रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 24 डिसेंबर 2023 (10:32 IST)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बॉलिवूड चित्रपटांवर काय परिणाम होईल? वाचा

काळ जितक्या वेगाने बदलतोय तितक्याच वेगाने विज्ञान आणि तंत्रज्ञानही बदलतंय. चित्रपटांमध्येही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय.
बदलत्या काळानुसार भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या वापराबाबत चर्चा होतेय, पण बॉलीवूडमध्ये ‘एआय’चं स्थान काय आहे?
 
‘एआय’ने हॉलिवूडमध्ये आधीच खळबळ माजवली आहे. तिथे पटकथा लेखकांतर्फे संप पुकारण्यात आला परंतु हजारो लोकं काम करत असलेल्या भारतीय चित्रपट उद्योगात या विषयावर फारशी चर्चा होताना दिसत नाही.
 
बॉलीवूडचे काही निर्माते सध्या ‘एआय’चा धोका कमी असल्याचं भासवत आहेत, तर काहींना असं वाटतं की यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
 
प्रख्यात दिग्दर्शक शेखर कपूर यांचा पहिला चित्रपट ‘मासूम’ (1983) मध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे, जी पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करते.
या चित्रपटात विश्वासघात आणि सामाजिक बंधनांशी संबंधित गुंतागुंत संवेदनशीलपणे हाताळण्यात आली आहे. मात्र या भावनिक चित्रपटाच्या पुढील भागासाठी शेखर कपूर यांनी ‘एआय’ टूल चॅटजीपीटी (ChatGPT) चा वापर करण्याचा निर्णय घेतला.
 
शेखर कपूर म्हणतात की, ‘एआय’ टूलने कथानकातील नैतिक गुंतागुंतीचे बारकावे ज्या पद्धतीने समजून घेतले, हे पाहून ते थक्क झाले.
 
ते म्हणतात की, ‘एआय’ने तयार केलेल्या पटकथेमध्ये दाखवण्यात आलंय की मुलगा मोठा झाल्यावर आपल्या वडिलांवर कसा नाराज आहे आणि इथूनच पहिल्या चित्रपटापटातील नातेसंबंधांबाबत एक बदल पाहायला मिळतो.
 
शेखर कपूर म्हणतात की, ‘एआय’मुळे भविष्यात गोंधळ उडण्याची शक्यता आहे कारण पटकथा लेखकांच्या एका गटाला जे काम करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागेल ते काम मशीन लर्निंगद्वारे काही सेकंदात केलं जाईल.
 
‘एआय’वर चर्चा कधी सुरू होईल?
2019 साली प्रसिद्ध झालेल्या ‘डेलॉइट’च्या अहवालानुसार, दरवर्षी तयार होणाऱ्या चित्रपटांचा विचार करता जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग भारतात आहे. यामध्ये सुमारे साडेआठ लाख लोक काम करतात.
 
जसजसे ‘एआय’ टूल्स अधिक प्रगत होत आहेत आणि रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट यांसारख्या लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या डीप फेक व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातल्याचं दिसतंय, हे पाहता त्याच्या वापरावर आर्थिक आणि नैतिक अशा दोन्ही बाजूंनी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
यावर्षी अमेरिकेतील अभिनेते आणि पटकथा लेखकांनी ‘टीव्ही आणि चित्रपट निर्मितीमध्ये ‘एआय’चा वापर’ या मुद्द्याला घेऊन संप पुकारलेला, ज्यामुळे हॉलिवूडचं कामकाज अनेक महिने ठप्प झालेलं.
 
प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर म्हणतात, "भारतात ‘एआय’च्या वापराबाबत अद्याप कोणत्याही ठोस चर्चेला सुरुवात झालेली नाही. पण ‘एआय’ टूल्स अधिक स्मार्ट होत असल्याने आता त्यावर चर्चा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.”
 
"आजची परिस्थिती लक्षात घेता, येत्या तीन ते सहा महिन्यांत ‘एआय’ची वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असेल.”, असंही ते म्हणाले.
 
‘एआय’च्या बाबतीत भारत सध्या कुठे आहे?
‘रेड चिलीज व्हीएफएक्स’ची धुरा सांभाळणारे हॅरी हिंगोरानी आणि केतन यादव म्हणतात की, ‘एआय’ने अद्याप तो पल्ला गाठलेला नाही जिथे बटण दाबल्यावर सर्व काही तयार मिळेल.
 
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने दोन दशकांपूर्वी ‘रेड चिलीज व्हीएफएक्स’ची स्थापना केली होती.
 
यावर्षी या स्टुडिओने शाहरुखच्या 'जवान' आणि 'पठाण' या दोन चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची धुरा सांभाळलेली. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.
 
यादव आणि हिंगोराणी म्हणतात की ते नानाविध कल्पनांसाठी एआय टूल्सचा वापर करतात, परंतु त्यांना असं वाटते की फोर-के रिझोल्यूशनमधील मोशन पिक्चर्ससोबत स्पर्धा करण्यासाठी ‘एआय’ खूप लांबचा पल्ला गाठायचाय.
 
पण दिग्दर्शक गुहान सेनियाप्पन हे या कल्पनेला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. आगामी तमिळ चित्रपट 'वेपन’चं ते दिग्दर्शन करत आहेत, जो भारतातील पहिला चित्रपट असणार आहे ज्यामध्ये अडीच मिनिटांचा प्रसंग पूर्णपणे ‘एआय’च्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
 
ते म्हणतात, "आम्ही एका सुपरह्युमन व्यक्तीरेखेच्या कथेवर काम करतोय ज्यामध्ये खूप साहसी प्रसंग आहेत आहेत आणि मला ही कथा नवीन पद्धतीने मांडायची आहे."
 
त्यामध्ये प्रमुख भूमिका करणारे अभिनेते सत्यराज यांचा तारुण्यातला चेहरा दाखवण्यासाठी त्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आलाय.
 
सेनियाप्पन म्हणतात, “लाइव्ह साहसी दृष्यांसाठी ‘एआय’चा वापर करणे हा अतिशय स्वस्त पर्याय आहे.
 
जाहिरातींसाठी ‘एआय’चा वापर
बॉलीवूड कलाकारांपैकी शाहरूख खान हा 2021 साली ‘एआय’ चाचणी घेणारा पहिला कलाकार होता.
 
शाहरूखने एका जाहिरात मोहिमेसाठी आपला चेहरा आणि आवाज दिला होता. यामध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला.
 
ही मोहीम कॅडबरीने सुरू केली होती. यामध्ये छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी आणि कोरोना काळात त्यांच्या मालाची विक्री वाढवण्यासाठी शाहरुख खानचा आवाज आणि चित्र वापरण्याची सुविधा देण्यात आलेली.
 
ही मोहीम राबवणारी कंपनी ओगिल्वि इंडियाचे सुकेश नायक म्हणतात की, या एकट्या मोहिमेमुळे संपूर्ण देशभरात 3,00,000 नवीन जाहिराती निर्माण झाल्या.
कंपनीने अतिशय बारकाईने शाहरुखच्या टीमसोबत काम केलं आणि त्यांच्या मोहिमेचा वापर करण्यासाठी काही निवडक व्यावसायिकांनाच नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल याची खात्री केली गेली.
 
भारतात ‘एआय’च्या वापराबाबत अद्याप कोणतेही विशिष्ट नियम किंवा कायदे नाहीत.
 
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरने यावर्षीच आपली प्रतिमा, चित्र, नाव आणि आवाज आणि इतर गोष्टींचे संरक्षण करण्यासाठीची कायदेशीर लढाई जिंकली आहे. हा निर्णय उदयोन्मुख आणि इतर कलाकारांसाठीही चांगला असल्याचं मत अनिल कपूर यांनी मांडलं आहे.
 
व्हरायटी मॅगझिनला त्यांनी सांगितलं की, "माझे छायाचित्र, आवाज, मॉर्फिंग, जीआयएफ आणि डीप फेकशी संबंधित प्रश्न असेल, तर मी संबंधितांना थेट न्यायालयाचा आदेश आणि नोटीस पाठवू शकेन आणि त्यांना तो मजकूर काढून टाकावा लागेल."
 
मानव आणि ’एआय’ यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण?
पण ‘एआय’चा आणखी एक पैलू आहे.
 
काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ‘एआय’मुळे चित्रपट निर्मिती संबंधित काही गोष्टी सोप्या आणि जलद होऊ शकतात, तर काहींना असं वाटतं की त्याचे काही धोकेसुद्धा आहेत.
‘एआय’मुळे व्हीएफएक्सच्या काही प्रक्रिया सोप्या बनवण्याच्या शक्यतांबाबत ‘रेड चिलीज व्हीएफएक्स’च्या शिल्पा हिंगोरानी उत्साहित आहेत. त्या म्हणतात की, प्रत्येक फ्रेमनुसार काम करताना ग्राहकांसाठी एक नमुना तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो.
 
"वेळ कमी करण्याच्या कोणत्याही पर्यायामुळे कामाचं सुलभीकरण होईल आणि कमी वेळेत काम होईल.”, असं केतन यादव म्हणतात.
 
'वेपन' या चित्रपटासाठी खूप मोठ्या प्रमाणात ‘एआय’ वर अवलंबून असतानाही सेनियाप्पन म्हणतात की, "जर आमच्याकडे पैसे आणि वेळ असता तर आम्ही जराही विचार न करता थेट लाइव्ह अॅक्शनचा पर्याय निवडला असता."
 
ते म्हणतात, “‘एआय’ खूप सुंदर आहे पण ते लाइव्ह अॅक्शन किंवा अॅनिमेशनसारखं नाही कारण त्यामध्ये माणूसही काम करत नाही किंवा रेखाटन (स्केच) सुद्धा काढलं जात नाही."
 
सुरूवातीच्या काळात ‘चॅटजीपीटी’च्या प्रेमात पडल्यानंतर शेखर कपूर यांनाही असंच वाटलं. ते म्हणाले की, "मी स्वतःला प्रश्न विचारला, की सर्वात जास्त हुशार कोण आहे आणि मला उत्तर मिळालं - ‘मी’ स्वत:.”
 
ते म्हणाले, "एआयला स्वतःची कोणतीही नैतिकता नाही, ते त्याच डेटाचा वापर करतं, जो आपण त्यांना देतो. ते कोणतंही गूढ निर्माण करू शकत नाही किंवा त्याला भीती किंवा प्रेमाची जाणीव होऊ शकत नाही."
 
मात्र, त्यामुळे लोकांसाठी चित्रपट निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया नक्कीच सोपी होऊ शकते, असंही ते म्हणतात.
 
त्यांच्या मते, "जर प्रत्येकाकडे असं साधन असेल तर भेदभाव संपुष्टात येईल आणि प्रत्येकाकडे कथा सांगण्याची क्षमता असेल."

Published By- Priya Dixit