शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2016 (11:49 IST)

चेकमेट झालेला "वझीर"

दानिश अली (फ़रहान अख्तर) हा एक प्रमाणिक ए.टि.एस ऑफिसर आहे. त्याची पत्नी रुहाना (अदिती राव हैदरी) ही कथक नर्तकी आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे आणि त्यंच्या प्रेमाचं प्रतिक म्हणजे त्यांची गोड गोंडस मुलगी नुरी. हे छोटंसं कुटुंब सुखी कुटुंब आहे. वझीरचं कथानक दिल्लीमध्ये घडतं. यांचं आयुष्य अगदी सुरळीत आहे. पण... एके दिवशी दानिश आपल्या कुटुंबासोबत कारमधून जात असतो. तेव्हा रुहाना घुंगरु दुरुस्त करण्यासाठी गाडीतून उतरते. नुरी व दानिश गाडीतच बसलेले असताना दानिशला अतिरेकी रमीझ गाडीतून जाताना दिसतो. दानिश त्याचा पाठलाग करतो. रमीझ अचानक दानिशवर हल्ला करतो. त्या शुट आऊटमध्ये दानिशची मुलगी नुरी दगावते आणि रमीझ तेथून पळ काढतो. आपल्या मुलीच्या मरणाला आपला पती दानिशच जबाबदार आहे अशी समजूत रुहाना करुन घेते व त्यांच्या नात्याला तडा जातो. ते वेगळे राहू लागतात. दानिश त्याचा मित्र, सरताजच्या घरी येतो. सरताजला खबर मिळते की रमीझ गाझियाबादमध्ये आहे. सरताज दानिशला झोपेच्या गोळ्या घ्यायला सांगतो आणि रमीझला पकडायला निघतो. गाझियाबादमध्ये अतिरेकी व पोलिसांमध्ये घमासान फायरींग होते. तेव्हा तिथे दानिश येतो व रमीझला ठार मारतो. सर्वांनाच आश्चर्य होतं की दानिश तिथे कसा आला. दानिशच्या या वागणूकीमुळे त्याला मेडिकल लिव दिली जाते. एका रात्री दानिश त्याच्या मुलीच्या कबरीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना स्मशानाच्या दरवाजातून गाडीची हेडलाईट चमकते. दानिश गडीचालकाला ओरडून येथून जायला सांगतो. गाडीचालक जातो. दुसर्‍या दिवशी दानिश त्या गाडीचालकाच्या घरी येतो. कारण स्मशानात त्याला गडीचालकाचं पॉकेट सापडलं असतं. तो गाडीचलक म्हणजेच ओंकारनाथ धर (अमिताभ बच्चन). ओमकारनाथ धर यांना एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागतात. ओमकारनाथ धर मुलांना चेस शिकवतात. दानिशच्या मुलीलाही त्यांनी चेस शिकवलेलं असतं. ओमकारनाथ दानिशलाही चेस शिकवतात. या दरम्यान दोघांत घट्ट मैत्री होते. ओमकारनाथ दानिशला आपली व्यथा सांगतात. त्यांची २२ वर्षांची मुलगी मंत्री कुरेशी (मानव कौल) याच्या मुलीला चेस शिकवायला जात असते. तिथे ओमकारनाथ यांच्या मुलीला अपघात होतो आणि ती हे जग सोडून जाते. ओमकारनाथ यांना खात्री आहे की हा अपघात नसून खून आहे. दानिश त्यांना मदत करण्याचं वचन देतो आणि कथानकामध्ये वझीरची (नील नितिल मुकेश) एंट्री होते. तो ओमकारनाथ यांना त्रास देतो, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतो. आता दानिशची वझीरला शोधण्याची मोहिम सुरु होते. दानिश वझीरपर्यंत पोहोचू शकेल का? ओमकारनाथ यांच्या मुलीला अपघात झाला की तिचा खून झाला? दानिश ओमकारनाथ यांची कशप्रकारे सहायता करु शकेल? या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर चित्रपट पहावा लागेल.
 
हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. तरी सुद्धा यातील सस्पेन्स नवीन वाटत नाही. चित्रपट सुरु असताना सस्पेन्स कळतं. मला तरी जाणवलं की नेमकं सस्पेन्स काय आहे. बुद्धिबळाच्या खेळावर आधारीत असा हा बुद्धिमान चित्रपट काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला आहे असं म्हणता येणार नाही. चित्रपटाची कथा चंगली आहे. पहिल्या सीनपासून चित्रपट पाहण्याची उत्सुकता येते. पण चित्रपटाचा गाभा असलेलं रहस्य हे पटकथेच्या कमकूवत मांडणीमुळे प्रेक्षकांना जाणवल्यामुळे मजा निघून जाते. अर्थात हे रहस्य सर्वांनाच जाणवेल असं नाही. ज्यांना ते रहस्य जाणवणार नाही त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. सुंदर सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक व अप्रतिम अभिनय यामुळे कथा फुलुन येते. फ़रहान अख्तरने अतिशय देखणा अभिनय केला आहे. एक प्रामाणिक व शूर ए.टि.एस ऑफिसर आणि हरलेला बाप व आपल्या पत्नीच्या नजरेतून उतरलेला नवरा या तिन्ही गोष्टी फरहानने आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर व्यवस्थित दाखवल्या आहेत. चित्रपटात अदिती राव खुपच सुंदर दिसली आहे. सबंध चित्रपट गंभीरतेने पुढे जात असताना अदितीचं सौंदर्य आणि तिच्या नृत्याचे काही छोटे छोटे सीन मन मोहून टाकतात. पण दिग्दर्शकाने नृत्यावर अधिक प्रकाश न टाकल्यामुळे ती उगाच नाचते असं वाटतं. मानव कौल यांनी मुस्लिम मंत्र्याची भुमिका सुरेख निभावली आहे. मानव यांचे डोळे खुपच बोलके आहेत. बीग बी अमिताभ बच्चन यांनी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट अभिनय केला आहे. बच्चन यांच्या अभिनयाबद्दल फारसं लिहिणं गरजेचं नाही. केवळ एकच शब्द, अप्रतिम... जॉन अब्राहिम आणि नील नितिन मुकेश यांच्या लहान भुमिकाही चांगल्या झाल्या आहेत.       
 
दानिश ओमकारनाथ यांना सहायता करण्यासाठी एवढा पुढाकार का घेतो, हे कळत नाही. तो आपल्या मुलीला वाचवू शकला नाही. म्हणून तो ओमकारनाथ यांची सहायता करुन स्वतःच्या मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असावा. चित्रपट पाहताना सतत वाटत राहतं की जरा वेगळं करता आलं असतं तर बरं झालं असतं. लेखन जर अजून सशक्तपणे झालं असतं तर चित्रपटाला रंगत आली असती. लेखनाची बाजू कमकुवत असल्यामुळे चित्रपट पडतो. पण एकदा हा चित्रपट पहायला हरकत नाही. शतरंज के खिलाडी नेमका कशाप्रकारे खेळ खेळतात? या खेळात कोण चेकमेट होतं? कोण वझीर आहे? कोण राजा आहे आणि कोण प्यादा आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावाच लागेल. तरी मी या चित्रपटाला अडीच स्टार देतो. कारण फसलेल्या कथानकामुळे "वझीर" चित्रपट चेकमेट झाला आहे असं मला वाटतं.
 
रेटिंग्स : २/५ 
 
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री