शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2024 (08:47 IST)

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 संपूर्ण माहिती Angarki Sankashti Chaturthi 2024

ganesha puja
Angarki Sankashti Chaturthi 2024 पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक (मंगळ देव) यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे.
 
हिन्दू पंचागानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते – विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी.
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चवथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चवथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत-पूजन आणि कथा- आरती करण्याचे महत्तव आहे.
 
हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीची पूजा करण्याच शुभ मुहूर्त दुपारी 02:43 ते 03:39 मिनिटापर्यंत आहे. या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहेत. पहिला संधिप्रकाश मुहूर्त 25 जून रोजी संध्याकाळी 07:21 ते 07:42 पर्यंत आहे. यानंतर रात्री उशिरा 12:04 ते 12:44 पर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल.
 
चंद्रोदय वेळ: रात्री 10.05 मिनिटे
 
संकष्टी चतुर्थी महत्त्व Sankashti Chaturthi Vrat Importance
संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी. हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात, जीवनात सुख-शांती येते. हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते.
 
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 Angarki Sankashti Chaturthi 2024
संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते, तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते. मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते. 'अंगारकी' हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ 'जळलेल्या कोळशासारखा लाल' असा होतो. हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी Angarika Sankashti Chaturthi Puja Vidhi
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे.
यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करावी.
सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, जनेयू, प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्या.
धूप- दीप लावावे.
'ॐ गं गणपते नमः ' या मंत्राचा जप करून पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करावा.
श्रीगणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे.
उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते.
गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा-
सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पूजेचे संकल्प घ्यावे.
त्यानंतर गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करावे.
यानंतर गणेशाला स्नान घालावे.
प्रथम पाण्याने नंतर पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण) आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे.
गणेशाचे मंत्र आणि चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे.
आता गणेशाला वस्त्र अर्पण करावे. जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना नाडा देखील अर्पण करु शकता.
यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर, चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्या.
आता बाप्पाला एक सुंदर सुगंधी उदबत्ती दाखवा.
आता दुसरा दिवा लावावा आणि गणपतीची मूर्ती दाखवावा.
आता नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात मोदक, मिठाई, गूळ आणि फळे यांचा समावेश होतो.
यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी.
गणपतीची आरती करावी. गणेशाची आरती कापूरसह तुपात बुडवून एक किंवा तीन किंवा अधिक वाती बनवून केली जाते.
यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे.
आता गणपतीची प्रदक्षिणा घालावी. गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा.
यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी.
पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा.
पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा.
गाईला पोळी किंवा हिरवे गवत द्यावे. तुम्ही कोणत्याही गोठ्यात पैसे दान करू शकता.
रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे.
संध्याकाळी, चंद्र बाहेर येण्यापूर्वी, पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा. नंतर उपवास सोडावा.
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा Angarki Sankashti Chaturthi Story
गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं.
 
गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले. तो मुलागा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रेलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो. यावर गणेशानं, आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. `तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल, या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल.
 
तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील` असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं.
 
गणेशानं आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील".
 
ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१ संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे.
 
व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी पुन:स्नान करुन चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारे पूजन करावे. पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन‍ किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. अंगारकी महात्यमाची पोथी वाचावी. मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक, अडचण असल्यास फक्त उपोषण करुन गणेशस्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करुन उपास सोडावा. पूजा विधी करु नये.
अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून, चंद्रदर्शन करुनच उपवास सोडावा. 
गणेश अंगारकी श्लोक
गणेशाय नमस्तुभ्यं,
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं,
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश,
अंगारकाय नमोऽस्तुते ॥
 
तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.
 
फलश्रुति
संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतानप्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरुप राहते. भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, किर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. 21 संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते.
 
अंगारकी संकष्टी चतुर्थी का महत्व Angarika Sankashti Chaturthi Importance
'गणेश पुराण' आणि 'स्मृती कौस्तुभ' या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि विधी सांगितले आहेत. आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेशभक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात. अशा प्रकारे श्रीगणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात, असे मानले जाते.