रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: मास्को , शुक्रवार, 8 जून 2018 (14:10 IST)

6 किलो सोन्याची आहे विश्वचषकाची ट्रॉफी

World Cup Trophy
फिफा विश्वचषक 2018चे काही दिवसातच मॉस्कोमध्ये सुरुवात होणार आहे. जगभरातील 32 दमदार संघ 14 जूनपासून विश्वविजेता होण्यासाठी पूर्ण अनुभव पणाला लावणार आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. 
 
या ट्रॉफीचे नेहमीच सर्वांना आकर्षण असते. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे. या ट्रॉफीची उंची 36 सेंटीमीटर असून ही ट्रॉफी 6 किलो 175 ग्रॅमच्या 18 कॅरेटच्या सोन्यापासून तयार करण्यात आली आहे.
 
कधीपासून रंगणार महामेळा?
फिफा विश्वचषक 2018 चे उद्‌घाटन रशिया आणि सौदी अरब यांच्यातील सामन्याने होणार आहे. 14 जूनपासून सुरू होणार्‍या या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याची फायनल 15 जुलैला खेळली जाणार आहे. पण आताच या सोन्याच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे सांगणे कठीण आहे.
 
48 वर्षांआधी 1970 पर्यंत फुटबॉल विश्वचषक जिंकणार्‍या संघाला 'जुलेस रिमेत ट्रॉफी' ही ट्रॉफी दिली जायची. पण 70 मध्ये तीनदा विश्वचषक जिंकणार्‍या ब्राझीलला ही ट्रॉफी कायमची देण्यात आली. 
 
1974 मध्ये जागतिक फुटबॉलची सर्वात मोठी संस्था असलेल्या फिफाने आपल्याच नावाने नवीन ट्रॉफी तयार केली. 
 
चोरी झाली होती पहिली ट्रॉफी  
कोणत्याही विजेत्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. पण ब्राझीलने जेव्हा 1970 मध्ये तिसर्‍यांदा हा किताब मिळवला, तेव्हा त्यांना खरी ट्रॉफी नेहमीसाठी देण्यात आली. ही ट्रॉफी ब्राझील संघाने एका बुलेटप्रुफ कपाटात ठेवली. 1983 मध्ये काही लोकांनी ही ट्रॉफी चोरी केली. नंतर याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली होती. पण ती ट्रॉफी पुन्हा मिळाली नाही.
 
असे सांगितले जाते की, ही ट्रॉफी त्या लोकांनी वितळवली आणि सोने विकले. त्या ट्रॉफीचा केवळ खालचा भाग मिळाला होता. हा भाग फिफाने आपल्या मुख्यालयात ठेवला होता.