शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (18:01 IST)

भारतासोबतच्या वादाचा मालदीवला किती तोटा होऊ शकतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला वाद आता मालदीवपर्यंत पोहोचला आहे.
 
नरेंद्र मोदी आणि भारताबाबत आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केलं आहे.
 
मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर भारतीय नागरिकांनी तर विरोध केलाच पण मालदीवच्या काही राजकारण्यांनीदेखील या विधानांचा विरोध केला आहे.
 
मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगावर या वादाचा विपरीत परिणाम होऊ शकतो हेही म्हटलं गेलंय.
 
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाण्याचा सल्ला दिला.
 
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोजवर अनेक भारतीयांनी आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला फिरायला जायला हवं असं मत व्यक्त केलं.
 
अशा ट्वीटला उत्तर देताना मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी लक्षद्वीपशी मालदीवची तुलना करणं योग्य नाही असं म्हणत काही आक्षेपार्ह विधानं केली.
 
मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
 
भारतातून मालदीव गाठणं सोपं आहे आणि अतिशय कमी वेळेत तिथं जाता येतं.
 
मालदीवचा व्हिसा काढण्यासाठी पैसे लागत नाहीत. भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानांची संख्या भरपूर आहे पण लक्षद्वीपला जाण्यासाठी मात्र कमी विमानं आहेत.
 
मात्र मालदीव आणि लक्षद्वीप यांची तुलना केली तर पर्यटकांच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.
 
मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या किती आहे?
7 जानेवारीला इज माय ट्रिप नावाच्या कंपनीने भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानांची बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक मालदीवला जातात. मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय सोशल मीडियावर मालदीवचे हजारो फोटो पोस्ट केले गेलेत. अनेकांसाठी मालदीव हे ड्रीम डेस्टिनेशन राहिलेलं आहे.
 
मालदीवमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये मालदीवला येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या ही पाचव्या क्रमांकावर होती.
 
त्यावर्षी मालदीवमध्ये 14 लाख 84 हजार 274 पर्यटक आले होते त्यापैकी सुमारे 6.1 टक्के म्हणजेच 90 हजार 474 पर्यटक हे भारतातील होते.
 
2019 मध्ये ही संख्या दुपटीने वाढली त्यावचारही 1 लाख 66 हजार 030 भारतीय पर्यटक मालदीवला गेले. 2020 मध्ये कोरोना आला आणि मालदीवला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली. मात्र त्याही वर्षी 63,000 भारतीय मालदीवला गेले.
 
2021मध्ये 2.91 लाख आणि 2022 मध्ये 2.41 लाख भारतीय पर्यटक मालदीवला गेले. सध्या भारत हा मालदीवला पर्यटनासाठी जाणारा सगळ्यांत मोठा देश बनला.
 
तुम्हाला मालदीवबद्दल हे माहितीय का?
मालदीवमधील 'माल' हा शब्द 'माला' या मल्याळम शब्दापासून आला आहे. त्यामुळे माल म्हणजे माळ आणि दीव म्हणजे बेट. या दोन्ही शब्दांपासून मालदीव हा शब्द तयार झालाय.
 
1965 ला मालदीव स्वतंत्र झालं. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर काहीकाळ तिथे राजेशाही होती, पण नोव्हेंबर 1968 मध्ये मालदीव प्रजासत्ताक देश बनला.
 
मालदीव भारताच्या नैऋत्येला आहे. भारतातील कोची पासून मालदीव सुमारे एक हजार किलोमीटरवर आहे.
 
मालदीव हा 1200 बेटांचा समूह आहे. यातली बहुतेक बेटं निर्जन आहेत. मालदीवचं क्षेत्रफळ 300 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच दिल्लीच्या आकारापेक्षा पाच पटींनी लहान असा हा देश आहे.
 
मालदीवमध्ये सुमारे चार लाख लोक राहतात.
 
मालदीवमध्ये धिवेही आणि इंग्रजी या दोन भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात.
 
मालदीवच्या एकाही बेटाची उंची सहा फुटांपेक्षा जास्त नाही. मालदीवला हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका आहे.
 
मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी एक चतुर्थांश भाग हा पर्यटनातून येतो.
 
2019 मध्ये मालदीवमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 20 लाख होती. मात्र, कोरोनाच्या काळात ही संख्या रोडावली होती. मालदीवला पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
 
गेल्या वर्षी भारतातून सुमारे दोन लाख लोक मालदीवमध्ये गेले होते. 2021 मध्ये सुमारे तीन लाख भारतीय मालदीवला फिरायला गेले होते. 2022 मध्ये त्यात थोडीशी घट झाली आणि ही संख्या सुमारे अडीच लाखांवर पोहोचली.
 
मालदीवच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा किती?
मालदीव असोसिएशन फॉर टुरिजम इंडस्ट्रीने दिलेल्या आकडेवारीनुसार मालदीवच्या एकूण जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा 25.2 टक्क्यांचा आहे.
 
मालदीवच्या सरकारला मिळणारं एकूण उत्पन्न आणि परकीय चलनाच्या साठ्यात पर्यटनाचा वाटा सगळ्यांत मोठा आहे.
 
केवळ चार लाख लोकसंख्या असलेल्या मालदीवमध्ये दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक येतात.
 
मालदीवमध्ये1972 ला पहिलं रिसॉर्ट उघडण्यात आलं आणि आज तिथे 175 रिसॉर्ट्स, 14 हॉटेल्स, 865 गेस्ट हाऊस, 156 क्रूझ जहाजे, 280 डायव्ह सेंटर्स, 763 ट्रॅव्हल एजन्सी आहेत.
 
कोणत्या देशातून, किती लोक मालदीवमध्ये येतात?
भारत: 2 लाख 5 हजार
 
रशिया : 2 लाख 3 हजार
 
चीन : 1 लाख 85 हजार
 
यूके: 1 लाख 52 हजार
 
जर्मनी : 1 लाख 32 हजार
 
इटली : 1 लाख 11 हजार
 
अमेरिका : 73 हजार
 
मालदीवमधली प्रेक्षणीय ठिकाणं कोणती आहेत?
येत्या 26 जानेवारीला कोचीहून मालदीवला जायचे असेल तर विमानाच्या तिकिटासाठी तुम्हाला सुमारे 10 हजार रुपये खर्च करावे लागतील. तिथे पोहोचायला दोन तासांचा प्रवास करावा लागेल.
 
मालदीवमधली काही प्रेक्षणीय ठिकाणं
 
सन आयलंड
ग्लोइंग बीच
फिहालाहोही आयलंड
माले शहर
आर्टिफिशियल बीच
मामीगिली
बर्‍याच ट्रॅव्हल वेबसाइट्सनुसार, जानेवारी ते एप्रिल हा मालदीवला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. मालदीवमध्ये मे ते सप्टेंबरपर्यंत पर्यटकांची गर्दी कमी असते.
 
लक्षद्वीप कुठे आहे?
लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपपासून मालदीव 700 किलोमीटर अंतरावर आहे. लक्षद्वीप हे केरळच्या कोचीपासून 440 किलोमीटर अंतरावर आहे.
 
लक्षद्वीप हा 36 लहान बेटांचा समूह आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येथील 96 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. लक्षद्वीपचे क्षेत्रफळ सुमारे 32 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच ते मालदीवच्या क्षेत्रफळाच्या 10 पट कमी आहे. लक्षद्वीपमध्ये सुमारे 64 हजार लोक राहतात.
 
लक्षद्वीपमधल्या 10 बेटांवर मानवी वस्ती आहे. कवरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय ही ती बेटं आहेत. बित्रा बेटावर फक्त 271 लोक राहतात आणि बंगाराम नावाच्या निर्जन बेटावर फक्त 61 लोक राहतात.
 
लक्षद्वीप बेटांवर मल्याळम भाषा बोलली जाते. फक्त मिनिकॉय बेटावर लोक माहे बोलतात, माहे भाषेची लिपी धिवेही आहे. मालदीवमध्येही हीच भाषा बोलली जाते.
 
मासेमारी आणि नारळाची शेती हे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योगही झपाट्याने वाढला आहे.
 
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 25 हजार लोक लक्षद्वीपला गेले होते. म्हणजे ही संख्या मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येपेक्षा जवळपास आठ पट कमी आहे.
 
कोचीपासून लक्षद्वीपला जहाजाने 12 तासांत पोहोचता येतं. इथे जाण्यासाठी किती पैसे लागतील हे तुम्ही कोणत्या बेटावर आणि किती दिवसांसाठी जाणार आहात यावर अवलंबून आहे. लक्षद्वीपमध्ये हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.
 
लक्षद्वीप पहिल्यांदा कधी चर्चेत आलं?
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा त्यांनी अनेक विकास योजनांचं उदघाटन केलं होतं.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, नरेंद्र मोदींनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा दौरा आखला होता.
 
लक्षद्वीप दौऱ्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "2020 मध्ये, मी तुम्हाला वचन दिले होते की पुढील 1000 दिवसांत लक्षद्वीपमध्ये वेगवान इंटरनेट असेल." आज सुरू झालेला ऑप्टिकल फायबर प्रकल्प तुम्हाला आधीच्या पटीने 100 पट वेगवान इंटरनेट स्पीड देईल.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत असंही म्हटलं आहे की, भाजपला आजवर केरळमध्ये राजकीयदृष्ट्या प्रवेश मिळालेला नसताना लक्षद्विपमार्गे भाजप केरळमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतं.
 
प्रफुल्ल पटेल हे 2020 पासून लक्षद्वीपचे प्रशासक आहेत. लक्षद्वीपमध्ये कधी गोमांस बंदीच्या निर्णयावरून तर कधी शुक्रवारची सुट्टी बदलून रविवारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.
 
लक्षद्वीपची संवेदनशीलता लक्षात घेऊन भारतीय तटरक्षक दलाची एक चौकी तिथे बनवण्यात आलेली आहे. याशिवाय आयएनएस द्विपरक्षक नौदल तळही बांधण्यात आला आहे.
 
गेल्या वर्षी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती तेंव्हा लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांचीही खासदारकी रद्द करण्यात आली होती.
 
11 जानेवारी 2023 ला लक्षद्वीप न्यायालयाने राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 
त्यानंतर दोन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली. 25 जानेवारी 2023 रोजी केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला दहा वर्षांसाठी स्थगिती दिली होती.