शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

सेफॉलॉजी' निवडणूक अभ्यासाचे शास्त्र

जितेंद्र झंवर

लोकशाहीत निवडणुकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूक म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा निवडणुकीतील 543 मतदार संघात देशातील हजारपेक्षा जास्त लहान, मोठे पक्ष सहभागी होतात. या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे प्रश्न महत्वाचे असतात. कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, कोणाचे सरकार सत्तेवर येईल, याबद्दल सर्वांना उत्सुकता असते. बदलत्या काळात निवडणुकीचे अंदाज व्यक्त करण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. या शास्त्राला 'सेफोलॉजी' म्हणतात. ओपिनियन पोल्स, एक्सिट पोल्स हे त्याचेच भाग आहेत.

WDWD
राजकीय निवडणुका आणि त्या अनुषंगाने मतदारांचा मतप्रवाहाचा तैलनिक वेध घेवून निवडणूक विश्लेषन करण्याचे शास्त्र म्हणजे 'सेफॉलॉजी' आहे. सेफोलॉजीमध्ये मानसशास्त्र विशेषत: सामाजिक मानसशास्त्राचा वेध घेतला जातो. त्यातील जनमत पाहणी (सर्व्हेक्षण) नमुनावर (सॅम्पल) अवलंबून असते. या सॅम्पलच्या माध्यमातून लोकांची मनोवृत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. सॅम्पलद्वारे जमा होणार्‍या माहितीचे पृथ:करण अथवा अन्वयार्थ लावूनच पाहणीचे निष्कर्ष जाहीर केले जातात. यामुळे या शास्त्रात डेटा गोळा करण्यास खूप महत्व आहे. निवडणूक निकालाची भविष्यवाणी करण्यासाठी योग्य व अचूक माहिती गोळा करुनच ओपिनियन पोलचे निष्कर्ष जाहीर केले जातात. लोकांच्या सांगण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. यामुळे वैज्ञानिक द्दष्टिने निष्कर्ष पडताळून अंदाजाचा जवळपास पोहचता येते.

सेफॉलोजीच्या इतिहासात डोकविल्यास त्याची सुरवात अमेरिकेत 1935 मध्ये झाली. जार्ज गॅलप याने या शास्त्राचा शोध लावला. त्यानंतर या शास्त्राचा प्रचंड विकास झाला. अमेरिकेत जनमत पाहणी करणार्‍या अनेक संघटना उदयास आल्या. भारतातही सेफोलॉजीचा वापर आता मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात हे शास्त्र विकसित करण्याचे श्रेय डॉ.प्रणय रॉय आणि योगेंद्र यादव यांना दिले जाते. 1989 मध्ये प्रणय रॉय यांनी इंडिया टुडेसाठी पहिले व्यावसायिक सर्व्हेक्षण केले. त्यावेळी निवडणुकीपूर्वी, निवडणुकी दरम्यान आणि मतदानानंतर संख्या एकत्र करुन निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते.

WDWD
भारत हा अमेरिकेसारखा एकजिनसी देश नाही. भारतातील सामाजिक, मानसशास्त्री, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती भिन्न आहे. इथे अनेक धर्म, पंथ, विविध जाती, पोटजाती आणि परस्पर भिन्न जीवन जगणारे मतदार आहे. तसेच स्थानिक, व्यक्तीगत आणि प्रादेशिक हितसंबंध वेगवेगळे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 543 मतदार संघ, प्रत्येक मतदार संघात 20 लाखाचा जवळपास मतदार, त्यातून एका लाखास 125 मतदारांची निवड करणे हे जिकारीचे काम आहे. भारतात आता आघाड्याचा सरकार येवू लागले आहे. यामुळे मतदार विशिष्ट दुष्टकोन ठेवून मतदान करतो, असे नाही. त्यातच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी लढती बहुरंगी होतात. तसेच बोगस मतदान, पर्यवर्तनीय मन याचाही परिणाम निष्कर्षांवर होतो. भारतात कमी टक्के मिळालेल्या पक्षाला जास्त जागा मिळू शकतात. अधिक टक्के मते मिळवूनही कमी जागा मिळू शकतात. यामुळे मिळालेल्या जागांनाच महत्व असते. या सर्वांचा परिणाम निष्कर्ष चुकण्यावर होतो. हे टाळण्यासाठी संभाव्य मतदारांचे मत जाणून घेण्यासाठी करण्यात येणारी प्रश्नावली अचूक तयार करावी लागते. लोकसभा निवडणुकीचे सॅम्पल करतांना प्रदेश किंवा विभागानुसार वेगवेगळी प्रश्नावली तयार करावी लागते. तसेच मतांची टक्केवारी हा घटकही सेफोलॉजीच्या निष्कर्षावर परिणाम करतो. निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरतो, हे ही सेफोलॉजीत महत्वाचे असते.

सेफोलॉजी हे विज्ञान आणि कला या दोघांचे मिश्रण आहे. विज्ञानाचा अभ्यास करता येतो तर कला अनुभवाने विकसित करावी लागते. या विषयाचा तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीला मानसशास्त्र आणि राजकारण या दोघांचा चांगला अभ्यास हवा. तसेच प्रत्येक बाबींवर स्पष्टपणा व खरेपणा महत्वाचा असतो. नाहीतर निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते.

नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच ओपिनियन पोलचे निष्कर्ष बराक ओबामा यांच्या बाजूने येत होते. शेवटी राष्ट्रध्यक्षपदी त्यांचीच निवड होवून इतिहास निर्माण झाला. भारतात विविध टप्यांमध्ये मतदान होत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या 48 तास पूर्वी ते शेवटच्या टप्याचे मतदान होईपर्यंत ओपिनियन पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी घातली आहे. यावरुन एक्झीट पोल किती महत्वाचे ठरते, हे दिसून येते. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पूर्वीचे सर्वच ओपिनियन पोल त्रिशंकू लोकसभा दर्शवित आहेत. आता मतदानानंतरच्या ओपिनियन पोलमध्ये त्यात काही बदल होईल का? हे येत्या 13 मे रोजीच स्पष्ट होईल.