मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (13:49 IST)

चातुर्मास म्हणजे काय, जाणून घ्या काही पदार्थ का खात नाहीत या काळात

Chaturmas
चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्यांचा काळ. चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण-भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस अंतर्भूत होतात.
 
हिंदू धर्मातील कालगणेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जो काळ अत्यंत पवित्र मानला जातो तो म्हणजे चातुर्मास. चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ. चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण-भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस अंतर्भूत होतात.
 
हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस व रात्र त्यामुळे चातुर्मासाचा काळ हा देवांच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागे होण्याचा काळ मानला जातो. आपल्याकडे या काळात मोसमी पाऊस सुरु असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा खऱ्या अर्थी चतुर्मासाची सुरुवात होते.
 
आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी देव निद्राधीन होतात त्यामुळे या एकादशीला देवशयनी अथवा शयनी एकादशी म्हटले जाते आणि कार्तिक शुक्ल एकादशीस देव निद्रेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीस बोधिनी अथवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेषनागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे दोन महत्वाचे दिवस आहेत.
 
चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपासून सर्व लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या काळात व्रते, विधी, दान आणि तपे केली जातात. त्यामुळे या काळात अनेक सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. भविष्यपुराण, स्कंदपुराण, निर्णयसिंधु, धर्मसिंधू, कार्तिक माहात्म्य, देवलस्मृती, गार्ग्यस्मृती इत्यादी धार्मिक ग्रंथांत चातुर्मासाचे महत्व प्रतिपादित करण्यात आले आहे.
 
याच काळात हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण म्हणजे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, दसरा व दिवाळी असतात त्यामुळे या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक व सात्विक वातावरण असते. जैन धर्मातही चातुर्मासाचे महत्व आहे.
 
चातुर्मासातील श्रावण महिना हा सुद्धा एक पवित्र महिना असून या महिन्यात लोक उपवास करून मद्य व मांसाहाराचा त्याग करतात याशिवाय कांदा, लसूण, वांगी इत्यादी पचनास कठीण असणारे पदार्थही वर्ज्य करतात. श्रावण महिन्यात पावसाळा असल्याने या पदार्थांनी आरोग्यास बाधा निर्माण होऊ नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अतिशय विचार करून ही तत्वे पाळावयास सांगितली आहेत.
 
 Edited By- Ratnadeep Ranshoor