शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:14 IST)

सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम यंदाच्या स्पर्धेमध्ये कोण मोडणार?

आयपीएलचा 14 वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असे अनेक विक्रम पाहिले आहेत जे क्षणात बनले आणि क्षणात मोडले गेलेही. असाच एक विक्रम आहे तो म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा. यंदाच्या हंगामात जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडेल याकडेही क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे.
 
जलद अर्धशतकवीर
के. एल. राहुल
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सध्या   तरी पंजाब किंग्जचा के. एल. राहुल याच्या नावावर आहे. त्याने  2018 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने या डावात 16 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. त्वरत  त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते.
 
युसूफ पठाण आणि सुनील नारायण
सर्वात वेगवान अर्धशतकाच्या यादीत दुसर्यार स्थानावर असलेल्या युसूफ पठाणने 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते तर 2017 मध्ये सुनील नारायणने 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसे बघायला गेले तर दुसर्याय स्थानावर या दोघांचीही दावेदारी आहे. पण, युसूफपठाणने या वेगवान अर्धशतकाचे रुपांतर मोठ्या खेळीत केले. त्याने हैदराबादविरुद्ध 22 चेंडूत 72 धावा ठोकल्या. दुसर बाजूला नारायणला आपल्या अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. त्याची आरसीबीविरुद्धची ही आक्रमक अर्धशतकीय खेळी 17 चेंडूत 54 धावांत आटोपली. त्यामुळे पठाणच्या या अर्धशतकाचे महत्त्व किंचित जास्त आहे.
 
सुरेश रैना
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 2014 च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 87 धावांची खेळी करताना 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याचे हे अर्धशतक आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.
 
ख्रिस गेल
आयपीएलमध्ये षटकारांचा बादशाह म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे ख्रिस गेल. गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. ही आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. ही खेळी करतानाच गेलने 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याचे हे अर्धशतक आयपीएल इतिहासातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक म्हणून गणले जाते.