गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:00 IST)

लक्ष्मीचा जन्म कसा झाला

देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या विषाच्या ज्वाला एवढ्या तीव्र होत्या की त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठात धारण केल्या. मंथनात चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.
 
या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीचा आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूप्रिया, विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाऊ लागले. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे. लक्ष्मीचा रंग गोरा आणि चार भुजा आहेत. तिने किरीट मुकूट आणि दिव्य वस्त्रालंकार धारण केले आहेत. लोक तिला ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानतात. घुबड हे तिच्या वाहनाच्या रूपात आहे. ती स्वभावाने अतिशय चंचल आहे. 
 
कमल थिर न रहीम कही यही जानत सब कोय।
पुरूष पुरातन की वधु क्यूं न चंचला होय।।
 
लक्ष्मी कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. परंतु, ती विष्णू पत्नी असल्यामुळे विष्णूच्या आराधनेबरोबर तिचीही नियमीतपणे आराधना केली जाते. तिथे ती स्थिर रूपात निवास करते. तिचे आसन कमळ असल्यामुळे तिला कमला किंवा कमलासना असेही म्हटले जाते. कार्तिक कृष्णा अमावस्येला दीपावलीच्या रात्री महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी विशेष रूपात विश्वभ्रमणासाठी निघते. महालक्ष्मीची उपासना केल्यामुळे दु:ख, दारिद्रयापासून मुक्ती मिळून ऐश्वर्य प्राप्त होते.