शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 11 जुलै 2017 (09:29 IST)

लंडनमधील ऐतिहासिक मार्केटला भीषण आग

पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या कॅम्डेन लॉक मार्केटला भीषण आग लागली आणि त्यामध्ये या मार्केटचा काही भाग जळून खाक झाला. लंडन शहरामध्ये महिन्याभरापूर्वीच बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 80 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभुमीवर आजची आग ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. मात्र आजच्या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
 
पहाटेच्या सुमारास लागलेली ही आग वेगाने पसरली. जवळपासच्या इमारतींनाही या आगीने वेढल्यामुळे स्फोट होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. सुमारे 70 फायरफायटर्स आणि 10 बंब आग विझवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही आग आता नियंत्रणात आणली गेली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आपत्कालिन सेवा सक्रिय असून संबंधित घटनेची चौकशी केली जात आहे, असे स्कॉटलंड यार्डने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
 
याच बाजारपेठेमध्ये यापूर्वी दोनवेळा अशीच मोठी आग लागली होती. फेब्रुवारी 2008 मध्ये या परिसरातील एक पब आणि 90 स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. तर 2014 मध्ये लागलेल्या आगीमुळे 600 जणांना स्टेबल्स मार्केटमधून जीव वाचवण्यासाठी बाहेर पळावे लागले होते. या मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी दरवर्षी 28 दशलक्ष ग्राहक भेट देतात.