शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 14 एप्रिल 2014 (14:58 IST)

गुजरात मोदींचा, फायदा भाजपचा

गेली 25 वर्षे गुजरात भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली आहे. भारतात 1989 साली काँग्रेसचा पराभव होऊन देशात जनता दलाचे सरकार आले. त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपने गुजरात लोकसभेच्या 26 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या तर जनता दल 11 जागांवर विजयी झाले. त्या निवडणुकीपासून 1999 पर्यंत काँग्रेसला राज्यातील लोकसभेच्या दहा जागांचा आकडा ओलांडता आला नव्हता. 2004 मध्ये देशातील राजकारण बदलले आणि काँग्रेसने गुजरातमध्ये 12 जागा जिंकल्या. तेव्हा भाजपला 14 जागा मिळाल्या होत्या. गेल्या लोकसभेत भाजपचे 15 आणि काँग्रेसचे 11 खासदार निवडून आले. लोकसभेप्रमाणेच गुजरात विधानसभेतही भाजपचा प्रभाव दिसून येतो. 1990 साली भाजपला विधानसभेत सत्ता मिळाली. राज्यात जनता दल आणि भाजपचे युती सरकार अस्तित्वात आले. 1995 मध्ये भाजपला गुजरातमध्ये स्वतंत्रपणे सत्ता मिळाली. तेव्हापासून गेल्या विधानसभेत म्हणजे 2012 पर्यंत गुजरातमध्ये भाजपची सत्ता अबाधित आहे. 

1990 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नरेंद्र मोदी हे संघटन कौशल्य असणारा आणि शहरी भागातील लोकप्रिय वक्ता म्हणून गुजरातमध्ये प्रसिद्ध होते. 1995 पासून मोदींचा गुजरात सरकारमध्ये प्रभाव वाढू लागला. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे भाजपच्या यशाचे शिल्पकार बनले. 2001 साली मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मोदी विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा केलेल्या 2002 च्या गुजरात दंगलीनंतर भाजपला राज्यात सर्वाधिक म्हणजे 127 जागा मिळाल्या. त्यानंतरच्या दोन्ही विधानसभेत भाजपने 117 आणि 115 जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला या तीन निवडणुकात 51, 59 आणि 61 आमदार निवडून आणता आले. आकडेवारी पाहिली तर गुजरातचे मतदार विधानसभा आणि लोकसभेत वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करताना दिसतात. 

सलग तीनवेळा विधानसभा जिंकणारे आणि 14 वर्षे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी म्हणजे गुजरात भाजप असे समीकरण तयार झाले आहे. गेल्या लोकसभेत भाजपने त्यांच्यावर महाराष्ट्र, गुजरात इ. 78 जागांची जबाबदारी सोपविली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पक्षाने त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले. गेली काही वर्षे मोदी यांनी जाणीवपूर्वक ‘कट्टर हिंदुत्ववादी’ ही आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. त्या जागी गुजरातचा विकास हा मुद्दा पुढे आणला गेला. हेच विकासाचे मॉडेल संपूर्ण भारतात लागू करणे हा भाजपचा यावेळचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. वोट तमारो, वट गुजरातनो म्हणजे मत तुमचे- अभिमान गुजरातचा यावर भाजपचा प्रचार केंद्रित झाला आहे. या परिस्थितीत गुजरात लोकसभेच्या निवडणुकात भाजपविरुद्ध काँग्रेसने आव्हान स्वीकारले आहे. गेल्या लोकसभेत भाजपपेक्षा काँग्रेसला 4 जागा आणि 3 टक्के मते कमी पडली होती. राज्यातील प्रादेशिक विभागानुसार पहिले तर सौराष्ट्र आणि दक्षिण भागात काँग्रेस आणि भाजपला समान जागा आहेत.

ऋतुराज बुवा