सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

रोगांवर उपचारासाठी ॐ उपयुक्त

ध्वनीची निर्मिती पृथ्वीच्या उत्पत्तीबरोबरच झाल्याचे हिंदू धर्मशास्त्र मानते. हा ध्वनी होता ॐ. आकाश, पाताळ आणि पृथ्वी या ध्वनीने भारले गेले होते. म्हणूनच भारतीय परंपरेत ओंकाराला अतिशय महत्त्व आहे. आपल्याकडे ओंकाराचा जप करण्यामागे हेच शास्त्र आहे.

आता या ओंकार जपाचे शास्त्रीय महत्त्व पाश्चात्य आणि पौर्वात्यांनाही कळू लागले आहे. एवढेच नव्हे, तर ओंकाराचा उपयोग शारीरिक उपचारांवरही होऊ लागला आहे. ध्येयाकडे जाणारा रस्ता चुकून नको त्या गोष्टींकडे भरकटलेल्या तरुण पिढीला योग्य रस्त्यावर आणण्यातही ओंकार ध्वनी दिशादर्शक ठरतो आहे.

पाश्चात्यांना ओंकाराचे महत्त्व पटवून देणारा लेख ब्रिटनमध्ये एका विज्ञान नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वैद्यकीय शास्त्रात ज्यावर उपचार नाही, अशा काही रोगांवर ओंकाराचा नियमित जप हा उपाय आहे. यामुळे संबंधित रोगाची तीव्रता नक्कीच कमी होत असल्याचे आढळले आहे. विशेषतः पोट, मेंदू, आणि ह्रदयासंबंधीच्या आजारात ओंकाराचा जप अतिशय उपयुक्त आहे.

अशी घेतली चाचणीः
रिसर्च एंड एक्सपिरिमेंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स या संस्थेचे प्रमुख प्रो. जे. मॉर्गन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेली सात वर्षे ओंकाराचा अभ्यास केला आहे. हिंदू धर्माचे हे प्रतीक चिन्ह त्यांना प्रचंड प्रभावशाली असल्याचे या सात वर्षांत जाणवले. या काळात त्यांनी मेंदू आणि हृदयासंदर्भातील विविध रोगांनी आजारी असलेले अडीच हजार पुरूष आणि दोन हजार महिलांवर प्रयोग केला.

ज्या औषधाने त्यांचा जीव वाचू शकेल, ते सोडून बाकीची त्यांची सर्व औषधे बंद करण्यात आली. रोज सकाळी सहा ते सायंकाळी सात या काळात अतिशय स्वच्छ वातावरणात त्यांच्याकडून ओंकाराचा जप करवून घेण्यात आला.

या काळात त्यांनी विविध ध्वनींच्या कल्लोळातही ओंकाराचा जप केला. प्रत्येक तीन महिन्यांनंतर त्यांचा मेंदू, हृदय यांच्याशिवाय सर्व शरीर सॅकनं करण्यात आले. चार वर्षे असे केल्यानंतर आलेला अहवाल आश्चर्याचा धक्का देणारा होता.

जवळपास सत्तर टक्के पुरूष आणि ८२ टक्के महिलांच्या आजारात पूर्वीच्या तुलनेत नव्वद टक्के सुधारणा झाली. काही लोकांवर ओंकार जपाचा दहा टक्केच परिणाम झाला. कारण त्यांचा आजार अतिशय गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे ते जप चांगल्या पद्धतीने करू शकले नाहीत, असे अनुमान प्रो. मॉर्गन यांनी काढले.

याशिवाय ओकार जपातून साध्य झालेली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे व्यसनमुक्ती. अनेकांची व्यसने ओंकार जपामुळे सुटली. मॉर्गन यांच्या मते निरोगी व्यक्तीने रोज ओंकाराचा जप केल्यास आयुष्यभर रोग त्याच्यापासून दूर राहील.

असा झाला फायदाः
प्रा. म़ॉर्गन यांच्या मते ध्वनीच्या आरोह अवरोहामुळे निर्माण होणारी कंपने मृत पेशींना पुनर्जीवित करतात. नव्या पेशींची निर्मिती होते. ओंकार जपाने मेंदूबरोबरच नाक, गळा, हृदय आणि पोटात तीव्र तरंग पसरतात. त्यामुळे सर्व शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते. अनेक आजार तर केवळ दूषित रक्तामुळे होतात. त्यामुळे ओंकाराचा जप केल्यास रक्तदोष दूर होऊन शरीरात स्फूर्ती निर्माण होते.