शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

सावधान! फेसबुकवरील फोटो पोर्न साईटवर...

सोशल मीडिया साईट्सवर सक्रिय असणार्‍या महिलांना सावध होण्याची गरज आहे. कारण फेसबुकवरील महिलांचे फोटो चोरून ते पोर्न साईटवर अपलोड करणारी टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणार्‍या 40 टक्के महिलांचे फोटो पोर्न साईटवर अपलोड केल्याची माहिती केरळच्या एका एथिकल हॅकर्स गुपच्या हाती लागली आहे.
 
‘मेल टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर वॉरियर्सच्या 15 एथिकल हॅकर्सच्या पथकाने 28 डिसेंबर पासून आतापर्यंत एकूण 70 फेसबुक प्रोफाइल हॅक करून त्यांचा पर्दाफाश केला आहे. या प्रोफाइल्सच्या माध्यमातून फेसबुकवर ऍक्टिव्ह असणार्‍या सुंदर महिला आणि तरुणींचे फोटो कॉपी करून त्यांना मार्फ करण्याचे काम केले जात होते. त्यानंतर हे फोटो पोर्नसाईटच्या ऍडमिनला पाठविले जातात. नंतर या फोटोमध्ये थोडा बदल करून ते पोर्नसाईटवर अपलोड केले जातात. त्याचबरोबर तरुणींसोबत अश्लील चॅट करून त्यांना गंडा घालणार्‍या प्रोफाइलही या ग्रुपने हॅक केल्या आहेत.
 
महिला आणि मुलींनी स्वतः खबरदारी घेण्याची गरज असल्याचे एथिकल हॅकर्स ग्रुपच्या सदस्याने सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनोळखी लोकांच्या रीक्वेस्ट स्वीकारू नये, फेसबुकवरील प्रायव्हसी नावाच्या ऑप्शनचा वापर करावा. यामुळे अनोळखी व विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना तुमच्या प्रोफाइल किंवा अल्बमपर्यंत पोहचता येणार नाही. त्याचबरोबर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत चॅट करत असेल आणि त्याचा मजकूर जर अश्लील तसेच आक्षेपार्ह असेल तर तात्काळ पोलिसांना संपर्क साधा.