शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मे 2014 (13:43 IST)

नवा गडी नवे राज्य !

भारतीय जनता पक्षात सध्या नवा गडी नवा राज्य हा खेळ सुरू आहे. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून नव्या लोकांना गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे. हा सर्व खेळ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या ताब्यात भाजप गेल्यापासून सुरू झाला आहे. पक्षात सुरुवातीला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दूर करण्यात आले. त्यानंतर एनडीए सरकारमध्ये अर्थ, संरक्षण आणि विदेश मंत्रालासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळलेले जसवंतसिंह यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. लालजी टंडन यांच्याकडून हिरावून घेतलेली लखनौची जागा राजनाथसिंह यांच्या झोळीत टाकली गेली. तर मोदींसाठी मुरलीमनोहर जोशींकडून बनारसची जागा रिकामी करून घेण्यात आली.

परिस्थिती बदलल्याने पक्षातही काही बदल होणे अपेक्षित होतेच, परंतु ज्यापध्दतीने वरिष्ठ नेत्यांना वागणूक दिली जात आहे, ती पक्ष कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारी आहे. अशा ज्येष्ठ नेत्यामध्ये  सुषमा स्वराज या देखील आहेत. भाजपमधील एक अत्यंत अभ्यासू आणि निष्ठावंत नेत्या म्हणून त्यांचा लौकीक आहे. संसदेत सुषमा स्वराज यांनी पाच वर्षे विरोधी पक्षनेत्या म्हणून अत्यंत   यशस्वीपणे भूमिका पार पाडली आहे. अरुण जेटली यांच्या तुलनेत त्यांची कारकीर्द उजवी ठरली आहे. त्या भाजपच्या स्टार प्रचारक देखील आहेत. लोकसभा निवडणुकीच निर्णयप्रक्रिेयेत त्यांना गौण स्थान दिले गेले. त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी स्मृती इराणी यांना पुढाकार देण्यात येत  आहे. सुषमा स्वराज या अडवाणी गटाच्या  मानल्या जातात. कित्येवेळा त्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्क्षपणे विरोध केला आहे. रेड्डी बंधू यांना उमेदवारी देण्याचा नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय  त्यांना पसंत नव्हता. तसे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविले होते.

नरेंद्र मोदी यांच्या टीममधील सदस्य असलेल्या स्मृती इराणी गुजरातमधून यापूर्वीच राज्सभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्यापही बाकी आहे. त्या लोकसभेची निवडणूक हरल्या   तरी त्यांचे राज्यसभा सदस्यत्व कायम राहाणार आहे. अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यच्याविरुध्द स्मृती इराणी यांना उभे करण्याची योजना मोदी अँड पार्टीची आहे. सुषमा स्वराज यांचे पक्षातील महत्त्व कमी करून स्मृतीचे महत्त्व वाढविण्याचा या मागे इरादा आहे. सुषमा   स्वराज विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. स्मृती इराणी यांना राहुल गांधी यांच्या  विरोधात उभे केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्यांचाकडे लागले आहे. सुषमा स्वराज यांचा विजय निश्चित आहे तर स्मृती इराणी यांचा पराभव काळ दगडावरची पांढरी रेघ आहे. असे असताना केवळ प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवले गेले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्मृतीच्या समर्थनार्थ अमेठीमध्ये जाहीरसभा घेतली. यावेळी बोलताना त्यंनी  स्मृतीचे   भाजपमधील स्थान आणि महत्त्व कौतुकाने सांगितले. आपल्या भाषणात ते वारंवार स्मृतीचा  उल्लेख ‘छोटी बहीण’ असे करीत होते. लोकांनी स्मृतिला निवडून द्यावे, असे आवाहन करतानाच मोदी पुढच्यावेळी स्मृतिच्या कामकाजाचा हिशेब मला मागावा, असेही सांगायला ते विसरत नव्हते.

स्मृती इराणी या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे निकटवर्ती मानले जात होते. 2002 मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीनंतर स्मृती इराणी यांनी मोदींवर कडक भाषेत टीका केली होती. मोदी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर आपण उपोषण करू, असा इशारादेखील त्यांनी दिला होता. अर्थात तेव्हा स्मृती इराणी राजकारणात उतरल्या नव्हत्या. जेव्हा त्या भाजपात आल्या त्यानंतर मोदींवरील टीकेबाबत त्यांनी खुलासा केला होता. प्रसिध्दी माध्यमांनी गुजरात दंगलीबाबत दिलेल्या चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवून आपण मोदींवर टिका केली होती. परंतु गुजरातमधील लोकांना भेटल्यानंतर सत्ता कळली, अशी सारवासारव स्मृती   इराणी यांनी केली होती. मोदी विरोधात असलेल्या स्मृती इराणी आज मात्र मोदी ब्रिगेडमधील प्रमुख सदस्यांपैकी एक आहेत. सुषमा स्वराज या पंतप्रधानपदाच्या दावेदार असून महिला म्हणूनदेखील त्यांचे स्थान वेगळे आहे. पक्षातील सुषमा स्वराज यांचे महत्त्व कमी करण्यासाठी  स्मृती इराणी यांना पुढे आणले जात आहे, अशी चर्चा आता भाजपात खुलेपणाने सुरू झाली आहे.