इंडो- म्यानमार‘मैत्री पूल’खुला
भारत - म्यानमारला जोडणारा इंडो- म्यानमार ‘मैत्री पूल’वापरासाठी म्यानमारने खुला केला आहे. मणीपूर सीमेजवळील मोरेह शहरातून जाणारा हा पूल खुला झाल्याने म्यानमारमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींना आता विशेष परमीटची गरज भासणार नाही. ही सीमा खुली झाल्याने दोन्ही देशातील मैत्रीपर्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ११ मे रोजी म्यानमार दौऱ्यावर असताना दोन्ही देशातील ही सीमा खुली करण्याबाबत करार झाला होता.
तामू- मोरेह या सीमेसह भारत म्यानमार सीमेजवळील चीन प्रातांतील रिखावदार आणि मिझोरामच्या जोखावतार या सीमाही खुल्या करण्यात आल्या आहेत. या सीमा खुल्या झाल्याने दोन्ही देशांचे नागरिक विनापरवाना एकमेकांच्या देशात १६ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकणार आहेत. रस्तेमार्गाने जोडण्यासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच ६९ पूलांच्या नुतनीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गांमुळे म्यानमारशी असलेले भारताचे संबंध सुधारणार आहेत.