1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 2 मे 2020 (08:11 IST)

राज्यात १००८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण ११ हजार ५०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण  ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात २६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर ११  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.  या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.