शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , शनिवार, 7 जुलै 2018 (11:58 IST)

पाकचे माजी पंतप्रधान शरीफ यांना 10 वर्षांचा तुरुंगवास

मुलगी मरियला सात वर्षांची शिक्षा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडनमधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने शरीफ यांना 80 लाख पौंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला 2 लाख पौंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
न्यायालयाने या संदर्भातला निर्णय एक आठवडा उशिराने द्यावा यासंदर्भातली याचिका शरीफ यांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. एवनफिल्ड हाऊसमध्ये 4 घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लंडनमध्ये शरीफ यांनी बेकायदेशीररीत्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्या सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नाही तर मरियम यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आहे.
 
शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रकरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले. आता त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे.