शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:30 IST)

डोक्लाम वादा : चीनकडून पुन्हा एकदा भारताला इशारा

सिक्किम सीमेवरील डोक्लाम वादावरुन चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. आतापर्यंत चीनने खूप संयम दाखवला. मात्र सहनशीलतेचीही एक सीमा असते, अशा शब्दांमध्ये चीनने भारताला धमकी दिली आहे. ‘आतापर्यंत आम्ही डोक्लाम प्रश्नावर अतिशय चांगुलपणा दाखवला. मात्र आता भारताने संयमाचा अंत पाहू नये,’ असे म्हणत चीनने पुन्हा एकदा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने योग्य पावले उचलावीत,’ असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुआकियांग यांनी म्हटले आहे. ‘जेव्हापासून डोक्लाम वादाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच चीनने अतिशय चांगुलपणा दाखवला. डोक्लाम प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी चीनकडून कुटनितीचाही वापर करण्यात आला आहे. द्विवपक्षीय संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी चिनी सैन्याने आतापर्यंत खूप संयम बाळगला आहे. मात्र संयमाचीदेखील काही सीमा असते,’ अशा शब्दांमध्ये गुनकियांग यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे.