शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 एप्रिल 2020 (07:13 IST)

कोरोनाबाधितांची संख्‍या वीस हजार पार- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

गेल्या २४ तासांत १४८६ नव्या रुग्णांची भर पडली असून आता देशात २० हजार ४७१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ६५१ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

एका दिवसात ६१८ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा दर १९.३६ टक्के झाला आहे. देशभरात लॉकडाऊन जारी केल्याने अद्यापही समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
देशातील ४०३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर, ६ शहरांत सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. देशभरात मुंबई शहरात सर्वाधिक म्हणजेच तीन हजार रुग्ण असून दिल्लीत २,०८१, अहमदाबादेत १,२९८ तर इंदौरमध्ये ९१५, पुण्यात ६६० तर जयपूरमध्ये ५३७ रुग्ण आहेत. सर्वाधिक ६० टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यात आहेत.