1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय २९

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमदानंदतीर्थ गुरवे नमः ॥
जयजय आनंदकंदा जगद्गुरु भवाब्धि तारका कर्णधारु अज्ञान तिमिरांतक दिनकरु प्रकाश करिसी त्‍हृद्भुवनीं ॥१॥
तुझें स्मरण करितां रोकडें तुटे जन्म संसार सांकडें आसमास पुण्य जोडे ज्ञान वाढे विशेष ॥२॥
तुझी कथा करितां श्रवण मोह ममता जाय निरसोन पापी उत्‍धरती संपूर्ण तवकथा श्रवणीं बैसतां ॥३॥
गंगेची उपमा कथेसी जाणा देतो अश्लाघ्य वाटे मना स्नान करितां गंगाजीवना पातका दहन होतें खरें ॥४॥
परी अकर्म बुद्धीचें मूळ प्राणीयांचें न जाय समूळ कुसंगाचा होतां मेळ पाप निरंतर घडे तया ॥५॥
हरिकथा श्रवणी बैसतां सादर सद्गद होय सबात्द्य अंतर पापबुद्धीचा विस्तार पुनः न होय प्राणीयांतें ॥६॥
परीश्रम युक्त होऊनि पूर्ण त्यावरी सत्संगती करावी जाण मग भागवत शास्त्राचें करोनि श्रवण तयाचें मनन करावें ॥७॥
मननीं होय निजध्यास ध्यासें साक्षात्कार समरस त्यावरी वस्तूचा प्रकाश त्‍हृद्भुवनीं प्रकाशे ॥८॥
ऐशारितीं जे करिती श्रवण ते नर होती नारायण धन्य श्रवणाचे महिमान हरी समान जन होती ॥९॥
मागिले अध्यायांतीं कथन विप्रें केलें पुत्राचें दहन उत्तरकार्य संपादुन गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥१०॥
परी जीवना वांचोनि सरोवर बुबुळ नसतां विशाळ नेत्र तैसें बाळकावीण मंदिर शून्य दिसे विप्राचें ॥११॥
पुत्रा आठवोनि अंतःकर्णीं शोकें विव्हळ दिवारजनीं परी पतिव्रता सुळजा राणी संबोखी आपुले भ्रतारा ॥१२॥
आहो स्वामी सांडावा शोक नकळे ईश्‍वराचें कौतुक सूत्रधारी तो यदुनायक ठेवील तैसें रहावें ॥१३॥
प्रचीत ह्मणे ऐके वचन पुत्रही गेला मज टाकून आणि बाळ हत्येचें पातकपूर्ण माझिया माथां बैसलें ॥१४॥
ऐशी या पापापासूनि मुक्त व्हावया कोणतें आचरुं व्रत कोणतें पूजूं दैवत कोणत्या गुरुसीं शरण रीघों ॥१५॥
जाणतां नेणतां अकर्में घडती आंगीं पातकें समान जडती नानापरीच्या यातना होती यमलोकीं प्राणियांतें ॥१६॥
अहा रे सर्वेशा नारायणा कृष्णा गोविंदा मधुसूदना अच्युता अनंता जनार्दना केवीं यातना चूकती ॥१७॥
ऐसा विप्र यामिनी दिन चिंतातूर अती उद्विग्न बाळहत्येचें पापदारुण अपूर्व वर्तलें ऐकातें ॥१८॥
पति भक्ती परायणी ॥ सेवा करी सुळजा राणी रात्रीं भ्रतार असतां शयनीं वाती घेवोनि पाहातसे ॥१९॥
तों आपाद मस्तकापर्यंत शरीर व्यापोनि बैसलें अत्यंत नासिकीं मुखीं बुजबुजीत पू लशी येत शरीरांतुनी ॥२०॥
दुर्गंधी येत एकसरें देखोनि अंतरीं सुळजा झुरे अहारे गोविंदा मुरहरे हें काय वोखटें दाविसी ॥२१॥
ऐशारितीं सरली रजनी उदया पावला वास रमणी तों कृमी जंतु न दिसे नयनीं शरीर दिसे पूर्वंवत ॥२२॥
मनीं हर्ष मानी बहुत ह्मणे मज पावला रमाकांत कांहीं कोठें न बोले मात ठेवी गुप्त आपुले मनीं ॥२३॥
दिवस सरतां आली रजनी विप्र प्रसुप्त आपुले शयनीं सती पाहे दीपका घेऊनी तों शरी र जंतें व्यापिलें ॥२४॥
ठायीं ठायींची कृमींचीं जुवाडीं मास भक्षिती कडोविकडी ह्मणे बाळहत्या रोकडी कदां न सोडी भोगिल्यावीण ॥२५॥
वस्त्रें करोनी लसी पुसीत वरी औषध पेटे बांधित प्रभातें उठोनि पहात लसी कीटक न दिसती ॥२६॥
पती कारणें निवेदी गोष्टी हत्या लागली तुमचे पाठी रजनीं माजीं कृमींची दाटी शरीरीं होत्ये तूमच्या ॥२७॥
प्रचीत ह्मणे हत्या घडली ती कीटरुपें विस्तारिली तनूतें पीडिती सदा काळीं क्लेशयुक्त होविनियां ॥२८॥
आतां देहांत प्रायश्चित्त घेतल्यावीण नसे मुक्त नारी ह्मणे प्राणघात स्वामी सर्वथां करुं नये ॥२९॥
इश्‍वर भजनीं परायण असतां संतुष्टेल नारायण तो वर्षतां कृपेचा घन सहज पापाग्नी विझेल पैं ॥३०॥
ऐशिया रितीं पतिव्रता संतुष्टवी प्राणनाथा जंतू पडती रजनी होतां आंगै काढीत माउली ॥३१॥
पति भक्तीचें वाढलें पुण्य त्यावरी विप्राचें ईश्‍वर भजन ऐसे लोटतो ते दिन प्रारब्ध उदया पावलें ॥३२॥
शकट घेवोनि अरण्यांत इंधनातें गेला प्रचीत वनीं श्रमला तृषाक्रांत पाहतां उदक नसे कोठें ॥३३॥
तों देखिलें कुंडखदिर माजीं किंचित राहिलें नीर प्रचीत जाऊनि सत्वर करचरण प्रक्षाळिले ॥३४॥
वदन धुवोनि प्राशिलें जीवन आश्रमा आला शकट घेऊन सत्कर्म सारुनी केले भोजन रात्रीं सेजे पहुडला ॥३५॥
नारी जों पाहे पूर्ववत तों वदन चरण आणि हस्त सोज्वळ दिसती कृमीरहित वरकड शरीर नासलें ॥३६॥
हस्त चरण मुखाकडे कदापी न जाती जंतूकिडे ह्मणे पुण्य फळ रोकडें आजी दिसे मजलागीं ॥३७॥
नारी सुंदर ज्ञानवंत जागृत करी प्राणनाथ ह्मणे स्वामी पुण्यप्राप्त कोठें जालें तुह्मांतें ॥३८॥
हस्तचरण आणि वदन दोष विरहीत जालें पूर्ण कृमी लसी दुर्गंधी जाण तेथें नसे सर्वथा ॥३९॥
कालचे दिवसीं वनांत काय वर्तलें सांगा मातें येरु ह्मणे भरोनी रथ तृषाकांत जाहलों ॥४०॥
उदकालागीं फिरतां वनीं एक कुंड देखिलें नयनीं माजीं किंचित भरलें पाणी तेथें करचरण प्रक्षाळिले ॥४१॥
वदन धुवोनी प्राशिलें पाणी सवेंचि आलों आपुले सदनीं येरी ऐकतां संतोषेमनीं ह्मणे कार्य साधलें ॥४२॥
कुंड दाखवा प्राणनाथा ह्मणोनी चरणीं ठेविला माथा विप्र ह्मणे कामिनी आतां निद्राकरी सावकाशें ॥४३॥
उषःकाळीं अरंण्यातें ॥ जाऊनि कुंड दावीन तूतें ऐकतां ऐसीया वचनातें शयन करी पतिव्रता ॥४४॥
मनीं लागली बहू तळमळ केधवां उगवे रवी मंडळ सवेंचि होतां उषःकाळ सवेंचि उठवी प्राणनाथा ॥४५॥
शकट जुंपूनि ते वेळीं उभय दंपत्य वना आलीं कुंड पाहती वनस्छळीं परी तें कोठें न दिसे ॥४६॥
वनीं हिंडतां श्रमलीं पूर्ण दृष्टी न पडे कुंडस्थान, तेथें ऋषी लोमहर्षण तपोनिधी बैसला ॥४७॥
सुंदरी करी साष्टांग नमन उभी ठाकली कर जोडून ह्मणे आजी धन्य धन्य दर्शन लाभलें स्वामींचें ॥४८॥
मुनी ह्मणे वो पतिव्रते अटव्य वनांमाजीं दंपत्यें किमर्थ भ्रमतां उद्विग्न चित्तें कारण सत्य मज सांगा ॥४९॥
येरी ह्मणे वंदोनी चरण स्वामी माझिया पती कारण घडली बाळ ब्रह्म हत्या दारुण ॥ अवचट नेणतां ॥५०॥
त्या दोषें रात्रीचे प्रहरीं कृमी भरती समस्त शरीरीं उदय पावतांची तमारीं शरीर होय पूर्ववत ॥५१॥
येथींच्या कुंडीं पाहिलें पाणी हस्त पाद मुख प्रक्षाळुनी उदक प्राशिलें कालचे दिनी तितुकें जालें उत्तम ॥५२॥
ऐसीया कुंडीं करावें स्नान ह्मणोनि आमुचें आगमन परी स्वामींचें दर्शन पूर्वभाग्यें लाधलें ॥५३॥
आतां स्वामी कृपा युक्त होऊनि करावें पतीसी मुक्त ऐकतां लोमेश ऋषी ह्मणत भाग्य अद्भुत फळा आलें ॥५४॥
तरी तें पैलतीर्थीं स्नान खदिर कुंड नामाभिधान तेथें पतीसीं करवी स्नान महत्पातकें भस्म होती ॥५५॥
गर्जतां मुनी अमृतवाणी येरी ऐकतां संतोषमनीं जयजय श्रीगुरु ह्मणूनी लोटांगण घातलें ॥५६॥
प्रदक्षिणा आणि नमन करुनि चाले पतीस घेऊन खदिर कुंडीं येतां जाण कर्दमोदक देखिलें ॥५७॥
प्रचीत ह्मणे हेची स्थळ कालचे दिवसीं प्राशिलें जळ मग उभय वर्गीं आंघोळ करितीं जालीं अल्पोदकीं ॥५८॥
संध्या जप विष्णु स्मरण करुनि सारिलें भोजन मग लोम हर्षणातें नमून गृहालागीं पातलीं ॥५९॥
आल्हादती वारंवार स्मरती ते ईशवर अगाहे श्रीपते अह्मावर उपकार केलासी ॥६०॥
रात्रीं सेजे प्राणेश्‍वर क्लेशरहित जालें शरीर धन्यपतिव्रता सुंदर केला उत्धारपतीचा ॥६१॥
भ्रतार असतां दोषयुक्त स्त्रीपतिव्रता करी मुक्त असतां भ्रतार पुण्यवंत अवदशा आणीत दुष्ट स्त्रिया ॥६२॥
ऐसा खदिरकुंडाचा महिमा जाली वर्णावयाची सीमा भीष्म ह्मणे रायाधर्मा सादर प्रेमा असों दे ॥६३॥
स्वस्तीश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णिता माहात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु एकोनत्रिंशोऽध्याय गोड हा ॥२९॥
श्रीमुरुमर्दनार्पणमस्तु॥श्रीरस्तु॥