शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

श्री धन्वंतरी पूजन

आश्विन कृष्ण त्रयोदशीला देव-दानवांनी केलेल्या समुद्र-मंथनातून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले. या धन्वंतरींची आज जयंती त्यानिमित्त..

वैद्यकीय व्यावसायिक धन्वंतरी पूजन करतात. आयुर्वेदी चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून आपली जीवनशैली गेल्या हजारो वर्षापासून समृद्ध झाली आहे. आरोग्य, दीर्घायुष्य आणि रोगपरीहारार्थ धन्वंतरी पूजन केले जाते.

धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने या देवतेचे नामस्मरण करून त्यांच्या हातात असलेल्या अमृतकलश, शंख, चक्र, जलौका (जलवा) यांचा उपयोग संपूर्ण स्वास्थासाठी व्हावा, ही या पूजनामागची संकल्पना असावी.

धन्वंतरी पूजाविधी - धन्वंतरीच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस हातभर लांबीचा तेरा धागे असलेला बारीक स्वच्छ सुताचा दोरा बनवून त्यास तेरा गाठी साधारण एक इंच अंतर ठेवून माराव्यात. हा दोर हळद, कुंकू, अष्टगंध, अत्तर यांनी रंगवून सुगंधित करून प्रतिमेस अथवा मूर्तीस घालावा. नेहमीच्या पूजा साहित्याने षोड्पोपचार पूजा करावी. पूजनात पंजिरीचा नैवेद्य असतो. धणे (त्रिदोषध्न), खडीसाखर (पित्तनाशक), वेलची (पाचक), सुंठ (भूक वाढविणारी) धन्वंतरीस प्रिय आहे. पूजेनंतर घरी कोणी आजारी असल्यास तेरा गाठीचा दोर रुग्णाच्या मनगटात बांधावा. अन्यथा हा चांदीच्या डबीत वैद्याने औषध ठेवण्याच्या जागेत सुरक्षित ठेवावा.

डॉ. मुकुंद मोरे