शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By वेबदुनिया|

पितरांप्रती कृतज्ञतेचा श्राद्ध पक्ष

- ऋग्वेदी

प्रत्येक भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष पितृकार्यास अत्यंत योग्य आहे असे शास्त्रकारांनी ठरवले. याला अपरपक्ष असेही नांव आहे. यावेळी सूर्य कन्या राशीत असतो. या पक्षात पितरे यमलोक सोडून मृत्युलोकी आपल्या कुटुंबीय लोकांच्या घरी वास करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. सध्या भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपक्ष किंवा महालयपक्ष या नांवाने ओळखला जात असून तो या देशात सर्वत पितृकार्यासाठी योग्य व पवि‍त्र मानला जातो. 
 
भाद्रपद वद्य नवमी ही सौभाग्याने मृत झालेल्या स्त्रियांप्रित्यर्थ अधिकारपरत्वे पाळतात. गुजरातेत या अविधवा नवमीस 'डोशीनवम' असे म्हणतात. या दिवशी आई विधवा किंवा सधवा मयत झाली असेल तरी श्राद्ध करण्याचा प्रचार आहे. काठेवाडात 'बाळा भोळानी तेरस' हा वा।। 13 चा दिवस पाळतात. या दिवशी मयत झालेल्या लहान मुलांची आठवण करून त्यांच्याप्रित्यर्थ काकबळी दिला जातो. महाराष्ट्रात व गुजराथ काठेवाडात वद्य 14 स ज्यांना जखमा लागून मृत्यु आला असेल त्यांचे विशिष्ट श्राद्ध करण्याचा रिवाज आहे. या तिथीस 'घायाळ' चतुर्दशी अशी संज्ञा आहे. श्राद्धाच्या दिवशी तितर्पण, पिंडदान, ब्राह्मणभोजन वगैरे करण्‍याचे प्रकार सर्वास विदित आहेत. महालय पक्षात काही तिथी विविक्षित श्राद्धासाठी योग्य मानले आहेत.
 
भरणी चतुर्थी व भरणी पंचमी या दिवशी महालय पक्षाच्या साली मृत झालेल्या स्त्रीपुरुषांचे श्राद्ध केले जाते. ब।।9 मी ही अविधवा नवमी म्हणून प्रसिद्ध आहे. व।। 14 घात चतुर्दशी किंवा घायाळ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. त्या दिवशी अपघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. सर्वपित्री अमावास्या ही सर्व पितरांप्रित्यर्थ पाळण्याची श्राद्धतिथि आहे. महालयपक्ष भाद्रपद अमावास्येने संपतो तरी दुसर्‍या दिवशी म्हणजे अश्विन शु।।1 मुलीच्या मुलाने (दौहित्र) मातासह (आईच्या बापाचे) श्राद्ध करावे असे शास्त्रमत आहे. पुत्रसंतान नसलेल्या पितरांप्रित्यर्थ या श्राद्धाची योजना असावी. हे श्राद्ध केल्याचे विशेष कोठे दृष्टोत्पत्तीस येत नाही. याशिवाय मार्गशीर्ष व पौष कृ. अष्टमी माघ व फाल्गुन कृ. 8 मी या दिवशी विश्वेदेव, सूर्य, अग्नी, प्रजापती, रात्र व नक्षत्र यांप्रित्यर्थ श्राद्ध करावे, असे शास्त्रकारांनी सांगितले असून पुष्प, मांस, शाकभाजी वगैरे पदार्थ निरनिराळ्या तिथीस अर्पण करावे असा नियम घालून दिलेला आहे. 
 
परंतु आधुनिक कालात पितृ कार्यासंबंधानेच जेथे अनास्था वाढत आहे तेथे विश्वेदेवादिकांस संतुष्ट करण्याच्या भानगडीत कोण पडतो शास्त्रांत मात्र ही सर्व श्राद्धे निवेदन केलेली आढळतात. त्यांवरून पूर्वकाली देवकार्य व पितृकार्य यांबद्दल लोकांस किती आदर वाटत होता हे सिद्ध होते. 
 
हिंदुधर्माची उभारणी पितृभक्तीच्या पायवर झाली असून त्याच्या दिव्य मंदिराची रचना करणारांनी सूक्ष्म विचार करून आमच्या कर्तव्याकर्तव्याची दिशश ठरवून टाकिली आहे. देहाव्यतिरिक्त शाश्वत व निर्लेप जो आत्मा त्याचीसत्ता व मरणोत्तर त्याचे स्थित्यंतर या कल्पनांवर अनेक संस्कार अस्तित्वात आले. हिंदू व पारशी धर्मात प्रचलित असलेले अत्येष्टि संस्कार, त्यानंतर करण्यात येणारे विधी श्राद्धकल्प हे सर्व वरील कल्पनेमुळेच रूढ झाले.
 
देहाव्यतिरिक्त आत्मा असा कोणी नाही असे धर्माचे मत झाल्याच सहजच असे संस्कार रूढ होणे शक्य नाही. हिंदूधर्म पुनर्जन्माचे विश्वासाने प्रतिपादन करीत असून मरणोत्तर जीवात्म्यास कर्मानुसार उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ योनीत जन्म प्राप्त होतो, तसेच बर्‍यावाईट कर्माप्रमाणे त्याला स्वर्ग किंवा नरकवास घडतोअसे सांगत आहे. 'क्षणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति' या न्यायाने पुण्याचा संचय हाच स्वर्गात जाण्यास व तेथे रहाण्यास साधनीभूत असून त्याचा व्यय होता प्राणी मृत्युलोकावरजन्म घेतो असे गीतावाक्य आहे. स्वर्गात चढणे किंवा मृत्यूलोकी उतरणे या मार्गांला उपनिषत्कारांनी पितृयान असे नाव दिले असून ज्या मार्गाने जीव जन्ममरणाच्या फेर्‍यांतून कायमचा मुक्त होतो. त्याला देवयान असे नाव आहे.
 
('आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या पुस्तकातून साभार)