शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: लाहोर , मंगळवार, 17 एप्रिल 2018 (08:55 IST)

तृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु

तृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला येत नाहीत. शिक्षण आणि योग्य ज्ञानाच्या अभावी आधीच मागे पडलेले हे लोक समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. मात्र पाकिस्तानातील नव्या प्रयोगाने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.
 
पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशन (इएफएफ)चे कार्यकारी संचालक मोईज्जाह तारिक यांनी या उद्घाटनानंतर बोलताना सांगितले, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्याआधारीत प्रशिक्षणही या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी फॅशन डिझायनिंग, सौंदर्यशास्त्र, एम्ब्रॉयडरी, शिवणकाम, पाकशास्त्र, ग्राफिक डिझायनिंग अशा विविध विषयांमध्ये रुची असल्याचे सांगितले होते, त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
 
या शाळेचे मालक असिफ शहजाद म्हणाले, या शाळेत तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 2016 साली इंडोनेशियात तृतीयपंथीयांच्या शाळेला बॉम्बने उडवून देण्यात आले. त्यामुळे मला अतिशय वाईट वाटले. मुस्लीम देशांमध्ये तृतीयपंथीयांसाठी असणारी ती एकमेव शाळा होती. त्यानंतर आम्ही तृतीयपंथीयांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला.
 
या शैक्षणिक संस्थेमधून मुलांना डिप्लोमाचे शिक्षण घेता येणार आहे. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना नोकरी मिळवणे शक्य होणार आहे किंवा त्यांना व्यवसाय करायचा असेल तर एनजीओची मदत मिळणार आहे. तसेच या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसेल. पाकिस्तानमध्ये 2017 सालच्या आकडेवारीनुसार 10,418 तृतीयपंथी आहेत असे पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने स्पष्ट केले होते. त्यापैकी पंजाब प्रांतामध्ये 64.4 टक्के म्हणजे 6,709 तृतीयपंथी असल्याचे त्यात नमूद केले होते.