शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

कहाणी गोपद्मांची

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी, र्स्वलोगीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसल्या आहेत, ताशे, मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तों तंबोर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या भेर्‍या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हांकारा, पिटा रे दांडोरा, गांवात कोणी वाणवशावांचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तांबोर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा!

असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनांत भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं कांही वाणवसा केला नसेल. तेव्हां ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे! आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्मं देवाच्या द्वारीं काढावींत, तित‍कींच ब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाचे पारीं, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा.

  WD
याप्रमाणें पांच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळीं कुंवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसर्‍या वर्षी चुडा भरावा, तिसर्‍या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उंसांची मोळी द्यावी, पांचव्या वर्षी चोळी-परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणीं येऊन बसले.

नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढें सभेंत कळलं, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा वसला आहे. पुढं येतां येतां गांवाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हां तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोर्‍याच्यातारा जोडल्या, मृदुंगाच्या भेर्‍या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसा ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं, तुमचं आमचं टळो. ही साठी उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.