शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

वसंतपंचमी अर्थात श्रीपंचमी

वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. श्रीचा (लक्ष्मीचा) हा जन्मदिवस म्हणून ही श्रीपंचमी असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे श्रीसरस्वतीपूजनोत्सवाचा हा दिवस असल्यामुळे ही श्रीपंचमी, असेही म्हणतात. बंगाली लोक ह्या दिवशी सरस्वतीच्या प्रतिमा पूजतात. सरस्वतीचा नवसही करतात. आपले पारिवारिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे, यासाठी लोक कामदेव-रतीची पूजा करीत असावेत. काही ठिकाणी वसंतपंचमीला नवान्नेष्टी करतात. शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवतेला अर्पण करून नंतर भक्षण करावयाच्या असतात. मुलांचा विद्यारंभ या तिथीपासूनच होतो. काही धर्मशास्त्रकारांच्या मते कामदेव व वसंत ॠतू ह्यांचे निकटचे नाते पुराणांमध्ये वर्णिले असल्याने या दिवशी कामदेव-रतीचीही पूजा व प्रार्थना करावी, अशी प्रथा आहे. तथापि त्याप्रीत्यर्थ खास देवालये नसल्यामुळे लक्ष्मी व विष्णू यांची विविध उपचारांनी पूजा व प्रार्थना करून हा दिवस साजरा करण्यात येतो. 

वसंतपंचमीच्या दिवशी धार्मिक व्रतविधी फारसे नसतात. ह्या सणाचे लौकिक अंग अधिक ठळकपणे उठून दिसते. वसंत ॠतूत निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हसित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजक कार्यकमांतून व्यक्त होतो. आनंदप्रकटीकरण हाच या सणाचा उद्देश दिसतो. या दिवशी मुलांना कोणाच्याही बागेत जाऊन फळे तोडण्याची मुभा असते. काही ठिकाणी उत्साही मुले होळीसाठी लाकडे, गवत वगैरे गोळा करण्यास वसंतपंचमीपासून सुरुवात करतात.