सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (08:49 IST)

ब्रिटनमध्ये ऋषि सुनक यांच्या पक्षाचा पराभव, लेबर पार्टीची वाटचाल मोठ्या विजयाच्या दिशेने

ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची (लेबर पार्टी) विजयाकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाच्या मार्गावर आहे. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्षाची सत्ता येत आहे.
 
मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर इंग्लंडचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात. लेबर पार्टीला आतापर्यंत 60 जागा मिळाल्या आहेत, तर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ तीन जागा जिंकता आल्या आहेत. एक्झिट पोलनुसार लेबर पार्टीला 410 जागा मिळण्याची शक्यता आहे.
 
कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ 131 जागा मिळतील असा अंदाज आहे. सर कीर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानले आहेत. 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा विजय झाला आणि डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले होते
 
बीबीसी, आयटीव्ही आणि स्कायच्या एक्झिट पोलनुसार सर कीर स्टार्मर यांचा पक्ष 170 चा बहुमताचा आकडा गाठून डाउनिंग स्ट्रीटकडे जात असताना दिसत आहे. सध्या सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला 131 जागा मिळतील असं दिसत आहे.
 
आपल्या मतदारसंघात विजयी झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात, "आता आमच्यावर काम करण्याची जबाबदारी आहे."
 
'रिफॉर्म यूके' या पक्षाने हुजूर पक्षाच्या मतांमध्ये मोठं विभाजन केलं आहे. रिफॉर्म यूकेचे उमेदवार अनेक जागांवर दुसऱ्या स्थानावर आहेत. या पक्षाचा पहिला खासदार निवडून आला आहे. या पक्षाचे नेते निगेल फॅरेज यांचा निकाल येणे बाकी आहे.
 
हुजूर पक्षाची मते कमी झाल्यामुळे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला फायदा होताना दिसत आहे. त्यांना 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी हा निकाल 2010 नंतरचा सर्वोत्तम असेल.
 
स्कॉटलंडमध्ये लेबरचे वर्चस्व परत आल्याने स्कॉटिश नॅशनल पार्टी 38 जागा गमावण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या ग्रीन पार्टीला आपल्या खासदारांची संख्या दुप्पट करून दोनवर पोहोचण्याची संधी आहे. इतरांना 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
 
कोण आहेत कीर स्टार्मर?
एप्रिल 2020 मध्ये मजूर पक्षाचे नवीन नेते म्हणून सर कीर स्टार्मर यांची निवड झाली होती. स्टार्मर 61 वर्षांचे आहेत याआधी जेरेमी कॉर्बिन ब्रिटनमध्ये विरोधी लेबर पार्टीचे नेतृत्व करत होते. व्यवसायाने वकील असलेले स्टार्मर 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते.
 
लेबर पार्टीच्या नेत्याच्या निवडणुकीत, स्टार्मर पहिल्या फेरीतील मतमोजणीत 50 टक्क्यांहून अधिक मतांनी पुढे होते.
 
लेबर पार्टीचे नेते बनल्यावर स्टार्मर म्हणाले होते की, "या महान पक्षाला नवीन आशा आणि आत्मविश्वासाने एका नव्या युगात घेऊन जाण्याचा त्यांचा उद्देश आहे."
 
पक्षाने जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले की, "मी निवडून आलो ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि मला आशा आहे की, वेळ आल्यावर मजूर पक्ष सरकार स्थापन करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सक्षम असेल. "
 
Published By- Priya Dixit