सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (08:58 IST)

सीरम इन्स्टिट्युट: सप्टेंबरपासून स्पुटनिक व्ही लसीचेही उत्पादन करणार

१८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली. पण, त्यामुळे लसींचा पुरवठा अपुरा पडू लागला. सध्या भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना देखील मंजुरी देण्यात आली असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा लवकरच होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सीरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केल्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.  
 
स्पुटनिक व्ही लसीचे भारतात वर्षाला ३० कोटी डोस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह यांनी यासंदर्भात एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील उत्पादनासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.
 
यासंदर्भात सविस्तर माहिती कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सीरम इन्स्टिट्युट यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार भारतात वर्षाला ३० कोटी स्पुटनिक व्ही लसीचे डोस उत्पादित करण्याचा मानस आहे. यापैकी लसीच्या डोसचा पहिली हफ्ता येत्या सप्टेंबर महिन्यात येईल. यासाठी सीरम इन्स्टिट्युटला याआधीच लसीसाठीच्या सेल्स आणि व्हेक्टर सॅम्पल्स मिळाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत स्पुटनिक व्ही लसीसाठी जगातील ६७ देशांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. जगातील ३५० कोटी लोकसंख्या या देशांमध्ये राहाते, असे देखील या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.