांतीनगर हा भाग येत असून या ठिकाणी जास्त खबरदारी घेण्यात यावी, असेही ते म्हणाले. पोलिसांना संसर्ग होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात यावी. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना मास्क पुरविण्यात यावे. पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करावे असेही त्यांनी सांगितले.
 
एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना औषध व जीवनावश्यक वस्तू घरी पुरवण्यासाठी पोलीसांनी सहकार्य करावे, कोरोना साथीच्या या कठीण काळात पोलीस विभागाने देशभरात उत्तम काम केले असून यामुळे नागरिकांमध्ये आदर निर्माण झाला आहे. नागपूर पोलिसांनी अतिशय उत्तम काम केले आहे. कर्तव्यासोबतच सेवा कार्य करुन पोलिसांनी लौकिक प्राप्त केला अशी शाबासकी गृहमंत्र्यांनी दिली.
 
दरम्यान, अग्रसेन भवन, रवी नगर व तुली पब्लिक स्कुल बोखारा येथील निवारागृहास भेट देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तेथील नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अग्रसेन भवन येथे उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाना व मध्य प्रदेश येथील कामगार व विस्थापीत नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असून राहणे, जेवण, मनोरंजन, वैद्यकीय तपासणी व समुपदेशनाची उत्तम व्यवस्था असल्याचे निवारागृहातील नागरिकांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन संपेपर्यंत निवारागृहातच थांबा, प्रशासन तुमची काळजी घेईल असा धीर गृहमंत्र्यांनी त्यांना दिला.