शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (15:09 IST)

कोरोना व्हायरसविषयी YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय

कोरोनाने (corona) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकाराची माहिती प्रसिद्ध होत आहे. याविषयी आता सोशल मीडियापैकी (social media)महत्त्वाचा प्लॅटफॉर्म युट्युबने (YouTube) मोठा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोना संदर्भातील चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
त्याचबरोबर कोरोनाच्या लशीबद्दल चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोनाच्या लशी संदर्भात कडक भूमिका घेतली असून चुकीची माहिती आणि चुकीची माहिती देणारे व्हिडीओ (social media) हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यासंदर्भात  रॉयटर्सला यूट्यूबच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले, कोरोना संदर्भात माहिती देणारे आणि समाजप्रबोधन करणारे व्हिडीओ ठेवले जाणार आहेत. पण गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवणारे व्हिडीओ हटवले जाणार आहेत. चुकीची माहिती देणारे व्हिडीओ याआधीच युट्युबने (YouTube) हटवले आहेत. त्यानंतर आता लसी संदर्भात चुकीची माहिती देणारे आणि गैरसमज पसरवणारे व्हिडीओ देखील हटवले जाणार आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या महितीच्या विपरीत माहिती एखाद्या व्हिडिओमधून दाखवण्यात येत असल्यास त्या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती युट्युबने दिली आहे.
 
युट्युबने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, ही लस लोकांचा बळी घेईल किंवा वंध्यत्वाला कारणीभूत ठरेल, किंवा ही लस घेणाऱ्यांच्या शरीरांत मायक्रो चिप आपोआप बसवली जाईल अशा अफवा काही व्हिडिओंमधून पसरवल्या जात आहेत. यामुळे या व्हिडिओंवर बंदी घालण्यात येणार आहे.