गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (08:52 IST)

चंद्रग्रहण 2022: हे चंद्रग्रहण कधी आहे? कुठे-कुठे पाहायला मिळणार?

lunar eclipse
वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण नुकतंच झालं. त्याच्या काही दिवसांतच यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहणही होणार आहे. हे एक खग्रास चंद्रग्रहण असणार आहे.
 
येत्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवार,16 मे रोजी हे चंद्रग्रहण होणार आहे.
 
भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल. तर 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत त्याचा प्रभाव दिसणार आहे.
 
अवघ्या 15-16 दिवसांतच दुसरं ग्रहण असल्यामुळे खगोल अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
यंदाचं पहिलं सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी झालं होतं. हे ग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीच्या वेळी झालं त्यामुळे भारतात ते पाहायला मिळालं नाही.
 
त्याचप्रमाणे आगामी चंद्रग्रहणसुद्धा भारतीय वेळेनुसार दिवसा होणार असल्यामुळे ते भारतातून पाहता येणार नाही.
 
कुठे-कुठे पाहता येईल?
हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी घडणार असल्यामुळे हे भारतातून पाहता येणार नाही.
 
2022 मधलं पहिलं चंद्रग्रहण हिंद महासागर क्षेत्रात अंशतः दिसू शकेल. तर प्रशांत महासागर, अटलांटिक, अंटार्क्टीका, दक्षिण आणि पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातील काही भागांत दिसू शकेल.
 
साधारणपणे ग्रहण दोन प्रकारचे असून तांत्रिकदृष्ट्या दोन ताऱ्यांचा समावेश असलेला एक तिसरा ग्रहण-प्रकारही असल्याचं खगोलशास्त्रज्ञ जुआन काल्रोस बि्यामिन यांनी त्यांच्या इलुस्ट्रेटेड अॅस्ट्रोनॉमी या पुस्तकात लिहिलं आहे.
 
जुआन यांच्या पुस्तकात देण्यात आलेले ग्रहणांचे प्रकार खालीलप्रमाणे -
पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेता-घेता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो.
 
यादरम्यान, चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, त्याला सूर्यग्रहण म्हटलं जातं.
 
तर, सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असं संबोधलं जातात.
 
ग्रहण कोणतंही असो त्याचे 3 प्रकार असतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जातात, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येते, त्यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारचं असतं. तर चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे तीन प्रकार आहेत.
 
या ग्रहणांची आपण सविस्तरपणे माहिती घेऊ -
 
खग्रास चंद्रग्रहण
नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यानंतर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येतो. पण तरीही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.
सूर्य आणि चंद्रग्रहणात फरक काय असा प्रश्न आपल्याला पडला आहे. याचं उत्तर म्हणजे सूर्यग्रहण पृथ्वीवरील विशिष्ट भागातूनच पाहता येऊ शकतं. पण चंद्रग्रहण काही प्रमाणात अख्ख्या जगभरातून पाहायला मिळू शकतं.
 
8 नोव्हेंबर 2022 ला खग्रास चंद्रग्रहण होईल जे भारतातून नीट दिसेल.
 
खंडग्रास चंद्रग्रहण
चंद्राचा फक्त काही पृष्टभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्राच्या इतर भागांवर गडद लालसर किंवा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात.
 
उघडा भाग आणि सावलीखालील भाग यांचं मिश्र स्वरुप तयार होऊन चंद्रावर विविध रंगछटा दिसतात.
 
खग्रास चंद्रग्रहण दुर्मिळ असून दोन वर्षांच्या अंतराने ते दिसू शकतात. मात्र खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून दोन वेळा दिसू शकतं.
 
आगामी खंडग्रास चंद्रग्रहण 18-19 नोव्हेंबर 2021 रोजी दिसेल. उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काही प्रमाणात युरोप तसंच आशिया खंडांमध्ये ते पाहिलं जाऊ शकतं.
 
छायाकल्प चंद्रग्रहण
या ग्रहणप्रकारात पृथ्वीची किंचित सावली चंद्रावर पडलेली असते. ती अतिशय पुसट असू शकते. मानवी डोळ्यांना ते चटकन लक्षात येईल इतकंही प्रभावी नसतं.
 
अतिशय छोट्या स्वरूपाचं हे ग्रहण असतं. कधी-कधी तर असे चंद्रग्रहण कॅलेंडरमध्ये नोंदवलेलेही नसतात.