1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:40 IST)

निवडणूक काळात एक्सिट पोल दाखवले तर कारवाई - निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. असे समोर आल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई होणार आहे.
 
देशात सध्या लोकसभा निवडणुकांबरोबरच काही राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दि. 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी दि. 19 मे 2019 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण करण्यास तसेच वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
 
तसेच संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनिअन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत सूचित करण्यात आले आहे.