शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मंगळसूत्र : एक भावालंकार

भारतीय जीवन पध्दतीत कुटुंबसंस्थेस अत्यंत मोलाचे स्थान आहे. या कुटुंबसंस्थेचा पाया म्हणजे आपली विवाहसंस्था होय. सोळा संस्कारांपैकी ‘विवाह’ या संस्काराचे स्त्री-पुरुषाच्या जीवनात उदात्त, मंगल, भावरम्य संस्कार मानला जातो. या विवाहाची अर्थपूर्णता ‘मंगळसूत्र’ या प्रतिकाची- दागिन्याची मानली गेलीय.

‘मंगलसूत्र’ फक्त काळे मणी, सोन्याच्या वाट्या, त्यांना गुंफून ठेवणारा धागा एवढंच वरवरचं रूप आहे काय? त्याची संगती कशी लावू शकतो? याचा विचार आधुनिक जीवनातही उपयुक्त आहे.

जन्म, विवाह, मृत्यू या गोष्टी दैवाधीन, ईश्वराधीन मानल्या गेल्या आहेत. जन्माच्या गाठी देव बांधतो, असंही आपल्याकडे मानलं गेलं आहे. ‘पाणीग्रहण’ हा सुंदर शब्द विवाहास आहे. वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. पुरुष स्त्रीचा हात धरतो, मंत्रोच्चार होतो. वधूला हाती धरून अग्नीभोवती प्रदक्षिणा घातलो, कंकणबंधन होते. त्या वेळी तर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो.

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी व २ लहान वाट्या असतात. एक पती, दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. वराकडील सुवासिनीने वधू-वरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसवावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे, कंचुकी (काचोळी, चोळी) व काळ्या मण्यांचे मंगळसूत्र द्यावे. या अष्टपुत्रींपैकी एक वधूस नेसवून, एक उत्तरीय अंगवस्त्र म्हणून तिला पांघरण्यास द्यावे. तिच्या अंगात चोळी घालावी आणि मग वराने मंगळसूत्र आपल्या हाती घेऊन ते वधूच्या कंठास बांधावे. एवढा सुंदर, भावपूर्ण विधी असताना आपण फोटो काढणे, आहेर घेणे, जेवणावळी करणे या लौकिक गोष्टींना प्राधान्य दिल्याने विवाह विधी उरकून घेण्याचाच प्रकार करतो ना? पारंपरिक वेशभूषा ‘दणक्यात लग्न’ केल्याचे दाखवत असतो ना? आपण कधी याचा विचारच करीत नाही.

प्रत्येक माणसाचं जीवन अमूल्य आहे. त्याला सोन्यासारखं तेजस्वी, कांतीमान, किमती घडवायचं हे ज्याच्या त्याच्या हाती. काळे मणी हे दु:खाचं, अपयशाचं प्रतीक. जीवनात सुखापेक्षा दु:ख, यशापेक्षा अपयश, सहज ऐवजी कठीण अधिक वाट्यास येते, अशी जाणीव काळे मणी सतत करून देतात. सूत्र म्हणजे धागा. एकरस जगा, समरस राहा, एकजीव वागा असे सदोदित सांगत असतो. दोन वाट्या पती-पत्नीचं नातं जन्मभर जपायचं असा अर्थ आपणास घेता आला तर.... आचरता आला तर आपलं जीवन नक्कीच सुखदायी होईल. जगण्याला शुभंकर आकार येईल. प्रत्येक हिंदू स्त्रीला विवाहाच्या बंधनात ठेवणारं ‘मंगळसूत्र’ हा दागिना न वाटता ते भावबंधन वाटत असतं. ग्रामीण भाषेत यावा ‘डोरलं’ असं सुंदर अर्थवाही नाव आहे.

आजकाल उच्चशिक्षित, अत्याधुनिक (अल्ट्रामॉडर्न) पाश्चिमात्त्य हवा चाखलेल्या महिला मंगळसूत्रास ‘लायन्सेस’ असं म्हणून हिणवतात. पश्चिमी भोगवादी कल्पना स्वैराचारी भावना फैलावून आमच्या कुटुंबसंस्थेचा पायाच डळमळीत करतेय का, असे वाटून जाते. विवाह हा जेथे करार मानला जातो त्यांना ‘मंगळसूत्रा’ ची काय मातब्बरी? मांगल्य, पावित्र्य कशाशी खातात हे त्यांना काय ठाऊक? अशा घरातून कौटुंबिक बेदिली, कलह जन्म घेतात.

‘धर्मेच...अर्थेच....कामेच नाति चरामी’ असं मंत्रोच्चारात म्हणतो. अशी भव्योदात्त मंगलमय, भावगंधी विचार/भावना इतर संस्कृतीत नाही. आमच्या पूर्वजांनी समाजरचना, ऐक्य हे निकोप वाढीसाठी किती काळजी घेतली हे ‘ मंगळसूत्र’ प्रतिकावरून कळते. चार इंग्रजी बुकं शिकलेले, सा-या सुंदर कल्पना, प्रतिकं मोडीत काढावयास निघालेल्या जिवांना कसं पटेल? त्याचं एकच राहिलं परंपरावादी ....मध्ययुगीन...बुरसटलेले .....मागासलेले...
नीतिमान कुटुंब असेल तर नीतिमान समाज होईल, राष्ट्र नीतिमान होईल. प्रसन्न स्त्री प्रसन्न कुटुंबाची ओळख असते. अशी कुटुंबपध्दती ही समाजस्वाथ्यासाठी, सुरक्षिततेसाठी आवश्यक गोष्ट आहे. आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेने ही बाब जगात सिध्द झाली.

आमच्या उन्नत, उदात्त, मंगल विचारांचा वारसा जतन करून जीवन समृध्द, वैभवशाली करण्यासाठी हे सुंदर विचारांचे मंगळसूत्र घरात शोभू द्यावे. म्हणजे ‘मंगळसूत्र’ केवळ अलंकार न वाटता तो ‘भावालंकार’ किंवा ‘श्रध्दालंकार’ वाटेल. खरं ना?