शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (17:33 IST)

Facebook-Meta : वर नाव बदलण्याची वेळ का आली आहे?

फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली. पण, फेसबुकवर नाव बदलण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी कंपनीनं नाव बदलताना नेमकं काय म्हटलं, ते पाहूया.
 
'या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहेत आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल,' असा विचार कंपनीच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आला होता.
 
फेसबुक एका नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. इंटरनेट क्षेत्रासाठी आणि आमच्या कंपनीसाठी हा एक नवा अध्याय असेल, असं मार्क झकरबर्ग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
"फेसबुकने नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या फेसबुकची ओळख एक सोशल मीडिया कंपनी अशी आहे. पण त्याच वेळी आम्ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक वापरले गेलेलं तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित केलं आहे," असं झकरबर्ग म्हणाले.
 
फेसबुकनं नाव बदललं कारण...
बीबीसीचे उत्तर अमेरिकेचे तंत्रज्ञान प्रतिनिधी जेम्स क्लेटन यांनी फेसबुकच्या या निर्णयाचं केलेलं विश्लेषण...
 
कंपनीला नवं नाव देण्याचा प्रयत्न करणं कठिण आहे. झकरबर्ग यांनी 'मेटा' हे नाव निवडलं आहे, कारण ग्रीकमध्ये त्याचा अर्थ पलीकडे असा होता. शिवाय झकरबर्ग यांना जे ऑनलाईन आभासी जग निर्माण करायचं आहे, त्या 'मेटाव्हर्स'शी मिळतं-जुळतं आहे.
 
पण, सगळ्यांनी फेसबुकला मेटा म्हणण्यात काही अडचणीदेखील असू शकतात.
 
सर्वप्रथम म्हणजे याचा कालावधी पाहता, कंपनीच्या विरोधात समोर येत असलेल्या नकारात्मक बातम्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हा रिब्रँडींगचा प्रकार असल्याचं दिसतं.
 
फेसबुकनं हे त्यांचा ब्रँडचा दर्जा ढासळत असल्यानं केलं असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे. सिनेटर्स याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं आहे, एकाने तर हा मुखवटा धारण करण्याचा प्रकार असल्याचंही म्हटलं.
दुसरी बाब म्हणजे मेटाव्हर्स अद्याप अस्तित्वात नाही. झकरबर्ग यांचं हे दीर्घकालीन व्यासपीठ असून, त्यावर जोर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं तुमच्या मुख्य उत्पादनाशी संबंधित नसलेलं नाव वापरणं हे काहीसं विचित्र आहे. फेसबुकचा जवळपास सर्व नफा हा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील जाहिरातींद्वारे येतो.
 
तिसऱ्या मुद्द्याचा विचार करता, यापूर्वी अशाप्रकारे मोठ्या कंपन्यांनी रिब्रँड करण्याचे करण्याचे प्रयत्न फसले आहे. अगदी गूगलला देखील कोणीच अल्फाबेट म्हणत नाही. त्यांनी स्वतः 2015 मध्ये स्वतःचं तसं रिब्रँडिंग केलं होतं.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चालवणं हे काही आता झकरबर्ग यांचं पॅशन राहिलेलं नाही. त्यांना आभासी जग निर्माण करण्यामध्ये अधिक रस आहे. त्यामुळं मानवी अनुभव पूर्णपणे बदलून जाईल, असं त्यांना वाटतं.
 
त्यांच्यावर सोशल मीडिया कंपन्या चालवण्याच्या पद्धतीवरून सातत्यानं टीका होत असते. त्याचा त्यांना कंटाळा आला असावा. त्यामुळं रस असलेल्या विषयात काम करण्याची संधी कदाचित त्यांना या नव्या रचनेतून उपलब्ध होऊ शकेल.
 
तसा विचार करता ही विभागणी योग्य वाटते. मात्र, लोक याचा किती स्वीकार करतात, हे पाहण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
 
'मेटाव्हर्स' (Metaverse) काय आहे?
पाहणाऱ्या एखाद्याला कदाचित ही VR म्हणजेच व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती वाटू शकेल. पण मेटाव्हर्स हे इंटरनेटचं भविष्य असेल, असं काहींनी वाटतंय.
 
मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल.
 
थोडक्यात सांगायचं झालं तर 1980च्या दशकातल्या बोजड हँडसेट्सची जागा जशी आजच्या आधुनिक स्मार्टफोन्सनी घेतली तसंच काहीसं VR आणि मेटाव्हर्सबद्दल म्हणता येईल.
म्हणजे कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगताशी जोडेल.
 
सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल.
 
या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं बहुतेकांना वाटतंय.