गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:24 IST)

लघुभागवत - अध्याय ७ वा

जयजयाजी सद्गुरुनाथा । तुझ्या चरणीं ठेवितों माथा । निरुपावया पुढील कथा । शक्तिदाता तूं अससी ॥१॥
येथवरी आनंदजनक । कथा कथिल्या अनेक । आतां पुढील भाग सकौतुक । ऐका बालभक्त हो ॥२॥
एकदां इंद्र ऐरावतीं । आरूढोनि फिरतां पंथीं । दुर्वास ऋषी अवचितीं । तयालागी भेटले ॥३॥
होऊनि त्यांनीं प्रसन्न । इंद्रासी दिधलें आशीर्वचन । केला पुष्पहार अर्पण । निजप्रसाद तयासी ॥४॥
तो ऋषिप्रसाद यशस्कर । गजमस्तकीं ठेवी पुरंदर । गजें तत्काळ तोचि हार । पाददळी तुडविला ॥५॥
पशु काय जाणे ऋषिसत्व । अथवा प्रसादाचें महत्व । पशुजातीचें अज्ञानत्व । प्रगट केलें तयानें ॥६॥
परी प्रसादाचा अवमान । पाहूनि ऋषि क्रोधायमान । होऊनि, वदला शापवचन । शक्राप्रती आवेशें ॥७॥
ह्नणे पापिष्ठा मतिमंदा । ऐश्वर्याच्या चढूनि मदा । परम वंद्य माझ्या प्रसादा । पशुचरणीं लोटिलें ॥८॥
तरी ऐक शापवाक्य । तुजसहित सकल त्रैलोक्य । दारिद्र्य भोगील, आतां अशक्य । शब्द माझा टळावया ॥९॥
ऋषीची वाचा भयानक । सत्य होणार नि:शंक । ह्नणूनि सुरांसी थोर धाक । पडे; वृत्त ऐकतां ॥१०॥
तेव्हां विष्णुसे इंद्रादि अमर । जाणविती सारा प्रकार । येरु ह्मणे स्नेह सत्वर । दैत्यासंगे जोडणें ॥११॥
उभयीं करुनि सिंधुमंथन । कीजे सुधा संपादन । केल्यावीण ऐसा प्रयत्न । संकट तुमचें टळेना ॥१२॥
मग घुसळावया सागर । रवी योजिली गिरिमंदर । वासुकीसर्पाचा करुन दोर । देवदैत्य घुसळिती ॥१३॥
देव दैत्य दोहींकडे । ओढिती दोर वीर गाढे । जेवीं नवनीत सांपडे । करिता मंथन दधीचें ॥१४॥
तैशा वस्तु अनेक । मंथन करितां अमोलिक । अपूर्व अश्रुत चमत्कारिक । सिंधुउदरी लाभल्या ॥१५॥
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक । सुरा धन्वंतरी शशांक । कामधेनु ऐरावत शंख । अश्व सप्तमुखांचा ॥१६॥
रंभा सुधा सुदर्शन । कालकूट विष दारुण । ऐशीं सिंधुमथनीं संपूर्ण चवदा रत्नें लाभलीं ॥१७॥
त्यांत कालकूट उग्र परम । बिंदूमात्र करी जाळूनि भस्म । ऐशी घातक वस्तु नि:सीम । कोण चतुर स्वीकारी ॥१८॥
लोककल्याणास्तव । तें प्राशन करी महादेव । तत्काळ झाला नीलग्रीव । नीलकंठ नाम पावला ॥१९॥
ते विषबिंदु दोन तीन भूमीसी झाले पतन । तेचि करुनि सेवन । सर्प झाले विषारी ॥२०॥
लक्ष्मी कौस्तुभादि वस्तु सर्व । विभागूनि घेती देव । दैत्यांसी सुरा अपूर्व । मतैक्य करोनी अर्पिली ॥२१॥
परी सारी यातायात । ज्यास्तव घडली तें अमृत । दैत्य घेऊनि अवचित । गेले दूर पळोनी ॥२२॥
तेव्हां सकल सुर मागुती । चिंताक्रांत झाले चित्तीं । विष्णुसी पुन: पुसती । आतां कैसें करावें ॥२३॥
मग विष्णु ह्नणे मी मोहिनी । सुंदर स्त्रीरुप धरोनी । दैत्यांसी वंचीन, तुह्मी मनीं । स्वस्थ आतां असावें ॥२४॥
जन्माची व्हावया माती । मद्य होतेंचि दैत्यां हातीं । दुसरी वस्तु जगीं युवती । प्राणनाश करावया ॥२५॥
ह्नणूनि दैत्यांसी स्त्रीरुप विष । पाजूनि, करावें त्यांसी नि:शेष । मग सहज मिळेल पीयूष । ऐसा उद्देश विष्णुचा ॥२६॥
इकडे दैत्य अमृतासाठी । परस्पर झोंबले कंठी । जो तो ह्नणे अमृताची वाटी । लावीन ओष्ठीं मी आधीं ॥२७॥
ऐसे दैत्य कलहानळीं । करणार आपली होळी । तंव श्रीविष्णु आले त्या स्थळीं । मोहिनीरुप घेऊनि ॥२८।
पाहूनि ती सुंदर युवती । दैत्य मोह पावले चित्तीं । वदले, सांगेल ही त्या रीतीं । शमवूं आतां कलहाग्नी ॥२९॥
मग करुनी एकमत । तीस जाणविती निज हेत । ह्नणती यथाविभाग अमृत । देईं आह्मां सकलांते ॥३०॥
तेव्हां दर्शवूनि संशय । ती ह्नणे तुह्मां स्त्रीन्याय । कैसा नेणों होईल प्रिय । ह्मणूनि मीं ते न करीं ॥३१॥
निर्मळ देखोनि तिचे मानस । अधिकचि वाढला विश्वास । तत्काळ त्यांनी अमृतकलश । मोहिनीतें दीधला ॥३२॥
तेव्हां ह्नणे ती योग्य न्याय । देईन मी नि:संशय । तथापि होता कांही अप्रिय । कारण कोणी पुसूं नये ॥३३॥
ऐसें आधींच स्पष्ट बोलुनी । विभाग करी मग मोहिनी । देवही होते त्या स्थानीं । अमृतभाग घ्यावया ॥३४॥
ती दैत्यासी ह्नणे हे समस्त । देव दिसती बुभुक्षित । तरी त्यांसी आधीं किंचित्‍ । देऊनि अमृत शांतवूं ॥३५॥
ऐसें बोलूनि आतृप्त सुधा पाजिली प्रथम विबुधां । या कपटें दैत्य चढले क्रोधा । परी विरुद्ध वदवेना ॥३६॥
तेथ साधूनि योग्य संधी । राहु, चंद्रसूर्यासन्निधीं । बैसूनि, प्याला सुधा, विबुधीं । जाणिले कपट राहुचें ॥३७॥
तत्काळ तिहीं भ्रूसंकेते । जाणविलें मोहिनीतें । ह्णणूनि राहे राहु जीवंत । चंद्रसूर्यांनीं केला घात । ऐसें राहूसी भासलें ॥३९॥
तेव्हांपासून पूर्णिमा अमेसी । ग्रासूं पाहे राहु चंद्रार्कांसी । ग्रहणाची मीमांसा ऐसी । भागवती वर्णिली ॥४०॥
विष्णुनें टाकूनि मोहिनीरुप । प्रकटिलें सत्य स्वरुप । तेव्हां दैत्यांसी येऊनि कोप । अधिकचि वैर वाढलें ॥४१॥
प्रबळांशीं करिता द्वेष । दुर्बळांचा होतो नाश । बलिष्ठ साधिती स्वार्थ; सारांश । न्यायान्याय विसरुनी ॥४२॥
आतां कर्माहूनि भक्ति श्रेष्ठ । एतदर्थ ऐका एक गोष्ट । भक्तीने होऊनि संतुष्ट । देव भक्तांसी सांभाळी ॥४३॥
नाभागाचा अंबरीष सुत । होता परम विष्णुभक्त । शांत दांत शुचिव्रत । कर्तव्यदक्ष सर्वदा ॥४४॥
तेणें केले अनेक याग । शास्त्रविहित यथासांग । परी भक्तिसारिखा सुलभ मार्ग । नाहीं त्यांते आढळला ॥४५॥
विष्णु होऊनि प्रसन्न । अर्पिले त्यासी सुदर्शन । कैशाही संकटी रक्षण । व्हावया अंबरिषाचें ॥४६॥
साधन द्वादशीचें व्रत । नियमपूर्वक करी सतत । विष्णुभक्त तितुके समस्त । ऐसें व्रत पाळिती ॥४७॥
दशमीसी मध्याह्नी भोजन । एकादशी दिनीं उपोषण । द्वादशीसी सूर्योदयीं ब्राम्हण । घेऊनि कीजे पारणें ॥४८॥
ऐशी साधनद्वादशी । अंबरीष करी नियमेंसीं । तंव पारणासमयीं दुर्वासऋषी । अवचित तेथें पातले ॥४९॥
अंबरीष रायें नमस्कारुनी । सत्कारिला दुर्वासमुनी । ह्मणे आज आमुच्या सदनीं भोजन झाले पाहिजे ॥५०॥
वचन ऐकूनि ह्नणे दुर्वास । अवश्य पुरवूं तुमचें मानस । ऐसें बोलूनि जाय नदीस । स्नानसंध्येकारणें ॥५१॥
तेथें सारितां नित्य विधी । ऋषीसी लागे बहुत अवधी । राजा गेला गुंतोनि शब्दीं । उपाय कांही सुचेना ॥५२॥
द्वादशी उरली घटिका एक । रायाचें झालें म्लान मुख । मनीं उदेले नाना तर्क । व्रतभंगाचें भय गमे ॥५३॥
ऋषीवीण करितां भोजन । घडेल त्याचा अपमान । पारणें न करितां भग्न । व्रत होईल निश्चयें ॥५४॥
ऐसा नृप पडे संकटीं । मार्गाकडे लावूनि दृष्टी । उभा राहिला द्वारवंठीं । तळमळ पोटीं लागली ॥५५॥
विप्रांसी पुसे विचार । ते वदले प्यावें नीर । येणें ऋषीचा अनादर । न होय; व्रतही मोडेना ॥५६॥
मानवली रायासी गोष्ट । ह्यणे टळले थोर अरिष्ट । घेतला उदकाचा घोट । साधिलें पारने व्रताचें ॥५७॥
तंव दुर्वास आले परत । कळलें अंबरीषाचें वृत्त । ऋषि होऊनि कोपयुक्त । केलें अद्भुत तयानें ॥५८॥
आपुल्या जटेपासूनि एक । कृत्या निर्मिली भयानक । ती रायावरी सशस्त्र अचूक । धांवे वध करावया ॥५९॥
तंव रायें सोडिलें सुदर्शन । तेणें कृत्या पावली मरण । नृपसंकट व्हावया शमन । चक्र लागे ऋषीपाठीं ॥६०॥
ऋषि लपाला गिरिकपाटीं । तरी चक्र तेथ आहेचि पाठीं । थोर धाक वाटे पोटीं । सर्वत्र चक्र देखोनी ॥६१॥
हरले त्याचे सकल यत्न । पाठ न सोडी सुदर्शन । शेवटीं विधीचें दर्शन । घेऊनि उपाय पुशियेला ॥६२॥
येरू म्हणे मी असमर्थ पूर्ण । निवारावया तुझें विघ्न । मग प्रार्थिला उमारमण । तोही तैसेंचि अनुवादे ॥६३॥
तेव्हां विष्णुची प्रार्थना । करुनि म्हणे मज यातना । असह्य होती तरी करूणा । करोनि चक्र आवरीं ॥६४॥
विष्णु म्हणे मी अनन्यगतिक । मद्भक्तांसी सामर्थ्य अधिक । जेथें कर्म अन्यायमूलक । घडले तेथ तू जाईं ॥६५॥
सांडूनि निज थोरपण । अंबरीषासी व्हावें लीन । तोचि करील पूर्ण निरसन । संकट तुझें मुनिराया ॥६६॥
सर्वत्र होता निराशा पूर्ण । अंबरीषातें दुर्वास शरण । जाऊनि धरी घट्ट चरण । प्रार्थी रक्षण करावया ॥६७॥
तेव्हा अंबरीष रायासी । उपजली दया मानसीं । अभय देऊनि नृपें तयासि । सुदर्शन आवरिलें ॥६८॥
होऊनियां क्रोधवश । भलतेंचि बोलतां होतो त्रास । हा दुर्वासाचा इतिहास । देखोनि सावध असावें ॥६९॥
तैसाचि जो भक्तशिरोमणी । श्रेष्ठही लागती तयाचे चरणीं । हें जाणोनि अंत:करणी । ईश्वरभक्ती करावी ॥७०॥
आतां प्रसंगावधान । अंगी असतां टळे विघ्न । ये विषयीं सावधान । चरित्र एक परिसावें ॥७१॥
भगीरथ वंशी सौदास । नामें नृप झाला राक्षस । ती ऐकोनि कथा, कैसा द्वेष । बाधे, बोध हा घ्यावा ॥७२॥
सौदास नृप एके दिनीं । मृगयेसी गेला वनीं । देखे दोन राक्षस नयनीं । वनस्थळी अवचित ॥७३॥
एकाचें करितां रायें हनन । दुजा करी पलायन । परी सूड उगवीन वाचा पूर्ण । ऐसें तेणें मनिं धरिलें ॥७४॥
मग नृपमंदिरीं एक दिवस । वेष पालटूनि आला राक्षस । सेवा धर्माची धरोनि आस । म्हणे येथे पातलों ॥७५॥
म्हणे मी सूपकर्मी चतुर । पक्वान्नांचे नाना प्रकार । जाणतों करीन पाक सुंदर । अनुभव घेऊनि देखिजें ॥७६॥
रायें नेमिलें तयासी । बल्लव पाकशाळेसी । द्वेष ठेऊनि तो मानसीं । भासवीं बाह्य मित्रता ॥७७॥
असो वसिष्ठ मुनि एके दिनीं । यज्ञार्थ आले नृपासदनीं । बैसले असतां भोजनीं । असुरें वैर साधिलें ॥७८॥
मुनिपात्रीं नरमांस । आणूनि वाढी राक्षस । तें देखतांचि क्रोधवश । वसिष्ठ मुनि जाहले ॥७९॥
म्हणती राया धर्मविरुद्ध । आचारिलें त्वां कर्म अशुद्ध । तरी घेईं माझा शापशब्द । राक्षस होऊनि तूं राहे ॥८०॥
हें ऐकतांची सौदास नृप हृदयीं पावला संताप । म्हणे अपराध नसतां कोप । केला कैसा अविचारें ॥८१॥
म्हणूनि सक्रोध नृपती । उलट शाप ऋषीप्रती । द्यावया घेई जळ हातीं । तंव राज्ञीनें निवारिलें ॥८२॥
परी शापार्थ घेतलें जळ । तें टाकावया देखे स्थळ । कीं भूवरी टाकितां सकळ । पृथ्वीसी शाप बाधेल ॥८३॥
म्हणूनि टाकिलें निजचरणी । तोंचि पाय झाले कृष्णवर्णी । यास्तव कल्माषपाद जनीं । नाम पावला राक्षस ॥८४॥
मग राणीनें सर्व वृत्तांत । वसिष्ठासी केला विदित । राक्षसाचे हें कपट निश्चित । कळले मुनिसी तेधवां ॥८५॥
उ:शाप वदला ऋषी । म्हणे पुनश्च द्वादशवर्षी । पूर्व स्थिती राज्य पावसी । कल्याण होईल तव राया ॥८६॥
येथील मुख्य तात्पयार्थ । विचारावीण व्यर्थ । कोपतां होतो अनर्थ । म्हणूनि साहस करु नये ॥८७॥
तैशीच राजसुंदरी । नसती चतुर विचारी । तरी संकटाचे अवसरीं । कोण रायासी रक्षिता ॥८८॥
म्हणूनि मुख्य संसारीं । नरासी व्हावी चतुर नारी । एर्‍हवी वास कांतारी । अधिक सुखद जाणिजे ॥८९॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील कथा सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥९०॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरायोग्य विद्याधन । प्राप्त होय ऐश्वर्य संपूर्ण । ऐसें वरदान व्यासाचें ॥९१॥
इति श्रीलघुभागवते सप्तमोऽध्याय: ॥७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥