सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (13:34 IST)

श्रीदत्तात्रेयांची अष्टके : अष्टक ५ - कसा केला स्वांगे, क्षण न ...

कसा केला स्वांगे, क्षण न लागतां मोचन करी । कृपेनें थोडासा, तरि मजकडे लोचन करी । खुना या नक्राची, तशिच पडली भीड तुजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१॥
अजामेळाचाही, कुटिल रव कानीं झगटला । स्वपुत्राचें नामीं, तुम्हि उगि बळेंची प्रगटला ॥ खर्‍या नामाचा कां दवडुन अभीमान निजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥२॥
मुकाटीही केली, मुनि-वधु-शिळा पावन कशी । श्रिमंतीची खोटी, पुतळी म्हणती बावनकशी । गरीबाचा माथा सतत पदिं घासूनि झिजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥३॥
दीनानाथा आम्हां, तरि त्रिभुवनीं कोण असरा । पिता माता बंधू, तुजविण नसे देव दुसरा ॥ निराधारी एकादशिच गुरुराया ! निरजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥४॥
सुदाम्याला द्या जा, उचित न अम्हां कांचनपुरी । करी इच्छा तें वीजयदशमिचें कांचन पुरीं ॥ अम्ही नाहीं पूर्वी, पृथुकण धनें देव पुजिला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥५॥
न देत्या भक्ताची, तुज कधिं दया येत नव्हती ॥ जशी द्राक्षालागी, रूचिकार दुधें येत नवती ॥ तुम्हीं त्या अवतारीं, खचित लव भाजीस भजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥६॥
उपेक्षा आपेक्षा, नच अवधूता खच्चित रुचे । न तापे तापेंही, सबळ फळ ये खच्चि तरुचें ॥ निरापेक्षी दाता, तुजसम गुरो कोण सजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥७॥
तुझ्या आतिथ्याला, सति अनसूया साच निभली । बहू त्वांही केली, कसुनि तिजला जाचणि भली ॥ छळावें दात्याला, विबुधजन धार समजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥८॥
प्रभो दातृत्त्वाची, सजह तुमच्या मानसिं कला । अधींची होती त्या, वर अनसूयेपाशिं शिकला ॥ आम्हां वाटे चिंतामणि रविप्रकाशें उमजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥९॥
नुपेक्षीतां देसी, म्हणुनी जगतीं ‘दत्त’ म्हणती । कृपेनें तारीले, जड मुढ किती नाहिं गणती ॥ तुझ्या औदार्याचा, त्रिभुवनिं नगारा गरजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१०॥
पित्याची पुत्रांगी, प्रतिरूप गुणाची वसतसे । कुळाचाराचेही, कुलज करिती दीवस तसे ॥ तुम्ही अत्री ऐसे, सम सकल धर्मे परजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥११॥
वसुदेवें चोरी, करूनि हरि नेला पर-गृहीं । हरीला चोरीची, म्हणुनि चट लागे समग्र ही ॥ लपे कुब्जाखोपीं. त्यजुन घरचा उंच मजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१२॥
करी चोरी मारी, नट नर भटालाच ठकवी । सुभद्रा झाला त्या, हंसुनि गुण गाती चट कवी ॥ शिशूपाळाच्या तो कुटिल वचनें फार खजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१३॥
विधीला व्यालासी, नकळे नर नारी नपुंसक । पुराणीं व्यासाचीं, ठळक वचनें तीं न पुसत ॥ तुला बा ! जाणाया, दशशत फणी वेद थिजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१४॥
आम्हां विश्वात्मा तूं, दुर धरूं नको पावचि तरी । दुजा एक्या भिंतीवरि दिसुं नये भाव चितरीं ॥ कृपा विष्णुदासावरि, करि दीनाचा गरजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१५॥
 
शिखरिणी