शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (11:06 IST)

तुमच्या हालचालींवर फेसबुकची नजर

आयफोनवरून फेसबुक वापरत असताना मोबाइलची बॅटरी अधिक खर्च होते, असं कधी तुमच्या लक्षात आले आहे का? नसेल तर जरा नीट निरीक्षण करा. अन्य कुठल्याही अँपच्या तुलनेत आयफोनवरून फेसबुक वापरताना बॅटरी अधिक खर्च होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. याचे कारण आहे आयफोनमधील जीपीएस. या जीपीएसच्या साहाय्याने फेसबुक तुमच्या सर्व हालचालींवर नजर ठेवून असल्याचे आढळले आहे.
 
‘तुम्ही सातत्याने फिरस्तीवर असला तर फोनची बॅटरी अधिक खर्च होणे अगदी साहजिक आहे. मात्र, आयफोनमधील जीपीएस सातत्याने त्या उपकरणाची लोकेशन फेसबुकला पाठवत असते. त्यामुळे फेसबुक वापरत नसतानाही फोनची बॅटरी अधिक खर्च होते,’ असे वेब सिक्युरिटी अभ्यासक जोनाथन झियारस्की सांगतात. फेसबुकच्या कोडचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या उपकरणाची लोकेशन सातत्याने ट्रॅक केली जाते. अर्थात फेसबुकला हा अँक्सेस यूजर स्वत:हूनच देतात. कारण, आयफोनवरील फेसबुकच्या सेटिंग्जमध्येच लोकेशन हिस्टरी नावाचा पर्याय असतो. यात अँक्सेससाठी नकळतपणे ‘ऑलवेज’ हा पर्याय दिला गेला की फेसबुक ते उपकरण ज्या ज्या ठिकाणी जाईल, त्या त्या ठिकाणाची हिस्टरी आपोआप तयार करतो. 
 
तुम्ही फेसबुकवर अँक्टिव्ह नसाल तेव्हासुद्धा. मात्र, लोकेशन हिस्टरीमध्ये ‘ऑलवेज’ हा पर्याय ऑफ असेल तर तुमचे लोकेशन ट्रॅक करणे अशक्य होते. आपली प्रत्येक हालचाल टिपली जात आहे, हा विचार अनेक टेक्नोसॅव्ही यूजर्सना अस्वस्थ करणारा आहे. यामुळे आपल्या मुक्त हालचालींवर बंधने येतात, असेही अनेकांना वाटू शकते. त्यासाठी फेसबुकचे लोकेशन सेटिंग ऑफ करणे हा सर्वात सोपा पर्याय आहे. ‘आम्ही आयफोन यूजर्सच्या नकळतपणे कुठलेही ट्रॅकिंग करत नाही. लोकेशन ट्रॅकिंगसाठी यूजर्सनी स्वत:च मान्यता दिली असते. हे त्रासदायक वाटत असेल तर लोकेशन अँक्सेस ऑफ करून यूजर्स हे ट्रॅकिंग बंद करू शकतात,’ असे फेसबुकने स्पष्ट केले आहे.