मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर

परमेश्वराने प्रत्येकाला एक अद्‍भूत शक्ती दिलेली असते. परमेश्वराने दिलेल्या या धनाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग जो नवनिर्मितीसाठी करतो, समाजाच्या विचारांची दिशा बदलवून अध्यात्माच्या मार्गाने समाजप्रबोधन करू शकतो, तोच गुरू असतो, असे इंदूर येथील श्री नाना महाराज तराणेकर संस्थान प्रमुख डॉ. प्रदीप तराणेकर यांनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले.

त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून शरण आलेल्या प्रत्येक शिष्याला सन्मार्ग दाखविणे व त्या मार्गावर चालणार्‍याला मदतीचा हात देणे, अडी-अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखविणे, शिष्यांत सद्‍गुणांची निर्मिती करणे, अशी कार्य डॉ. तराणेकर यांचे आजोबा, गुरू नाना महाराजांनी केले.

हिंदू संस्कृतीला दत्तसंप्रदायाची मोठी परंपरा आहे. दत्तसंप्रदायाला सुमारे अठराशे वर्षांचा इतिहास असून दत्तप्रभू- नृसिंह सरस्वती- वासुनंद सरस्वती- दत्तावतार प.पु. नाना महाराज तराणेकर अशी गुरू-शिष्यची परंपरा चालत आली आहे. वासुनंद सरस्वती उर्फ टेंभे स्वामी हे नाना महाराजांचे गुरू होते. टेंभे स्वामींच्या हस्ते महाराष्ट्रातील तराणे येथे दत्तमूर्तीची स्थापना करण्यात आली. श्री. नानानी स्वामींकडून अनुग्रह घेऊन हिमालय पर्वतावर जाऊन उपासना केली. पंडीत, वेदांत शाळा चालविल्या. त्याकाळी उपासना, मार्गदर्शन, निरूपण या अध्यात्मातून समाज प्रबोधन केले.

'आधी केले मग सांगितले', असा सद्‍गुरूंचा दृष्टीकोण असतो. हा दृष्टीकोन त्यांना जीवनदर्शनातून प्राप्त केलेला असतो. सद्‍गुरू आपल्या शिष्याला मार्ग दाखवित असतात. गुरूविणा ज्ञान नाही, असे आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याचप्रमाणे गुरूविणा मोक्षप्राप्ती नाही, असे म्हटले जाते.

योगीपुरूषाचे एक वैशिष्‍यपूर्ण लक्षण असते. ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलायला लागली की, ती आपला आंतरिक गंध व सौंदर्य रोखू शकत नाही, लपवू शकत नाही. तो सगळ्यांसाठी असतो. त्याप्रमाणे गुरूं आपल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करत असतात.

श्री. नाना महाराजांनी त्रिपदी परिवाराची स्थापना करून अध्यात्मातून समाजप्रबोधन साधले आहे. नानांच्या समाजप्रबोधनात आधुनिक विचारसरणीचा एक कवडसा आढळतो, तो म्हणजे ' दोन पिढीतील अंतर कमी करणे. तरूण पिढीला स्वातंत्र्य प्रिय असते. परंतु नानाच्या आश्रमात गुरूपौर्णिमेला होणार्‍या उत्सवात तरूण व वयस्क मंडळी एकत्र बसून गुरूभक्ती करतात. वरिष्ठांचा मान राखून तरूण पिढी समाजप्रबोधनाच्या कामात स्वत:ला झोकून देते. अध्यात्माची आवड ही दोन्ही पिढ्यांना असते. परंतु श्री.नानांनी तरूण पिढीचे वय, विचार, आवड लक्षात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.

करूणा त्रिपदी परिवाराची स्थापना-
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व आश्रयस्थान असलेले दत्तावतार नाना महाराजांनी समाज एकत्रित आणण्यासाठी करूणा त्रिपदी परिवाराची स्थापना केली. समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती त्रिपदीच्या माध्यमातून सामुहिक प्रार्थना करतो. नानांनी सुरू केलेल्या ‍त्रिपदी परिवाराच्या देश- विदेशात 350 शाखांमध्ये विस्तार झाला आहे. इंदूर येथे गुरूपौर्णिमा उत्सवात ठिकठिकाणे प्रतिनिधी येत असतात. देशभरातून भाविक येथे येतात व अनुग्रह घेत असतात.

वारकरी आणि दत्त संप्रदायाचा संगम-
नाना महाराजांच्या इंदूर येथील आश्रमात गुरूपौर्णिमानि‍मित्त आयोजित कार्यक्रमात वारकरी व दत्त संप्रदायाचा संगम असतो. साधारण 25 तास चालणार्‍या या कार्यक्रमात काकड आरती, सामुहीक उपासना, वेद अभिषेक, प्रतिमा पुजन, पादूका पुजन, करूणा त्रिपदी तर भागवत पठण, अभंग, भारूडे, भजन व कीर्तन असा कार्यक्रम असतो.