रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 13 डिसेंबर 2023 (12:38 IST)

मुलांना लपवलं पोत्यात, गरोदर बायको आणि वडिलांचा अस्थिकलश कवटाळून खवळलेल्या समुद्रातून त्यानं सोडला देश

sea boat
जीन मॅकेंझी
ही गोष्ट आहे 2023 साली झालेल्या एका थरारक घटनेची. किम यांनी आपल्या कुटुंबासकट उत्तर कोरियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खवळलेल्या समुद्रातून आपली गरोदर बायको, आई, भावाचं कुटुंब आणि वडिलांच्या अस्थींचा कलश असा त्यांनी प्रवास केला. त्याचीच ही कहाणी
 
यावर्षी उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात येणारे ते पहिलेच कुटुंब असावं. कारण कोव्हिड काळात उत्तर कोरिया सरकार अक्षरशः घाबरलं होतं त्यांनी देशाच्या सीमा सील करून टाकल्या होत्या आणि सगळ्या जगाशी संपर्कच तोडला होता. व्यापारही बंद केला होता. त्यामुळे एकेकाळी असं उत्तर कोरिया सोडून जाणं जवळपास सामान्य मानलं जाई ते सुद्धा बंद झालं होतं.
 
ही सुटका कशी करुन घेतली, त्याची आखणी कशी केली याची माहिती किम यांनी बीबीसीला दिली. कोरोना लाटेनंतर प्रथमच अशी एखादी देशांतर करणाऱ्या व्यक्तीची-कुटुंबाची कहाणी मुलाखतीच्या स्वरुपात येत आहे.
 
किम यांनी तिथं उत्तर कोरियात कशाप्रकारे लोक भुकेनं मरत आहेत आणि दडपशाही कशी वाढत चालली आहे याची माहिती या मुलाखतीत दिली. आपलं सेऊलमध्ये असलेलं कुटुंब आणि उत्तर कोरियात असलेले आप्त यांच्या काळजीपोटी त्यांनी आपलं पूर्ण नाव वापरू नये अशी विनंती केली.
 
बीबीसीनं त्यांच्या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही पण इतर सूत्रांद्वारे मिळालेली माहिती आणि किम यांचं कथन भरपूर जुळताना दिसतं.
 
त्या रात्री समुद्र चांगलाच खवळलेला होता. वारं भयंकर वेगानं वाहात होतं, या जोरदार घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे वादळासारखीच स्थिती तयार झाली होती. अर्थात हीच स्थिती किम यांच्या उत्तर कोरियातून निसटायच्या ‘प्लॅन’मध्ये अपेक्षित होती.
 
या खवळलेल्या समुद्रामुळे गस्त घालणाऱ्या बोटी समुद्राऐवजी बंदरात परतलेल्या असतील असा त्यांनी अंदाज बांधलेला होता. झोपेच्या गोळ्या देऊन ठेवल्या असल्यामुळे त्यांच्या भावाची मूलं गाढ झोपी गेली होती.
 
आता त्या मुलांना किम आणि त्यांच्य भावाला खाणकाम सुरू असलेल्या भागातून त्यांची बोट जिथं लावून ठेवली होती त्या धक्क्यापर्यंत न्यायची होती. तिथं गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या सर्चलाईटच्या झोतांना टाळून हे करणं भाग होतं.
 
असं सगळ्यांना चुकवत चुकवत ते एकदाचे बोटीपर्यंत पोहोचले. बोटीत बसल्यावर त्यांनी भावाच्या मुलांना पोत्यात घातलं आणि जणू एखादी वस्तुंची पोती असावीत असं भासवण्याचा प्रयत्न केला. मग एकदाची त्यांची बोट दक्षिणेला जायला सज्ज झाली.
 
बोटीतल्या पुरुषांकडे तलवारी आणि बायकांकडे विष अशा शस्त्रांनिशी ते जायला निघाले. प्रत्येकाच्या हातात एक अंड्याचं कवचही होतं. या अंड्यातला आतला सगळा पांढरा-पिवळा बलक काढून टाकला होता. त्यात तिखट आणि काळी वाळू भरुन ठेवली गोती. जर तटरक्षक दलाची माणसं आली आणि त्यांच्याशी हातघाईचा प्रसंग आला तर त्यांच्या तोंडावर मारायला हे शस्त्र त्यांनी तयार ठेवलं होतं.
 
बोटीचं इंजिन जोरात धडधडू लागलं खरं. पण किम यांचं हृदय त्यापेक्षा जास्त जोरात धडधड होतं. आता एखादी चूक जरी झाली तर शिरच्छेदाशिवाय नशिबात दुसरं काहीही वाढलं नव्हतं.
 
मी किम यांना गेल्या महिन्यात सेऊलमध्ये (दक्षिण कोरियाची राजधानी) भेटलो. तेव्हा देशांतर केलेल्या इतर लोकांप्रमाणे त्यांच्याही बरोबर एक साध्या वेशातला पोलीस अधिकारी होता.
 
पुनर्वसनगृहातून काही आठवड्यांपूर्वी त्यांचं कुटुंब बाहेर पडलं आहे. (उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात आलेल्या देशांतरित कुटुंबांना, लोकांना काही काळ अशा पुनर्वसन गृहांमध्ये ठेवलं जातं)
 
किम मला गेल्या 4 वर्षांचा अनुभव सांगत होते, 'तिथं नुसत्या यातनाच होत्या.'
 
"कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात लोक फारच घाबरलेले होते. सरकारी वाहिन्या आम्हाला जगभरात लोक मरुन पडत आहेत अशी माहिती देत होत्या आणि जर आम्हीही नियम पाळले नाहीत तर देश नष्टच होईल असं सांगितलं जात होतं. कोव्हिड नियम मोडणाऱ्या काही लोकांना थेट श्रमछावण्यांमध्येच पाठवलं गेलं."
 
"एखादा जरी संशयित रुग्ण सापडला तर अख्खं गाव विलगिकरणात (क्वारंटाइन) टाकलं जायचं. सर्वांना घरांतच कोंडलं जायचं, सगळा परिसरच सील केला जायचा. अडकलेल्या लोकांना खायलाप्यायला काहीच मिळायचं नाही."
 
"असं काही काळ भुकेनं त्रास झाल्यावर सरकारने खाण्या-पिण्याचे पदार्थ आणायला सुरुवात केली. आपण कमी किंमतीत हे देतोय असं लोकांना सांगायला सुरुवात केली म्हणजे लोक त्यांना दुवा देतील. म्हणजे असं पाहा, आधी तुमच्या मुलांना भुकेलं ठेवायचं मग कमी किंमतीत सामान द्यायचं आणि लोक धन्यवाद देतील अशी अपेक्षाही करायची."
 
हा सगळा कोरोना लाटेतूनही पैसा कमवायचा सरकारी मार्ग आहे का असा प्रश्न लोक विचारू लागले होते. कोरोना लाट ओसरल्यावर लोक म्हणू लागले सरकारने नाहक या स्थितीचा बागुलबुवा केला होता.
 
किम सांगतात, "हा सगळा आम्हाला दडपण्यासाठी वापरलेला एक मार्ग होता असं अनेकांना वाटतं."
 
ते सांगतात, "सीमा बंद केल्यामुळे सर्वात जास्त फटका बसला. अन्नधान्याच्या बाबतीत उत्तर कोरिया अनेक बाबतीत पराधीन आहे. त्यामुळे सीमा बंद झाल्यावर वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या. यामुळे सर्वांचंच जगणं फार कठीण झालं. 2022 च्या वसंतात तर ही स्थिती जास्तच बिघडली."
 
"साधारण सात-आठ वर्षात भूकबळींचा विषय फारसा कानावर यायचा नाही. पण या काळानंतर मात्र ते वारंवार कानावर येऊ लागलं. एखाद्या दिवशी उठावं आणि सहज कानी यायचं की अमूक एका परिसरात एक भूकबळी गेला. दुसऱ्या दिवशी आणखी कोणीतरी... इतकं सहज होऊन गेलं होतं."
 
त्या वर्षी फेब्रुवारीत घडलेला एक प्रसंंग किम सांगतात. ते म्हणाले, "आमच्या शेजारच्या गावातील एक माणूस त्यांना भेटला होता. त्याच्या गावात एक वृद्ध जोडपं मृत्युमुखी पडल्यावर त्यांच्या हत्येचा संशय पोलिसांनी गावातल्या प्रत्येक व्यक्तीवर घेतला गेला. पण नंतर तपासणीनंतर ते भूकेमुळे मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं. मरताना त्यांची बोटं आणि टाचा उंदरांनी खाल्ल्या असाव्यात असंही पोलिसांनी जाहीर केलं. त्यांचा भयावह मृत्यू पाहून पोलिसांनी हत्या झाली असावी असा विचार केला होता."
 
एप्रिल महिन्यात आपल्या अगदी ओळखीचे दोन शेतकरी भूकेमुळे मेले असं किम सांगतात. पिकपाणी व्यवस्थित न आल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसल्याचं ते म्हणाले.
 
किम सांगत असलेल्या मृत्यूंची आम्ही स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. उत्तर कोरियानं सीमा बंद केल्यामुळे या देशातल्या अन्नसुरक्षेची सुयोग्य माहिती मिळणं आव्हानात्मक आहे मात्र तिथली स्थिती बिघडत चालली आहे याचे संकेत मिळतात असं 'द 2023 ग्लोबल रिपोर्ट ऑफ फूड क्रायसिस'मध्ये म्हटलं आहे. 2023 मार्चमध्ये उत्तर कोरियाने वर्ल्ड फूड प्रोग्रॅमकडे मदत मागितली होती.
 
अम्नेस्टी इंटरनॅशनलचे उत्तर कोरियातज्ज्ञ चोई जे-हून सांगतात, "जे लोक पूर्वी देशांतर करुन सेऊलला आलेल्या ज्या लोकांनी आपल्या उत्तर कोरियातल्या लोकांशी संपर्क केला होता त्यांना तिथं भूकबळीच्या घटना घडल्याचं समजलं होतं." या लोकांनी आपल्या ही माहिती दिल्याचं ते सांगतात.
 
"कोव्हिड काळात ही स्थिती अधिक बिघडली आणि शेतकऱ्यांना जास्त फटका बसला असल्याचं आमच्या कानावर आलं आहे", असं चोई सांगतात. परंतु 1990च्या दुष्काळाइतकी भीषण परिस्थिती नव्हती असंही चोई सांगतात. "आता उपलब्ध साधनांत कसं जगायचं हे लोक शिकले आहेत", असं आमच्या कानावर आलेलं आहे.
 
कोरानापूर्व काळात किम यांनी इतर लोकांप्रमाणे काळ्याबाजारात वस्तू विकून पैसे मिळवले होते. चीनमधून मोटरसायकल, टीव्हीसारख्या वस्तू तस्करी करुन आणल्या जातात, त्या विकून उत्तर कोरियात पैसे मिळवले जायचे.
 
पण कोरोना काळात सीमा सील झाल्यावर सगळाच व्यवहार ठप्प झाला. मग ते भाजी विकत घेऊन त्याची विक्री करू लागले.
 
त्या काळात आमची स्थिती या पिकावरुन त्या पिकावर उड्या मारणाऱ्या टोळांसारखी झाली असं ते सांगतात. एका वस्तूच्या व्यवसायानंतर दुसऱ्या वस्तूचा व्यवसाय असं करू लागले. ज्या गोष्टीची गरज सध्या आहे, त्या गोष्टीचा व्यवसाय करणं भाग पडलं.
 
"लोक मी अन्नपदार्थ विकावेत यासाठी माझ्याकडे अक्षरशः भीक मागायचे. मी वाटेल त्या किंमतीला ते विकायचो. इतक्या श्रीमंतीचा अनुभव कधीच घेतला नव्हता", असं ते सांगतात.
 
रात्रीच्या जेवणाला चांगलं जेवायला मिळायचं असं ते म्हणतात. जेवणात पाहिजे त्या प्रकारचं मटण असायचं.
 
किम यांच्या आयुष्याकडे पाहिलं की ते एक हुशार व्यक्ती असल्याचं दिसतं. कधी ते कसलाही विधिनिषेध न पाळणारे व्यावसायिकही वाटतात. आता ते तिशीत आहेत. उत्तर कोरियातील व्यवस्थेत कसं जगायचं हे त्यांनी गेलं दशकभरात आत्मसात केलं होतं.
 
हा झाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अर्धा भाग. कारण त्यांचा त्याच व्यवस्थेने फार लवकर भ्रमनिरास केला. त्यांना जितकं आठवतंय त्यानुसार अगदी सुरुवातीपासून ते त्यांच्या वडिलांबरोबर गुपचूप दक्षिण कोरियाच्या वाहिन्या पाहायचे. ते सीमेजवळ राहात असल्याने त्यांच्याकडे दक्षिण कोरियन वाहिन्यांचं प्रक्षेपण सहज दिसायचं. टीव्हीवर दिसणारं दक्षिण कोरियातलं हे मोकळं वातावरण त्यांना मोहून टाकणारं होतं.
 
जसं वय वाढेल तसं त्यांना उत्तर कोरियातल्या भ्रष्टाचाराचा अनुभव येऊ लागला. त्यांना एक प्रसंग आठवतो. ते सांगतात एके दिवशी त्यांच्या घरी सुरक्षा अधिकारी पोहोचले होते. त्यांनी घरावर छापा टाकला आणि म्हणाले, तुमच्याजवळ असलेलं सगळं राष्ट्राच्या म्हणजे सरकारी मालकीचं आहे. त्यावर किम यांनी विचारलं होतं, 'मग मी घेत असलेला ऑक्सिजनही तुमच्याच मालकीचा आहे का?' त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘नाही मूर्खा’ असं उत्तर दिलं होतं.
 
2021 साली किम यांच्या घरी ‘समाजविघातक वर्तन’ दडपण्यासाठी सरकारी दल आलं होतं असं ते सांगतात. हे दल लोकांना लोकांना रस्त्यातही अडवायचं आणि भीती दाखवायचं. लोक त्यांना रक्तशोषक डासच म्हणायचे.
 
देशाबाहेरची माहिती मिळवणं त्यातही दक्षिण कोरियातली माहिती घेणं हा गंभीर गुन्हा होता. किम सांगतात, "एकदा का तुम्ही हे करताना सापडलात तर ते तुम्हाला गोळी घालू शकतात, मारू शकतात किंवा थेट श्रमछावणीत पाठवू शकतात."
 
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात, त्यांच्या ओळखीच्या एका 22 वर्षाच्या मुलांना सर्वांच्यादेखत गोळी घालून मारण्यात आलं आणि ते आम्हाला पाहायला लावलं असं किम सांगतात. दक्षिण कोरियातली 70 गाणी ऐकली, 3 सिनेमे पाहिले आणि आपल्या मित्रांतही ते वाटले असा त्याच्यावर आरोप होता. त्याला जबर शिक्षा करायची होती जेणेकरुन लोकांना शिक्षा किती कठोर होऊ शकते हे समजेल असं अधिकारी म्हणत होते. ते सगळे लोक निष्ठूर होते असं किम सांगतात. त्या शिक्षेमुळे सर्वजण घाबरले होते.
 
या हत्येची आम्ही स्वतंत्रपणे तपासणी केलेली नाही. पण डिसेंबर 2022मध्ये उत्तर कोरियात एक नवा कायदा संमत झाला. त्यानुसार दक्षिण कोरियातली अशी माहिती प्रसारित करणं मृत्यूदंडास पात्र ठरू शकते अशी तरतूद करण्यात आली आहे.
 
उत्तर कोरियातील लोकांच्या मानवाधिकार संस्थेचे जोआना होसानिअॅक सांगतात, "किम यांनी सांगितलेल्या गोष्टी आजिबात धक्कादायक नाहीत."
 
जोआना यांनी गेल्या दशकभरात किम यांच्यासारख्य़ा शेकडो देशांतरितांच्या मुलाखती घेतल्या आहेत. "लोकांवर जरब बसवण्यासाठी उत्तर कोरियानं अशा उघड्यावर देहदंड देण्याच्या शिक्षेचा नेहमीच वापर केला आहे", असं त्या सांगतात. तिथं येणारा प्रत्येक नवा कायदा अशा देहदंडांची लाटच घेऊन येतो.
 
किम यांना हे सगळं आठवताना फार त्रास होत होता. "या त्रासाला कंटाळून त्यांच्या मित्राने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. आपल्यावर प्रेम नसणाऱ्या बायकोला घटस्फोट देऊन त्याला दुसरं लग्न करायचं होतं. पण घटस्फोट घ्यायचा असेल तर श्रमछावणीत काम करावं लागेल असं त्याला सांगण्यात आलं. मरण्यापूर्वी तो कर्जबाजारी झाले होता."
 
त्याच्या मृत्यूनंतर किम त्याच्या शयनगृहात गेले होते. "मृत्यूपूर्वी तो किती त्रासातून गेला असेल हे समजत होतं असं ते सांगतात. त्यानं नखं तुटून बाहेर येईपर्यंत भिंतीवर नखं मारलेली दिसत होती." असं ते सांगतात.
 
उत्तर कोरियातून निसटायचा अनेकवेळा विचार केला असला तरी किम आपल्या कुटुंबीयांना मागे ठेवून निसटण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. 2022 साली अगदीच घायकुतीला आल्यावर आता आपण आपल्या कुटुंबीयांच्याही गळी इथून निसटण्याची कल्पना उतरवू शकतो असं त्यांना वाटलं.
 
त्यांनी आधी आपल्या भावाला कह्यात घेतलं. त्यांचा भाऊ आणि त्यांची वहिनी माशांचा व्यवसाय करतात. मात्र सरकारने नुकतीच बेकायदेशीर विक्रेत्यांवर टाच आणली होती. त्यामुळे बोट असूनही तो मासेमारी करू शकत नव्हता. त्यामुळे चांगल्या भविष्याचं स्वप्न दाखवून तो सहज राजी झाला.
 
पुढचे सात महिने हे दोघे तिथून पळायचं कसं याचं नियोजन करत होते.
 
कोरोनाकाळात उत्तरेच्या चीन सीमेला लागून असणाऱ्या नेहमीच्या पळवाटा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र हे दोघे भाऊ देशाच्या एकदम वायव्य टोकाला दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ एका मासेमार गावात राहात होते. त्यांनी दुसऱ्या पण जोखमीच्या मार्गाचा विचार केला. तो म्हणजे समुद्रमार्ग.
 
त्यांना पहिलं पाऊल टाकायचं होतं ते म्हणजे पाण्यात जाण्याच्या परवानगीचं. जवळच्या एका लष्करी तळाबद्दल त्यांनी ऐकलं होतं. तिथं लोकांना मासेमारी करण्यास लोक जात आणि मग ते लष्करी उपकरणांसाठी विकले जात. या योजनेत किम यांच्या भावानं नाव नोंदवलं.
 
दरम्यानच्या काळात किम यांनी तटरक्षक आणि संरक्षक दलाच्या लोकांशी मैत्री करायला सुुरुवात केली. त्यांच्या हालचाली कशा होतात, त्यांचे नियम, त्यांच्या कामाच्या पाळ्या यांची माहिती गुपचूप काढून घेतली.
 
आता त्यांना सर्वात अवघड काम करायचं होतं. ते म्हणजे त्यांची पत्नी आणि वृद्ध आईला या कामासाठी राजी करणं. दोघीही याला विरोध करत होत्या. मग त्यांनी थोडा आवाजही वाढवला. जर आई आली नाही तर आम्हीही जाणार नाही मग संभाव्य वाईट स्थितीला तीच कारणीभूत असेल अशी भाषाही वापरली.
 
आईनं त्रागा केला, 'ती रडली पण शेवटी ती कबूल झाली', असं किम सांगतात.
 
पण त्यांची बायको तिथून बाहेर न पडण्याच्या मतावर जास्तच ठाम होती. पण एकेदिवशी ती गरोदर असल्याचं समजलं आणि मग सगळं बदललं.
 
किम यांनी तिला सांगितलं, "आता तू एका जिवाची नाहीयेस, तू आई होणार आहेस, तू मुलाला या नरकासारख्या जागी राहू देणार आहेस का?" असं भावनिक भाषेत विचारल्यावर मात्रा लागू पडली. बायकोही तिथून बाहेर पडायला तयार झाली.
 
किम यांच्याशी अनेक तास बोलल्यावर आम्ही रात्री जेवायला बसलो. तिथं त्यांनी मला त्यांच्या पलायनाच्या दिवसाबद्दल सांगितलं.
 
आपण दक्षिण कोरियात पळालो आहोत हे लक्षात आल्यावर तिथले अधिकारी त्यांच्या वडिलांच्या थडग्याची नासधूस करतील हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्या दोघा भावांनी त्यांंची कबर उकरली, वडिलांच्या देहाचे अवशेष बाहेर काढले. ती जागा होती तशीच केली आणि त्या अवशेषांना दूर मोकळ्या जागी नेऊन जाळलं.
 
मग ते दूर असलेल्या खाणकामक्षेत्रातून अंधारात बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला गेले. तिथं गेलं असताना त्यांनी आपण औषधी वनस्पती गोळा करायला आलो आहोत असं भासवलं. याचवेळी त्यांनी कोणत्या मार्गानं निसटायचा विचार केला. त्या परिसरामध्ये लोकांनी पळून जाऊ नये म्हणून तेथे भूसुरंग पेरलेे होते.मात्र तिथं सुरक्षारक्षक फार कमी संख्येनं होते, त्यामुळे हा एक सुरक्षित मार्ग होता.
 
आता फक्त योग्य वेळेची, हवामानाची आणि समुद्राच्या योग्य स्थितीची वाट पाहायची होती.
 
6 मे रोजी रात्री 10 वाजता ते या प्रवासाला निघाले. ओहोटीमुळे खडकाळ भाग बाहेर आला होता. प्रवाळ खडक आणि मोठे दगड पाण्याबाहेर आले होते. त्यामुळे त्यांना फार संथ प्रवास करावा लागत होता. रडारमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची होती. या सगळ्या काळात किम यांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांचा शर्ट घामानं भिजला होता.
 
असंच पुढं गेल्यावर ते एका प्रवाहावर वेगानं आरुढ झाले. किम यांनी मागं वळून पाहिलं तेव्हा एक जहाज पाठलाग करताना दिसलं पण ते फार दूर होतं. काही मिनिटांतच त्यांनी उत्तर कोरियाची समुद्रसीमा ओलांडली.
 
"त्यावेळी आमचा ताण कमी झाला. मला आता मी कोसळतोय की काय असं वाटायला लागलं. दक्षिण कोरियाच्या येऊनप्येओंग बेटाजवळ गेल्यावर आम्ही प्रकाशझोत टाकले मग नौदलाने आमची सुटका केली. जवळपास आम्ही 2 तास पाण्यात होतो."
 
"सगळं अगदी ठरल्याप्रमाणं झालं, जणू देवानंच आम्हाला मदत केली होती", असं ते सांगतात.
 
"किम यांची ही सुटका अनेक कारणांनी लक्षणीय ठरते", असं सोकील पार्क सांगतात. त्या उत्तर कोरियातून दक्षिणेत आलेल्या लोकांना पुनर्वसनासाठी मदत करणाऱ्या लिबर्टी संस्थेत कार्यरत आहेत. समुद्रमार्गाने बाहेर पडणं अत्यंत दुर्मिळ आहे त्य़ातही कोरोनानंतर असं देशांतर अगदी अशक्यच झालं आहे.
 
"अशा सुटकेसाठी एकदम काटेकोर नियोजन, अतुलनीय साहस आणि अगदी चमत्कारासारखं सगळंकाही ठरल्याप्रमाणे होणं आवश्यक असतं. अनेक उत्तर कोरियन लोकांनी असा प्रयत्न केला असणार", असं त्या सांगतात.
 
जे. एम मिशनरीचे पास्टर स्टिफन किम सांगतात, "जे लोक देशांतर करुन आले त्यांची स्थिती आता चांगली आहे." जे.एम. मिशनरी उत्तर कोरियातील लोकांना चीनमार्गे देशांतर करण्यास मदत करते. ते म्हणाले, "दरवर्षी साधारण 1000 लोक चीन सीमा ओलांडतात. पण गेल्या 4 वर्षांत माझ्या माहितीनुसार 20 लोकांनी सीमा ओलांडली आहे."
 
ह्युमन राइट्स वॉच संघटनेने यावर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनवर काही देशांतरित लोकांना पुन्हा उत्तर कोरियात पाठवल्याचा आरोप केला होता.
 
प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी, इथे अर्थ उत्तर कोरियन सरकार) चीन आणि रशियाशी संबंध वाढवत आहे आणि पश्चिमेतील देशांकडे पाठ वळत आहे. त्यामुळे तिथल्या मानवाधिकाराबद्दलचे प्रश्न सोडवण्यात अडथळे येत आहेत.
 
दक्षिण कोरियाने उत्तर कोरियन लोकांचे मानवाधिकार हा प्राधान्याचा विषय केला आहे. पण त्यांचे एकीकरण राज्यमंत्री मून सेऊंग ह्यूंग सांगतात, 'त्याचा फार मर्यादित उपयोग आहे.'
 
"संयुक्त राष्ट्र आणि इतरत्र हा विषय मांडून आम्ही लोकजागृती वाढवत आहोत. युनायटेड किंग्डम, जर्मनीसारख्या युरोपिय देशांचं उत्तर कोरिया ऐकतो. परंतु दक्षिण कोरियाची भूमिका उत्तरेतून आलेल्या आश्रितांना समुपदेशन, घरं पुरवणे, शिक्षण देणे इथपर्यंतच मर्यादित राहिली आहे."
 
किम आणि कुटुंब दक्षिणेत आल्यावर द. कोरियन गुप्तचरविभागाने त्यांची चौकशी केली, ते हेर नाहीत याची खात्री केली. त्यानंतर पुनर्वसन केंद्राबद्दल त्यांना सांगण्यात आलं. त्यांचं गाव फार लांब नसलं तरी ही दोन पूर्णपणे वेगळ्या जगांची बात होती. देशांतरित लोकांना या बदलाच्या प्रवासात फार त्रास होतो.
 
ऑक्टोबर महिन्यात किम यांच्या पत्नीने बाळाला जन्म दिल्यावर त्यांचं कुटुंब पुनर्वसन केंद्रातून एका सदनिकेत आलं. ती आता बरी असली तरी तिला इथं जुळवून घेण्यात त्रास होतोय.
 
सर्वात जास्त त्रास त्यांच्या आईला होतोय. त्यांच्यापैकी कोणीही भूमिगत रेल्वेने प्रवास केला नव्हता. ती नेहमीच कुठेतरी हरवून जाते. प्रत्येकवेळच्या या त्रासामुळे तिच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. तिला इथं आल्याचा पश्चाताप होतो, असं ते कबूल करतात.
 
पण किम द. कोरियन संस्कृतीशी आधीच ओळख असल्यामुळे सहज जुळवून घेत आहेत. मी आजवर ज्याचा विचार केला होता ते जग आणि ही स्थिती एकसारखीच आहे, असं ते सांगतात.
 
बोलताबोलता त्यांनी माझे एअरपॉ़ड्स हातात घेतले. ते काय आहे ते त्यांना समजलं नाही. मी त्यांना ते वायरलेस हेडफोन असल्याचं सांगितलं पण तरिही त्यांना ते नीट कळलं नाही. शेवटी मी ते त्यांच्या कानात घातले, ते सुरू केले मग त्यांना कळलं आणि ते हसू लागले. अशा अनेक धक्क्यांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. ही तर सुरुवात आहे.
 
(अतिरिक्त वार्तांकन- होसू ली आणि लिह्युन चोई, चित्रं- लिली ह्युन्ह)