तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष: काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला - अधिकारी
काबूल विमानतळावर धमाक्याचे जोरदार आवाज ऐकू आल्याचं वृत्त आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये काही इमारतींच्या वर काळा धूर आसमंतात पसरलेला दिसतो आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने जोरदार स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विमानतळाजवळच्या घराजवळ रॉकेट येऊन आदळल्यामुळे हा स्फोट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. विमानतळाला या स्फोटाचा थेट फटका बसलेला नाही असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. स्फोटात जीवितहानी झाली आहे का यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही.
काबूल विमानतळावर आणखी हल्ले होऊ शकतात - जो बायडन
काबूल विमानतळावर कट्टरवाद्यांकडून आणखी हल्ले होऊ शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला होता. रविवारी (29 ऑगस्ट) पुन्हा विमानतळावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचं बायडन यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकन नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. हल्ल्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लोकांनी विमानतळाच्या मुख्य रस्त्यापासून दूर राहावं, असं मंत्रालयाने म्हटलं. अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्याचं काम अमेरिकेकडून अजूनही सुरू आहे. दुसरीकडे ब्रिटनने आपले सैनिक, राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे.
गुरुवारी काबूल विमानतळाजवळ एक आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट संघटनेची प्रादेशिक शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट खुरासानने घेतली होती.
काबूल विमानतळावरील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने शुक्रवारी कारवाई केली होती. अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून ISIS-K 2 कट्टरवाद्यांना ठार केलं. दोघेही काबूल विमानतळ हल्ल्याचे सूत्रधार असल्याचं अमेरिकेने म्हटलं. ही अखेरची कारवाई नव्हती. ज्यांनी कुणी काबूल विमानतळावर हल्ला केला. त्यांना सोडणार नाही. त्यांना किंमत चुकवावी लागेल, असं जो बायडन म्हणाले आहेत.
सध्या अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हातात आहे.तालिबानने अमेरिकेच्या एअर-स्ट्राईकचा निषेध नोंदवला आहे. अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वी आपल्याला सांगायला हवं होतं, असं तालिबानने म्हटलं आहे.
अमेरिकन सैनिकांनीही काबूल विमानतळ सोडणं सुरू केलं आहे. आता काबूल विमानतळावर 4 हजारपेक्षाही कमी सैनिक आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या 5800 होती. पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अफगाण नागरिकांना काबूल विमानतळावर जाण्यापासून रोखण्यासाठी तालिबानने विमानतळाच्या चारही बाजूंना नाकाबंदी केलेली आहे. गेल्या दोन आठवड्यात अफगाणिस्तानातून 1 लाख 10 हजार अफगाण तसंच परदेशी नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे.