शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 3 मे 2010 (16:29 IST)

असा बनला कसाब दहशतवादी

मोहम्मद अजमल आमीर कसाब हा मूळचा पाकिस्तानातील फरिदकोट गावचा. त्याचे वडिल दही पुरी विक्रेते आहेत, तर त्याचा मोठा भाऊ अफझल हा लाहोरमध्ये मजूरी करतो. त्याची मोठी बहिण रूकय्या हुसेनचे गावातच लग्न करून दिले आहे. लहान बहिण सुरय्या आणि भाऊ मनीर फरीदकोटमध्येच आई-वडिलांसोबत रहातात.

फरिदकोट गाव तसे अगदीच गरीब आहे. बहुतांश लोक गरीबच आहेत. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही आणि म्हणूनच पैसा नाही, अशी येथील स्थिती आहे. म्हणूनच येथील अनेक लोक दहशतवादाकडे वळाले आहेत. दहशतवादी संघटना या त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणार्‍या ठरल्या आहेत. अगदी फरिदकोटच्या बाहेरच एका भींतीवर 'जिहाद करा, जिहाद करा' असे आवाहन मर्कझ दावत उल इर्शाद या लष्कर ए तोयबाच्या पालक संघटनेने केल्याचे लिहिले आहे.

कसाबही घरच्या गरिबीमुळे लाहोरला जाऊन भावासोबत राहू लागला. पण नंतर मजुरी काही मानवली नाही. फरीदकोटला परत आला. पण रिकामा बसून राहिल्याने घरी वडिलांशी वाजले आणि २००५ मध्ये घर सोडून निघून गेला. घर सोडायचे कारण होते, वडिलांनी इदनिमित्त नवे कपडे घेऊन दिले नाही हे.

त्यानंतर मग पैसे कमवायचे भलते सलते मार्गही त्याच्या लक्षात येऊ लागले. हळूहळू छोट्या छोट्या गुन्ह्यात तो दिसू लागला. त्याचा मित्र मुझफ्फर लाल खान हा त्याचा भागीदार. छोट्या चोर्‍यांकडून मग तो मोठ्या दरोड्यांकडे वळाले. पण त्यासाठी शस्त्रेही हवी होती. मग २१ डिसेंबर २००७ ला बकरी ईदच्या दिवशी ही जोडी रावळपिंडीत शस्त्रे खरेदीसाठी गेली. तिथे त्यांची भेट लष्कर ए तोयबाची राजकीय शाखा असलेल्या जमात उद दवाच्या काही सदस्यांशी झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग हे दोघेही सरळसरळ लष्कर ए तोयबात सामील झाले. त्यासाठी मर्कझ तालिबा इथे त्यांचे प्रशिक्षणही झाले. काहींच्या मते कसाबच्या वडिलांनीच त्याला दहशतवादाकडे वळवले. घरी बसून काही काम करत नाही त्यापेक्षा तिकडे जाऊन पैसे कमव या धोशापोटी त्याला लष्कर ए तोयबाच्या हाती देऊन टाकले. परंतु, एका मुलाखतीत त्याच्या वडिलांनी मी माझ्या मुलाला कधीही विकले नाही, असे सांगत त्यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.

मुंबई हल्ल्याच्या सहा महिने आधी कसाब आपल्या गावी आला होता. जिहादला जातो आहे, म्हणून त्याने म्हणे आईकडून आशीर्वादही घेतला होता. त्याच दिवशी गावातल्या काही मुलांना कुस्तीच्या करामतीही दाखवल्या.

काहींच्या मते लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर लखवीने कसाबच्या मोबदल्यात त्याच्या कुटुंबियांना दीड लाख रूपये दिले. काहींच्या मते ही रक्कम लाखाच्याही आत होती. खरे खोटे तेच जाणोत. पण कसाब दहशतवादी बनला खरा.

त्यानंतर तो गेला तो थेट लष्कर ए तोयबाने ठेवलेल्या प्रशिक्षण शिबिरात. त्याच्याबरोबर २४ जण होते. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे हा ट्रेनिंग कॅम्प होता. तिथे जवळच असलेल्या मंगला डॅमवर त्यांना समुद्री हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेनिंगचेही विविध प्रकार होते, मानसिक, मुलभूत, अद्ययावत आणि कमांडो. मानसिक ट्रेनिंगमध्ये इस्लामिक शिकवण त्याच्या डोक्यात भरण्यात आली. मुस्लिमांवरील कथित अत्याचारांशी त्याचा परिचय घडविण्यात आला. एडवान्स्ड ट्रेनिंग त्याला पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त अधिकार्‍याच्या उपस्थितीत देण्यात आले. यात शस्त्रे कशी चालवावीत आणि स्फोटके कशी हाताळीत हे शिकविण्यात आले. कमांडो ट्रेनिंग हा यातला महत्त्वाचा भाग होता. त्यात मरीन कमांडोच्या ट्रेनिंगचा सहभाग होता.

या ट्रेनिंगमध्ये २५ जण सहभागी होते. त्यातल्याच दहा जणांना मुंबई हल्ल्यासाठी निवडण्यात आले. त्यांना पोहण्यापासून- तरण्यापर्यंत, उच्च क्षमतेची शस्त्रे, स्फोटके हाताळण्यापासून ते त्यांचा वापर करण्यापर्यंत ट्रेनिंग देण्यात आले. त्याचा दर्जाही उच्च होता. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचे आणि लष्कराचे अधिकारीही या प्रशिक्षणात सहभागी होते, असा अमेरिकी संरक्षण विभागातील एका माजी अधिकार्‍याचा दावा आहे. या सर्व हल्लेखोरांना मुंबईतील ताज महल हॉटेल, ओबेरॉय, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊस येथील नकाशे, फोटो देण्यात आले होते.