गणेशपुराणात शमीपूजनाची दिलेली कथा
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू मिळवता येत. त्याला शमी नावाची मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. पुढे तारूण्यात शमी व मंदार एकत्र राहू लागले. एके दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागाणपत्य भृशुंडी मुनींचा आश्रम लागला. त्यांच्या भालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती. ती पाहून दाम्पत्याला हसू आले. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी शाप दिला आणि दोघेही वृक्ष झाले. पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर और्व ऋषींनी व शौनकाने घोर तपश्चर्या करून गणरायासा प्रसन्न करून घेतले व शमी आणि मंदार यांना मानवदेह देण्याची प्रार्थना केली. परंतु, भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही, असे मानून गणपतीने शमी व मंदार यांची कीर्ती दिगंत होईल, लोक त्यांची पूजा करतील, असा वर दिला. शौनक ऋषी त्यावर संतुष्ट झाले. पण और्व ऋषी शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहिले. शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात. त्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. शमीपत्र व मंदार पुष्प वाहिल्यास शंकर संतुष्ट होतो, असे मानतात. पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्याच झाडावर ठेवली होती.