शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

या नाचत रंगणी गणुबा हो!

विघ्नहर्ता श्री गणेश हा सकल कलांचा अधिष्ठाता. लोककलांचा लोकनायक या गणेशाचे संकीर्तन केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अवघ्या भारतातील लोककलावंतांनी वेगवेगळय़ा प्रकारे केले आहे. कधी नुसतंच संकीर्तन, तर कधी साक्षात गणपतीचं सोंग. श्रीगणेश ही यक्ष कुळातील देवता. या गणेशाचे संकीर्तन कोकणातील डबलबारी भजनात होते. चित्रकथी, दशावतार, नमनखेळे, जाखडी यांसारख्या लोककलाप्रकारांतून होते. तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील भजन, भारूड, लळित अशा भक्तिनाटय़ामधून होते.

ढोलकी फडाच्या तमाषातील लोककलावंतांचा गणेष म्हणजे साक्षात सखाच! अगदी कृश्णासारखाच सखा. रंगस्थळी विघ्न येऊ नये म्हणून या विघ्नहर्त्याची पूजा तमाषात अगदी सुरूवातीलाच होते. इतकेच काय तर गणाने उत्तरही दिले जाते. 'गणपती नाचून गेल्यावरती, षेंदूर ठेवला कोणासाठी?` असा सवाल पठ्ठे बापूरावांनी भाऊ फक्कड यांना केला असता त्यांनी उत्तर दिले ते गणातूनच, 'गणपती नाचून गेल्यावरती षेंदूर वाहू यक्षिणीप्रति.`

गणपती ही यक्षकुलातील देवता. हे पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड अषा तमाषा रचनाकारांनाही ज्ञात होते. भारूडातील गणपती नाचत येतो. या नाचणार्‍या गणपतीचे स्तवन अभंगाच्या रूपाने सुरू होते, ते असे -
'' नाचत आले हो गणपती,
पायी घागुर्‍या वाजती``
दशावतारातील गणपतीच्या आगमनाच्यावेळी गणेशाच्या पदासह सूत्रधार भटजीचे संवाद रंगतात, ते असे -
सूत्रधार : ऐसी गजवदनाची धीग् धीग् धा धीन्न धा।
ऐसी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची हो।
म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो।
गणपती तुझे नाम स्मरणे हो।
हे जिताम ता थैय्य ता।

भटजी : (प्रवेशून) वरया वरया वरया हो।

सूत्रधार : अहो भटजी महाराज, वरया वरया हय़ाचा भावार्थ कसा हो। ??

भटजी : अहो, ही समोर बसलेली जनता दु:खरूपी भवसागरात डुबते आहे.... त्यांनी
तरून वर यावे म्हणून मी वरया वरया असे म्हणालो.


सूत्रधार : अहो भटजी महाराज ...... आज तुम्ही इथे कसे?
भटजी : त्याचे असे झाले, मी चाललो होतो दक्षिणेकडून उत्तरेकडे ..... वाटेत ऐकले की
प्रत्यक्ष श्रीगणेषाचे आगमन इथे झालेले आहे. तेव्हा म्हटले अनायसे संधी
चालून आलेली आहे. दक्षिणा मिळेल म्हणून आलो.

सूत्रधार : मग आता वेळ कषाला ? देवाचे पूजा करा.
भटजी : महागणधिपते चंदनम् समर्पयामी ।
महागणधिपते अक्षताम समर्पयामी ।
महागणधिपते संगीत बत्तीम् समर्पयामी।
स्नान झाले, पूजा झाली. पण नैवेद्य आणवयास विसरलो.

सूत्रधार : कसले भटजी तुम्ही?
भटजी : काही हरकत नाही. आज आहे देवाची जत्रा, समोर सर्व बाजार भरलेला आहे.
अनेक पदार्थांची दुकाने आलेली आहेत. तेव्हा सर्व बाजारालाच पाणी सोडतो झाले.
खा देवा खा भजी खा। खा देवा खा लाडू खा।
भुईमूगाच्या शेंगाम् समर्पयामी । खाड खाडय़ा लडवाम् समर्पयामी ।
गाठल्याम समर्पयामी।
चकल्याम समर्पयामी।
भांडाराम समर्पयामी।
सूत्रधार : भांडाराम समर्पयामी याचा भावार्थ काय?
भटजी : भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंचपक्वान्ने करतात. त्यात एक
वाटोळासा पदार्थ असतो.

सूत्रधार : त्याला मोदक असे म्हणतात.

भटजी : त्याला उद्देषून भांडाराम समर्पयामी असे म्हणालो.


गणेषाची मोहिनी विविध गणांतून व्यक्त होते. असे अनेक गण शाहीर राम जोशी, सगन भाऊ, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, दगडू साळी अशा रचनाकारांनी रचले आहेत. ते असे-

आदी गणाला रणी आणला हो।
नाही तर रंग पुन्हा सुना-सुना।
माझ्या मनीचा मी तू पणाचा।
जाळून केला चुना-चुना।
पठ्ठे बापूराव कवी कवनाचा।
हा एक तुकडा जुना-जुना।

आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा।
मान मिळविला छत्र चौरीचा ।।धृ।।
मंडप दिधला नवरा नवरीचा।
दिवा लाविला चंद्रसूर्याचा।
नवलक्ष तारा करीतो फेरा।
मेरू भोवती दिन रात्रीचा।।१।।
खंडोबाच्या जागरणाचा प्रारंभ हादेखील गणानेच होतो. हा गण असा-
आज म्या गण नमिला।
मल्हारीच्या माळसा बानूला।
तुझ्या गणाची आवड मजला।
लागितो चरणाला।
बुद्धी दे मोरेश्वरा तुझे गुण गायला।

लोककलेतील गणांची ही अशी विविध रूपे आपले मन मोहून टाकतात.