1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (09:14 IST)

आता नागपूर कारागृहात सुद्धा लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
 
यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी.
 
कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल.