रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. निवडणूक
  3. लोकसभा निवडणूक
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (12:18 IST)

दिंडोरी लोकसभा: राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारांचाच भाजपच्या तिकिटावर विजय, कसा आहे हा मतदारसंघ?

election
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे याठिकाणच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडं केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
 
हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तीन निवडणुकांत भाजपचेच खासदार निवडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण तसं असलं तरी निवडून आलेले उमेदवार आयात केलेले किंवा दुसऱ्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातले होते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.
 
भाजपकडून या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण खासदार बनले होते. पण गेल्यावळी त्यांना धक्का देत भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यांचा विजयही झाला आणि त्या मंत्रीही बनल्या.
 
या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मतांच्या राजकारणात डाव्या पक्षांचाही याठिकाणी चांगला हातखंडा असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं तोही मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
 
मतदारसंघातील स्थितीचा विचार करता सोयीसुविधांच्या मुद्द्याबरोबरच आरोग्याचा आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे कांद्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
 
मतदारसंघाचा इतिहास
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली. मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा यात समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्यानं नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश करण्यात आला आहे.
 
2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्ममध्ये याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचाच विजय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
पण यात आणखी एक महत्त्वाची बाब जे दोन खासदार इथून निवडून गेले आहेत, ते दोन्हीही मूळचे भाजप नेते नव्हते. त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता.
 
पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपशिवाय शिवसेनेची साथ याचाही त्यांना फायदा झाला. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला.
 
नंतर डॉ. भारती पवार भाजपकडून मैदानात उतरल्या आणि विजयी झाल्या. एवढंच नाही तर त्यांना 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दिली.
 
त्यामुळंच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपचा गड असंही म्हटलं जातं. पण याठिकाणी असलेली राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या बळाकडंही दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही.
 
चव्हाण यांना 2019 मध्ये धक्का
हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार बनले. 2019 मध्येही ते विजयी हॅटट्रिक करणार असं वाटत असतानाच मोदी-शहांच्या धक्कातंत्राचा त्यांना फटका बसला.
 
भाजपनं हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारीच दिली नाही. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपनं तिकिट दिलं.
विशेष म्हणजे चव्हाण यांनी याच भारती पवार यांना 2014 मध्ये पराभूत केलं होतं. पण भाजपनं त्यांना उमेदवारी देत चव्हाण यांना घरी बसवलं.
 
डॉ. भारती पवार यांचा या निवडणुकीत सुमारे दोन लाख मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीचे धनराज महाले हे या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होते.
 
2019 नंतर काय घडले?
डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यामुळं सलग तीन टर्म इथं भाजपचा खासदार असला तरी गेल्या चार वर्षांत बरंच काही बदललं आहे. प्रामुख्यानं राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलेली आहेत.
 
विधानसभा मतदारसंघाचा विचार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं. दिंडोरी, कळवण, निफाड आणि येवला या चार ठिकाणी राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे चारही आमदार अजित पवारांच्या गटात आहेत.
 
त्यामुळं आता शरद पवार गटाकडून या मतदारसंघातील नव्यानं रणनिती आखली जाईल. त्यात गेल्यावेळी माकपला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळं शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि माकपसह विरोधत एकत्र आले तर तेही या मतदारसंघात आव्हान उभं करू शकतात.
चार वर्षांपासून सगळ्याच पक्षांनी केलेली तयारी ही फारशी कामी येईल अशी शक्यता सध्या तरी बदललेल्या राजकीय समीकरणांवरून वाटत नाही.
 
त्यात शरद पवार शेतकऱ्यांसाठी घेत असलेल्या भूमिकेमुळं त्यांना पाठिंबा मिळेल असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळं उमेदवाराची निवड हा या मतदारसंघात महत्त्वाचा विषय ठरू शकतो.
 
पण त्या सर्वाच्या आधी युती आणि आघाड्यांची स्थिती आणि त्यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच पाहता हा मतदारसंघ कुठल्या गटाकडे किंवा पक्षाकडं जाणार हेही पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.
 
मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचा विचार करता शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.
 
त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. काही पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही येथील निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
 
 
पण सर्वांत कळीचा मुद्दा कांद्याचा ठरू शकतो. सरकारनं कांद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शेतकरी अनेकदा आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. कांद्यावर लावलेली निर्यातबंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.
 
माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांची भूमिकाही या निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरू शकते. सहा वेळा आमदार राहिलेल्या गावीत यांना सामान्य आदिवासी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे. त्यामुळं हाही महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो.
 
एकूणच राष्ट्रवादीचं वर्चस्व पण भाजपच्या ताब्यात अशा दोन बाजू असलेल्या या दिंडोरी मतदारसंघामध्ये 2024 च्या निवडणुकीत नेमकं काय घडणार याकडं सर्वांचच लक्ष लागलेलं असणार आहे.
 
Published By- Priya Dixit