शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (17:34 IST)

अणुबॉम्बच्या स्फोटातून वाचलेल्या लोकांना अजूनही कशाची भीती वाटतेय?

nuclear bomb
ती सकाळची वेळ होती. दिवस नुकताच सुरु झाला होता. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात उष्णता होती. जपानच्या हिरोशिमा शहरात राहणाऱ्या चिको किरियाके यांनी घाम पुसला आणि त्या सावलीत जाऊन बसल्या. तेव्हा अचानक डोळ्यांना अंधाऱ्या आणणारा लख्ख प्रकाश पडला. असा प्रकाश जो त्यांनी याआधी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता.
 
हा दिवस होता 6 ऑगस्ट 1945 आणि सकाळचे 8 वाजून 15 मिनिटे झाली होती.
त्या क्षणाविषयी बोलताना चिको सांगतात, “असं वाटलं की सूर्य पृथ्वीवर कोसळला आणि तेव्हाच मलाही चक्कर आली.”
अमेरिकेने चिको यांच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब फेकला होता. तेव्हा जागतिक महायुद्धात पहिल्यांदाच अण्वस्त्रांचा वापर झाला होता.
 
त्याचवेळी जर्मनीने युरोपमध्ये शरणागती पत्करली होती. तर अमेरिकेसहित मित्र राष्ट्रांचे सैन्य जपान विरुद्ध लढत होते.
 
जपानमध्ये हिबाकुशा कोणाला म्हणतात?
चिको तेव्हा शाळेत जात होत्या. पण त्यांना युद्धाच्या वेळी कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी पाठवले होतं.
 
अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जखमी मैत्रिणीला पाठीवर घेऊन त्या त्यांच्या शाळेत पोहोचल्या होत्या. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी भाजल्याचं त्या सांगतात.
 
मुलांच्या भाजलेल्या अंगावर चिको यांनी शाळेत उपलब्ध असलेलं तेल लावलं.
 
"आम्ही त्यांच्यावर तो एकच उपचार करू शकलो. ते सर्व एकेक करुन मरण पावले. हल्ल्यातून वाचलेल्या माझ्यासारख्या वयाने मोठ्या मुलांना शिक्षकांनी खेळाच्या मैदानात खड्डा खणण्याची सूचना दिली. तिथंच वर्गमित्रांना मी माझ्या हाताने दफन केलं," असं चिको सांगतात.
चिको सध्या 94 वर्षांच्या आहेत.
 
हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून जवळपास 80 वर्षे झाली आहेत. त्या हल्ल्यातून वाचलेल्या पीडित व्यक्तींना जपानमध्ये 'हिबाकुशा' म्हणून ओळखलं जातं.
 
अशा हिबाकुशा व्यक्तींकडे त्यांच्या गोष्टी शेअर करण्यासाठी आता जास्त वेळ उरलेला नाहीये. कारण यापैकी सर्व लोक आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहेत.
अणुबॉम्ब स्फोटातून वाचलेल्या लोकांना अनेक आजार झाले. अशा अवस्थेत ते पुढचं आयुष्य जगले.
 
या हल्ल्यात अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं. काहींना आयुष्यात भेदभावाचाही सामना करावा लागला.
 
जपानमधील या लोकांच्या आयुष्यावर बीबीसीने नुकतीच एका डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे.
 
अणुबॉम्ब हल्ल्यात जखमी झालेल्या मिचिको
अणुबॉम्ब हल्ल्यानंतर शहर काही दिवसांनी हळूहळू रुळावर येऊ लागलं होतं. याच हल्ल्यातून मिचिको वाचल्या होत्या. तेव्हा त्या बाल्यावस्थेत होत्या.
 
“लोक म्हणायचे आता पुढचे 75 वर्षं इथं गवतही उगवणार नाही. पण पुढच्याच वर्षी वसंत ऋतूमध्ये गवत उगवलं आणि चिमणी आणि पाखरंही आली,” असं मिचिको सांगतात.
 
मिचिको सांगतात की, त्यांनी आयुष्यात मृत्यूने अनेकदा हुलकावणी दिलीय. बॉम्बस्फोटातून जीव वाचलेले काही लोक जपानमध्ये आजही हयात आहेत.
हिबाकुशाचा शब्दशः अर्थ "बॉम्बग्रस्त लोक" असा होतो. आता ते लोक वयोवृद्ध झाले आहेत.
आजच्या जगात संघर्ष वाढत असताना, अणुयुद्धाचा धोका पूर्वीपेक्षा जास्त खरा वाटतोय, असं हे लोक सांगतायत.
मिचिको कोडामा आता 86 वर्षांच्या आहेत.
 
त्या सांगतात, "आज जगात संघर्ष सुरू आहे. (उदा. इस्रायल वि. हमास, युक्रेन वि. रशिया) त्याविषयी मी जेव्हा विचार करते, तेव्हा माझं शरीर थरथर कापू लागतं. डोळ्यात पाणी येतं. आपण अणुबॉम्बच्या नरकात पुन्हा जाऊ नये. पण मला त्या संकटाची चाहूल दिसू लागलीय.”
जगातील सर्व अण्वस्त्रे नष्ट करावीत यासाठी मिचिको लढा देतायत.
जगाने हिबाकुशा लोकांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. कारण त्यांनी अणुबॉम्बचा स्फोट प्रत्यक्षात पाहिला आहे, असं त्या सांगतात.
 
हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला तेव्हा मिचिको 7 वर्षांच्या होच्या. त्या सांगतात, “माझ्या वर्गाच्या खिडक्यांमधून तेजस्वी प्रकाश आमच्या दिशेने येत होता. त्याचा रंग पिवळा, केशरी आणि चांदीसारखा दिसत होता. वर्गाच्या सगळ्या खिडक्या धाडकन फुटल्या. छत तुटून खाली पडले. मी डेस्कखाली लपून माझा जीव वाचवला.
स्फोटाचा तडाखा कमी झाल्यावर त्यांनी आजूबाजूला पाहिलं. तेव्हा अनेक मुलांचे हात आणि पाय ढिगाऱ्याखाली अडकले होते.
"मी वर्गातून व्हरांड्याकडे निघाली तेव्हा, प्रत्येकजण 'माझी मदत कर, माझी मदत कर,' असं म्हणत होते.
काहीवेळाने मिचिको यांचे वडील आले. त्यांनी मिचिको यांना पाठीवर घेऊन घरी गेले.
“घरी जाताना चिखलांचा पाऊस पडत होतो. ते किरणोत्सर्गी पदार्थ आणि स्फोटाचे अवशेष यांचे मिश्रण होते. घरी जातानाचा तो प्रवास मी कधीच विसरणार नाही,” असं मिचिको सांगतात.

नागासाकीमध्ये एकाचवेळी 75 हजार लोकांचा मृत्यू
मिचिको पुढे सांगतात, "नरकासारखं वातावरण झालं होतं. काही लोक आमच्या दिशेने धावत होते, त्यांचे बहुतेक कपडे पूर्णपणे जळाले होते आणि त्यांचे शरीर वितळत होतं."
 
मिचिको यांनी वाटेत एक बेवारस मुलगी पाहिली होती आणि ती पूर्णपणे भाजली होती.
" संपूर्ण भाजलेल्या त्या मुलीचे डोळे मात्र उघडे होते. ते आजही मी विसरू शकत नाही. 78 वर्षे उलटली तरी ते दृश्यं पुन्हा पुन्हा आठवतं," असं मिचिको म्हणाल्या.
मिचिको यांचं कुटुंब त्यादिवशी त्यांच्या जुन्या घरात राहिले असतं तर त्यांच्यापैकी कुणीच वाचले नसते.
ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकण्यात आला त्या ठिकाणापासून त्यांचं जुनं घर फक्त 350 मीटर अंतरावर होतं. पण सुदैवाने मिचिको यांचं कुटुंब 20 दिवसांपूर्वीच काही किलोमीटर अंतरावर स्थलांतरित झालं होतं. यामुळे कुटुंबाचा जीव वाचला.

अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बस्फोटात सुमारे 1 लाख 40 हजार लोकांचा जीव गेला. तर तीन दिवसांनंतर नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यामध्ये जवळपास 74 हजार लोकांचा जीव गेला.
सुइची किडो नागासाकी स्फोटाच्या केंद्रापासून फक्त 2 किमी अंतरावर राहत होते
त्यावेळी ते पाच वर्षांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा काही भाग जळाला होता. आईने त्यांना वाचवलं. पण आईला गंभीर दुखापत झाली होती.
 
सुइची सध्या 83 वर्षांचे आहेत.
जगाला अण्वस्त्रांचा किती धोका आहे, यावर बोलण्यासाठी त्यांनी नुकतंच न्यूयॉर्कला जाऊन संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भाषण केलं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला हिबाकुशा म्हणून जगावं लागलं. पण इतर कुणालाही अशा परिस्थितीतून जायची वेळ येऊ नये, असं आम्हाला वाटतं.”
अणुबॉम्ब स्फोटाच्या धक्क्याने बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना जाग आली. तेव्हा आईवडिलांनी सांगितलं की हा स्फोट तेलाच्या बाटलीमुळे झाला आहे. पालकांना सुइची यांच्यापासून अणुबॉम्ब स्फोटाची गोष्ट दूर ठेवायची होती. सुइची यांनाही त्यांनाही अनेक वर्षं तसंच वाटलं.
पण शेवटी त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा ते ढसाढसा रडले होते.
 
‘हिबाकुशांसोबत अनेकांनी लग्न करण्याचं टाळलं’
स्फोटानंतर दोन्ही शहरातील अनेकांना रेडिएशनची लक्षणे दिसू लागली. तसेच ल्युकेमिया, कॅन्सर यांसारख्या आजारांची पातळी वाढली.
वाचलेल्या लोकांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागला. विशेषत: त्यांच्याशी लग्न करण्याचं अनेकांनी टाळलं.
आम्ही हिबाकुशांना घरात प्रवेश देत नाही, असं सुइची यांना सांगण्यात आलं. पण नंतर सुइची यांनी लग्न केलं आणि त्यांना दोन मुले झाली.
कर्करोगामुळे त्यांनी आई, वडील आणि भाऊ गमावले. 2011 मध्ये त्यांच्या मुलीचाही या आजाराने मृत्यू झाला.
 
नागासाकी बॉम्बस्फोटातून वाचलेल्या कियोमी इगुरो त्यावेळी 19 वर्षांच्या होत्या
त्यांचं दूरच्या नातेवाईकाच्या कुटुंबात लग्न करण्यात आलं. तेव्हा त्यांचा एकदा गर्भपता झाला. पण हे सगळं अणुबॉम्ब स्फोटामुळेच घडल्याचं त्यांच्या सासरच्या लोकांना वाटायचं.
एवढंच नाही तर आपल्याला अणुबॉम्बस्फोटाची झळ बसलीय, हे शेजाऱ्यांना सांगू नकोस अशी सक्त ताकीद देण्यात आली.
 
बीबीसीला मुलाखत दिल्यानंतर कियोमीचा मृत्यू झाला आहे. तेव्हा त्या 98 वर्षांच्या होत्या. या वयातही त्या नागासाकीमधील पार्कमध्ये जायच्या आणि शांततेसाठी प्रार्थना करायच्या. तिथं अणुबॉम्ब स्फोट झाला त्या वेळ म्हणजे 11.02 वाजता बेल वाजवायच्या.
 
अणुबॉम्ब स्फोटातून वाचलेल्या व्यक्तींवर बीबीसी टू ने निर्मित केलेली डॉक्युमेंट्री 31 जुलै 2024 रोजी बीबीसी iPlayer वर प्रसारित करण्यात आली.
Published By- Priya Dixit