शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (15:11 IST)

कोहलीने गांगुलीशी हस्तांदोलन नाकारलं? झेल घेतल्यावर टाकला कटाक्ष

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यात अजूनही शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
 
विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स संघाचा अविभाज्य भाग आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असलेल्या कोहलीने शनिवारी झालेल्या लढतीत 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. 3 झेलही टिपले. कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाचे ‘डिरेक्टर ऑफ क्रिकेट’ यापदी कार्यरत आहेत.
 
सामना संपल्यानंतर दोन्ही संघातले खेळाडू, सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करतात. बंगळुरूने सामना जिंकला आणि बंगळुरूचे खेळाडू दिल्ली संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्याशी हस्तांदोलन करु लागले. विराट कोहलीने दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं. बाकी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलन केलं पण सौरव गांगुली यांच्याशी हस्तांदोलन केलं नाही.
 
सामनादरम्यान सीमारेषेनजीक झेल घेतल्यावर कोहलीने दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुली यांच्याकडे पाहून कटाक्ष टाकला होता.
 
विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते. कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यावरून या दोघांमध्ये बेबनाव झाला होता.
 
सोशल मीडियावर याचा व्हीडिओ व्हायरल झाला. ट्वीटरवर गांगुली आणि कोहली यांच्या नावाने हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. बंगळुरू-दिल्ली सामना बंगळुरूने जिंकला पण चर्चा या शीतयुद्धाची रंगली.
 
9 डिसेंबर 2021 रोजी गांगुली म्हणाले होते, “आम्ही विराटला ट्वेन्टी20 कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली. ट्वेन्टी20 कर्णधार बदलण्याची कोणतीही योजना नव्हती. पण विराटने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. निवडसमितीला असं वाटलं की वनडे आणि ट्वेन्टी20 अशा दोन प्रकारांसाठी दोन वेगळे कर्णधार असू नयेत”. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय वनडे संघाचं कर्णधारपदावरून कोहलीला बाजूला करत रोहित शर्माकडे ट्वेन्टी20 आणि वनडेचं कर्णधारपद सोपवलं.
आठवडाभरानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषदेदरम्यान गांगुली यांनी जे सांगितलं त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली. कोहली म्हणाला होता, “भारतीय ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी बीसीसीआयशी संपर्क केला होता. माझ्या निर्णयामागची कारणं मी स्पष्ट केली होती. मी ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडू नये असं मला सांगण्यात आलं नाही. उलट मी ट्वेन्टी20 कर्णधारपद सोडणं ही भविष्याचं दृष्टीने योग्य भूमिका आहे असं सांगण्यात आलं. त्याचवेळी मी हे स्पष्ट केलं की मला टेस्ट आणि वनडे प्रकारात कर्णधारपदी राहायला आवडेल. अर्थात यासाठी बीसीसीआय आणि निवडसमितीलाही तसंच वाटायला हवं. मी माझ्या बाजूने अतिशय स्पष्टपणे सगळं सांगितलं होतं”.
 
विराटने हेही सांगितलं की, “दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडीच्या बैठकीपूर्वी दीड तास आधी मला वनडे कर्णधारपदावरून बाजूला केल्याचं सांगण्यात आलं”.
फेब्रुवारी महिन्यात एका खाजगी वाहिनीने निवडसमितीचे प्रमुख चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यामध्ये चेतन शर्मा यांनी गांगुली-कोहली वादासंदर्भात त्यांची भूमिका मांडली होती.
 
शर्मा म्हणाले होते, “वनडे कर्णधारपदावरुन बाजूला करण्यात गांगुली यांची भूमिका आहे असं कोहलीला वाटलं म्हणून त्याने गांगुली यांच्या भूमिकेपासून फारकत घेतली. ट्वेन्टी20 कर्णधारपद सोडण्यापूर्वी एकदा विचार कर असं गांगुली कोहलीला म्हणाले होते पण व्हीडिओ कॉन्फरन्ससमध्ये ते त्याला ऐकायला गेलं नसावं”.
 
“विराटला असं वाटलं की बीसीसीआय अध्यक्षांमुळे त्याचं वनडे संघाचं कर्णधारपद गेलं. व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या निवडसमितीच्या त्या बैठकीला 9 जण उपस्थित होते. पण कोहलीला गांगुली काय म्हणाले ते ऐकायला गेलं नसावं”, असं शर्मा यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, “गांगुली आणि कोहली यांच्यादरम्यान अहंकाराचा मुद्दा आहे. वनडे कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे कोहलीने गांगुली यांचा दावा खोडून काढला. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही कोहलीने गांगुली यांचं म्हणणं खोडून काढलं. ही अहंकाराची लढाई आहे. कोहली भारतीय संघाचा कर्णधार आहे. गांगुली हेही भारतीय संघाचे कर्णधार होते. दोघांनाही देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. कर्णधार म्हणून यशस्वी आहोत असं दोघांना वाटणं साहजिक आहे”.
 
बंगळुरूचा दिल्लीवर विजय
बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 174 धावांची मजल मारली. विराट कोहलीने 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीतर्फे मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीने पॉवरप्लेच्या 6 षटकात निम्मा संघ गमावला. मनीष पांडेने 50 धावांची खेळी करत दिल्लीचा सन्मान वाचवला. दिल्लीने 20 षटकात 151 धावा केल्या आणि बंगळुरूने 23 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने 5 सामने खेळले असून पाचही लढतीत त्यांचा पराभव झाला आहे.
 
Published By- Priya Dixit