शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By अभिनय कुलकर्णी|

शिवमहिम्न स्तोत्राचे महत्त्व

शिवशंकराची स्तुती करणार्‍या शिवमहिम्न स्तोत्राचे महत्त्व फार मोठे आहे. अध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण भाषाशास्राच्या दृष्टीकोनातूनही हे स्तोत्र अतिशय समृद्ध अनुभव देणारे आहे. शिकागोच्या धर्मपरिषदेत भाषण करण्यासाठी गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी तेथेही हे स्त्रोत्र म्हटले होते.

रूचीना वैचित्र्या दृजु कुटिलनाना पथजुषां
नृणामेको गम्यस्तमसि पयसामर्णवइव
या ओळी विवेकानंदांनी आपल्या भाषणात म्हटल्या होत्या. गंधर्वराज पुष्पदंताने हे स्तोत्र रचले आहे. शिव, गणेश, विष्णू, आदी सर्व देवतांच्या पूजनात, स्तवनात तसेच उपासनेत या स्त्रोत्राचा उपयोग केला जातो.

या स्त्रोत्रामागची कथाही रंजक आहे. पुष्पदंत गंधर्वांचा राजा होता. काही कारणामुळे भगवान शंकर त्याच्यावर क्रोधित झाले. त्यांनी त्याला शाप दिला. शापमुक्त होण्यासाठी त्याने शिवमहिन्म स्त्रोत्र रचले. ते म्हणून त्याने शंकराला प्रसन्न केले व शापमुक्त झाला.

यासंदर्भात कथासरित्सागरातही एक वेगळी कथा सांगितली जाते. पुष्पदंताला अदृश्य होण्याची सिद्धी प्राप्त होती. त्यायोगे तो एका राजाच्या बगिच्यात जात असे. तेथील सुरक्षा रक्षकांना पत्ता लागू न देता तेथील सुंदर सुंदर फुले तो चोरून नेत असे. राजाने अनेक प्रकारे या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. अखेरीस त्याने बागेच्या मार्गात शिवनिर्माल्य पसरवून ठेवले. पुष्पदंतांने ते ओलांडताच त्याची सिध्दी नष्ट झाली व तो दिसू लागला. गेलेली सिद्धी परत मिळविण्यासाठी पुष्पदंताने हे स्तोत्र रचून शंकराला प्रसन्न केले. या कथेचा उल्लेख ३७ व्या श्लोकात करण्यात आला आहे.

शिवमहिम्न भक्तीरसाने ओथंबलेले स्तोत्र आहे. त्याला एक छान नाद आहे. ते म्हणण्याची एक लय आहे. त्या लयीत ऐकल्यास आपल्यालाही प्रसन्न वाटते. या स्तोत्रात एकूण ४३ श्लोक आहेत. त्यात ३१ श्लोकापर्यंत शिवस्तुती आहे. त्यानंतर स्तोत्राचे महात्म्य व फलश्रुती आहे. रूद्राचा अभिषेक न जमणार्‍यांनी या स्तोत्राचा अभिषेक केला तरी चालतो, एवढे अध्यात्मिक महत्त्व याला आहे.

या स्तोत्रात पहिल्या श्लोकापासून ते २८ व्या श्लोकापर्यंत शिखरिणी वृत्त आहे. इष्ट देवदेवतांच्या स्तुतीसाठी या वृत्ताची रचना अनुकूल असते. पुष्पदंताने अतिशय लीन होऊन शिवाची स्तुती केली आहे. तो म्हणतो, की ''मी कितीही अल्पज्ञ असलो तरी तुझी स्तुती करीन. माझ्या या प्रयत्नात कोणताही दोष नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे होईल, तशी मी स्तुती करत राहीन. ''

पुष्पदंत पुढे म्हणतो, ''भगवदभक्ताला काहीही दुर्लभ नाही. त्रैलोक्याचे राज्य अथवा निष्काम असल्यास सायुज्य प्राप्तीपर्यंत सर्व काही त्याला सहज प्राप्त होते. भगवंताच्या चरणावर ज्याने मस्तक नमविले त्याला सर्व सिद्धी व समृद्धी प्राप्त होते.

अतीतः पन्थानम् पासून पदे तर्त्वाचीने पर्यंत निर्गुण ब्रम्हाचा विचार केला आहे. पुढे दहाव्या श्लोकापासून २४ व्या श्लोकापर्यंत सगुण रूपाचे महत्त्व आहे. २८ व्या श्लोकात पुष्पदंत म्हणतो, '' देवाधिदेवा तू सर्वांना प्रिय आहेस. तेजोरूप आहे. मनाने, वाणीने, शरीराने मी तुला नमस्कार करतो.'' ३१ व्या श्लोकापर्यंत मूळ स्तोत्र आहे. ३२. ३३. ३४ या श्लोकात मालिनी वृत्त आहे.

पुष्पदंत म्हणतो, ''हे भक्तप्रिया माझे मन चंचल आहे. पण ते प्रेमभक्तीने भरलेले आहे.'' हे स्तोत्र पुण्यकारक आणि मनोहर आहे. '' महादेवा, तू कसा आहेस? तुझे स्वरूप कसे आहे? हे जाणण्याच्या भानगडीत मी पडत नाही. तू जसा असशील तसा तुला माझा नमस्कार असो'' येथे पुष्पदंताने त्याच्या भगवद्भभक्तीची परमावधी गाठली आहे.

भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारे हे स्तोत्र पाठ करून म्हटल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते व शिवलोकात स्थान मिळते, असे मानले जाते.