गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (12:38 IST)

जीवनाचे दक्षिणायन आणि उत्तरायण

एका गावामध्ये स्थिरावलेला एक धनाढ्य व्यापारी. चेहर्‍यावर सदैव स्मितरेषांचे रेशीमजाळे. तेथील ते एक छोटेसे सुपरमार्केटच होते. ग्राहकाने काहीही मागितले आणि ती वस्तू उपलब्ध नाही असे एकदा होण्याचे ही प्रमाण नगण्च! एखादेवेळी जरी असे झाले तरी नंतर ती वस्तू मागायला कोणीही आले तरी हमखास ती वस्तू तेथे उपलब्ध असणारच! स्वतःच शून्य भांडवलावर व्यवसाय सुरू करता येतो, यावर विश्वास ठेवणारा हा माणूस जगावेगळाच! मी त्यांना विचारले की, आपण एवढे मोठे कोट्यधीश झालात. त्यांच्या मते जन्माला येताना तरी आणि मरताना तरी माणसाजवळ काय असते? गोड बोलणे हेच माझे भांडवल. मी माझ्या बोलण्यातून रोज लोकांना तीळगूळ देतो. वस्तूची योग्य किंमत घेतो. गोड बोलणे फुकटच असते. त्याला कोठे पैसा लागतो? हा रास्त सवाल त्यांनी केला. 
 
मी प्रतिप्रश्‍न केला, 'तुमचा ग्राहकांशी कधी वादच होत नाही का? तुम्हाला भांडायचे नसले तरी समोरची व्यक्ती तुम्हाला भांडायला भाग पाडत असेल तर अशा वेळी तरी तुम्ही तिखट बोलतच असाल ना?' ते पुन्हा गोड हसतच म्हणाले, 'हे बघा! त्या वेळी मी कांहीच बोलत नाही. संयमाने शांत राहतो. त्या व्यक्तीकडे  पाहात प्रेमाने हसतो. त्यात त्याच राग संपून जातो. रागात असलेल्या माणसाला समजावता येत नाही. तो शांत झाला की त्याच्या रागावण्याचे कारण विचारतो. योग्य पद्धतीने शांतपणे मार्ग काढत राहतो. सचोटीचा व्यवहार करायचा. लबाडी नाही करायची. उधार द्यायचे नाही. रिटेल काऊंटरला रोखीने व्यवहार करायचे. पैसा रोख, माल चोख. वस्तूंचा वपार होतो. स्वाभिानाचा नाही. उधार नाही दिले, तर गिर्‍हाईकाला थोडावेळ वाईट वाटेल. पण त्याच्या-आपल्या नात्यात पैसा येत नाही. उधारीचा पैसा मागितला की माणसाचा स्वाभिमान जागा होतो आणि प्रेम झोपी जाते. व्यहवारात प्रेम पाहिजेच. पण प्रेमात व्यवहार नको. व्यवहारातही एक प्रेमाचे नाते असतेच. प्रेम दिल्याशिवाय कुत्रेमांजरही जवळ येत नाही, मग माणूस कसा येईल हो!
 
गोड बोलणे हेच जीवनसूत्र बनवून जीवनाचे संक्रमण करणार त्या शेठजींच्या सस्मित रेशीमजाळ्यात अडकून गेलो, याची लाही जाणीव झाली. कोणताही व्यवसाय असो वा कोणतीही नोकरी. व्यवसाय ही चोवीस तासांची नोकरी असते तरी नोकरी हा काही तासांचा व्यवसाय असतो. दोन्हीतही सचोटी, प्रामाणिकपणा व चिकाटी गरजेचीच असते. हे तिन्ही गुण असले तरी कामामध्ये व्यक्तीव्यक्तीमधील कौशल्यातील भिन्नतेमुळे अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत की माणसामाणसात संघर्षाच्या भिंती उभ्या राहातात. यात संघर्षातही स्वार्थ नावाचा एक गुण कमी अधिक प्रमाणात मिसळत असतो. हा गुण मात्र मोठा विचित्र व सत्त्वाची परीक्षा घेणारा असतो. या गुणांमुळे माणसा-माणसामधील व्यवहार पारदर्शी राहात नाही. आरशावर धूळ बसते आणि माणसे चेहरा पुसत बसतात. माणसाचा नेमका चेहरा कसा? हे कोणालाही कळू न देण्याची झाकली मूठ 'स्वार्थ' नावाचा गुण कधीही उघड होऊ देत नाही. स्वतःच्या वाढलेल्या किंवा वाढवलेल्या गरजा भागवण्यासाठी माणूस चेहर्‍यावर धूळ घेऊनच वावरत राहातो. गडबडगुंडा सुरू होतो.
 
माणूस नेमका कसा? हे स्पष्ट होण्यासाठी नात्यांचा आरसा स्वच्छ लखलखित ठेवावा लागतो. हा आरसा पुसायला झुठ्या व्यवहराने मळलेले कापड उपयोगी पडत नाही. यासाठी निखळ आणि विशुद्ध प्रेमाचे वस्त्रच  उपयोगी पडते. जीवन ही एक सृष्टीतल्या नात्यांची गुंतावळ आहे. कधी मनोहर तर कधी विचित्र अशी ही गुंतावळ श्वास सुटेर्पंत सुटता सुटत नाही. जीवनाचे दक्षिणायन घेऊन माणूस संक्रमणाला सुरूवात करतो. पुढे सरकेल तसे उत्तरायण सुरू होते. जीवनातही करसंक्रमणाचा एक काळ येतो. त्यावेळी तरी डोंगराएवढे की बाजरीएवढे? हे न कळणार्‍या मनावर दाटत असलेले धुके दूर व्हायला हवे. त्यासाठी मनामनात गुळाची व तिळाची स्निग्धता याचा सुरेल संगम व्हायला पाहिजे. गोड बोलणे नाटकीयही असू शकते. नियंत्याच्या  इच्छेने चाललेले जीवन हे एक अनेकांकी नाटक असले तरी भूमिका चोख पाहिजेत. भूमिकेत लबाडी नसायला हवी. आपापल्या भूमिकेशी एकरूप होता आले की 'गोड बोलणे हेच जीवन' हे तत्त्व सहज अंगवळणी पडायला मदतच होते. सत्यशील प्रेमाने गोड बोलणे ही माणसाची सवय झाली की, प्रत्येकाचे मकरसंक्रमण गोड होऊन जाईल. तीळगुळाची गोडी वर्षातून कांही दिवसच का असावी बरे! ती बारमाही का बरे टिकू नये ? याचा विचार प्रत्येक मकरसंक्रांतीला न ढवळून काढतो. निराशेची मळी दूर करून आशेची स्फटिककिरणे उधळीत सूर्यनारायण मनातले धुके दूर करत राहातो. मनामनावरचे धुके व्हावे दूर दूर.. माणसे जवळची असो.. नाहीतर दूरची.. जुळावेत सूर.. हा संदेश देत प्रत्येक वर्षी मकरसंक्रांत माणसा-माणसांच्या व्यवहारातील धुके दूर करत राहाते.
 
पक कलढोणे