शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. G20 शिखर परिषद
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (22:33 IST)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा : संपूर्ण हॉटेलचं बुकींग, रक्ताच्या पिशव्या, स्वतःचा शेफ आणि बरंच काही..

Modi Biden
भारतात होऊ घातलेल्या G20 परिषदेसाठी जगभरातील आघाडीच्या देशांचे प्रमुख येणार आहेत. यामुळेच दिल्लीमध्ये सुरक्षेच्या अत्यंत कडक उपाययोजना केल्या गेल्यात.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे तर येतच आहेत, पण भारतात येताना ते त्यांची संपूर्ण संरक्षण यंत्रणाच सोबत घेऊन येतायत.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा यंत्रणेवर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनवले गेले आहेत.
 
या सुरक्षा यंत्रणेबाबत पडद्यावर बघताना किंवा ऐकताना हे सगळं काल्पनिक वाटत असलं तरी ते तितकंच खरंही आहे.
 
राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेमध्ये अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसची महत्त्वाची भूमिका असते. 1865 मध्ये या सुरक्षा एजन्सीची स्थापना करण्यात आलेली होती. मात्र 1901 पासून या एजन्सीला राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली गेली.
 
या एजन्सीमध्ये महिलाही असतात आणि तिथे काम करणाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण हे जगातलं सगळ्यांत कठीण प्रशिक्षण समजलं जातं.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जगातले सगळ्यांत शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष मानलं जात असलं तरी त्यांना या सिक्रेट सर्व्हिसची परवानगी मिळाल्याशिवाय काहीही करता येत नाही. त्यांची इच्छा असली तरी त्यांना कुठेही एकट्याने जाता येत नाही.
 
जर समजा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एखाद्या देशाचा दौरा करायचा असेल, तर सिक्रेट सर्व्हिस सुमारे तीन महिने आधीपासूनच त्यांचं काम सुरु करते.
 
राष्ट्राध्यक्ष एका बहुस्तरीय सुरक्षा कवचामध्ये कुठेही जात असतात. ही सुरक्षा यंत्रणा अतिशय कठोर असली तरी याचा खर्चदेखील तितकाच मोठा आहे.
 
एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही 1865 मध्ये अब्राहम लिंकन, 1881 मध्ये जेम्स गारफिल्ड, 1901 मध्ये विल्यम मॅककिन्ले, 1963 मध्ये जॉन एफ केनेडी अशा चार राष्ट्राध्यक्षांच्या हत्या आजवर झालेल्या आहेत.
 
यामुळेच अमेरिका त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत एवढी गंभीर का आहे हे आता तुम्हाला कळलं असेल.
 
या सुरक्षा यंत्रणेमध्ये नेमके कोणकोणते घटक असतात ते आपण पाहूया.
 
राष्ट्राध्यक्षांना त्रिस्तरीय सुरक्षा दिली जाते. पहिल्या कवचामध्ये संरक्षण विभागाचे एजंट, मध्यभागी सिक्रेट सर्व्हिस एजंट आणि सगळ्यांत बाहेच्या कवचामध्ये पोलीस असतात.
 
आता जो बायडन दिल्लीत येत आहेत, त्यामुळे दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यादेखील त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केल्या जातील. जे या यंत्रणेचे सर्वांत बाहेरचे म्हणजेच चौथे सुरक्षा कवच असेल.
 
ज्या देशात राष्ट्राध्यक्षांचा दौरा असतो त्या देशात सिक्रेट सर्व्हिस आणि व्हाईट हाऊसचे कर्मचारी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच जातात आणि तिथे असणाऱ्या स्थानिक संस्थांसोबत ते काम करू लागतात. त्या त्या देशातील इंटेलिजन्स ब्यूरोसोबत मिळून व्हीव्हीआयपी सुरक्षा यंत्रणा बनवली जाते.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठे राहणार हेदेखील सिक्रेट सर्व्हिसमार्फतच ठरवलं जातं. जर ते एखाद्या हॉटेलमध्ये राहणार असतील तर त्या हॉटेलचीही कसून तपासणी केली जाते, तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाते.
 
यासोबतच इतरही अनेक उपाय करावे लागतात. ज्या विमानतळावर राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या विमानाचा ताफा उतरणार असतो तिथे मोठी एअर स्पेस निर्माण केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानातून प्रवास करतात त्याला एअरफोर्स वन असं म्हणतात.
 
मात्र विमानांच्या ताफ्यामध्ये 6 बोइंग आणि C17 विमानांचा देखील समावेश असतो. या ताफ्यात हेलिकॉप्टरही असतं.
 
राष्ट्राध्यक्ष ज्या गाडीतून प्रवास करणार असतात त्या लिमोजीन गाड्या, कम्युनिकेशन इक्विपमेंट, आणि अमेरिकेचे इतर सुरक्षा अधिकारीदेखील राष्ट्राध्यक्षांसोबत प्रवास करत असतात.
 
सिक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक संस्था मिळून राष्ट्राध्यक्ष कोणत्या मार्गाने प्रवास करतील हे ठरवत असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतर कोणत्या मार्गांचा वापर केला जाऊ शकतो याचाही आढावा घेतला जातो. एखादा हल्ला झाल्यास सुरक्षित जागा कोणत्या असाव्यात हेदेखील तपासलं जातं.
 
राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी राहतात तिथून ट्रॉमा हॉस्पिटल दहा मिनिटांच्या अंतरावर आहे का हे तपासलं जातं. आजूबाजूंच्या दवाखान्यांची यादी बनवली जाते.
 
या सगळ्या दवाखान्याच्या बाहेर एक एजंट तैनात केला जातो, आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करता यावा म्हणून ही व्यवस्था केलेली असते.
 
एवढंच काय तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही घडल्यास रक्ताची अडचण येऊ नये म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाशी मिळणाऱ्या रक्ताच्या पिशव्या देखील सोबत ठेवल्या जातात.
राष्ट्राध्यक्ष येण्याची तारीख जवळ आली की अमेरिकेचे एजंट आधीच त्या देशात जातात आणि राष्ट्राध्यक्षांच्या मार्गावरील प्रत्येक थांबा तपासला जातो.
 
ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले असतात त्याजवळ असणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्या हटवल्या जातात.
 
वेगवेगळ्या संकटात काय करायला हवं याची रंगीत तालीमही घेतली जाते.
 
कॅमेरा आणि रेकॉर्डिंग
राष्ट्राध्यक्ष हॉटेलमध्ये ज्या मजल्यावर थांबणार असतात तो संपूर्ण मजला आणि त्याच्या वरचा आणि खालचा मजला रिकामा केला जातो. राष्ट्राध्यक्षांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशिवाय तिथे कुणालाही थांबता येत नाही.
 
ज्या खोलीत ते थांबणार असतात ती खोली तपासली जाते. तिथे एखादा छुपा कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग यंत्र तर नाही ना हे स्कॅनरद्वारे तपासलं जातं. त्या खोलीतला टीव्ही आणि मोबाईल काढून टाकला जातो. तिथे बुलेट प्रूफ कवच बसवलं जातं.
 
राष्ट्राध्यक्षांचे जेवण आणि ते जेवण बनवणारे कर्मचारीदेखील त्यांच्या सोबत येतात. फक्त हेच कर्मचारी जेवण बनवतात आणि सिक्रेट सर्व्हिसच्या निगराणीखालीच हे काम केलं जातं.
 
अमेरिकेची क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची यंत्रणा असलेली एक ब्रिफकेस बाळगणारा सैन्यातील एक अधिकारी नेहमी राष्ट्राध्यक्षांच्या सोबत प्रवास करत असतो आणि त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी देखील सिक्रेट सर्व्हिसला दिली गेलीय.
 
राष्ट्राध्यक्ष केवळ त्यांच्या 'द बिस्ट' नावाच्या लिमोजीन गाडीतूनच प्रवास करतात. ही एक अत्याधुनिक गाडी असते. ही गाडी बुलेटप्रूफ तर आहेच पण तिच्यामध्ये इतरही अनेक सुरक्षा यंत्रणा असतात.
 
स्मोक स्क्रीन, अश्रुधुराची यंत्रणा, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी नाईट व्हिजन यंत्रणा अशा अनेक गोष्टी या गाडीत असतात. रासायनिक हल्ला झाला तरीही त्यातून वाचण्यासाठीची यंत्रणा या गाडीमध्ये असते, याच गाडीत एक ग्रेनेड लाँन्चर देखील बसवलेलं असतं.
 
एखादा हल्ला झाल्यास काही क्षणातच गाडी 180 डिग्री मध्ये वळवता येण्याचं प्रशिक्षण घेतलेले ड्रायव्हरच ही गाडी चालवतात.
 
2015 मध्ये, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. भारतीय परंपरेनुसार ते भारताच्या राष्ट्रपतींसोबत कार्यक्रमस्थळी येणं अपेक्षित होतं पण ते मात्र त्यांच्या द बिस्ट मधूनच तिथे आले.
 
मात्र त्यांनी त्यादिवशी एक सिक्युरिटी प्रोटोकॉलसुद्धा मोडला होता. सिक्रेट सर्व्हिसच्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोकळ्या हवेच्या ठिकाणी राहू शकत नाहीत. ओबामा मात्र तब्बल दोन तास तिथे थांबले होते.
 
ही सगळी माहिती अजिबात गुप्त राहिलेली नाही. याआधी सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत.
 
यूएस सिक्रेट सर्व्हिसमध्ये 23 वर्षांपासून विशेष एजंट म्हणून कार्यरत असलेल्या जोसेफ पेट्रो यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्यांच्या व्यतिरिक्त, रोनाल्ड केसलर यांनी 100 हून अधिक सिक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या मुलाखती घेऊन ‘इन द प्रेज़िडेंट्स सिक्रेट सर्विस’ नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेंव्हा एखाद्या देशाचा दौरा करतात तेव्हा त्यांची व्यवस्था करण्यामध्ये हजारो लोक गुंतलेले असतात. व्हाईट हाऊसचं वार्तांकन करणाऱ्या एका बीबीसी रिपोर्टरने लिहिलं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा प्रवास करतात तेव्हा संपूर्ण जग थांबलेलं असतं.
















Published By- Priya Dixit