रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (13:42 IST)

शौर्य पदके किती यावर छप्पन इंच छातीचे मोजमाप ठरते – उद्धव ठाकरे

‘मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड’ मुळे पोलीसांचे शौर्य जगभर पोहोचेल – उद्धव ठाकरे
 
भुजबळांचे प्राण वाचवले म्हणून मी निलंबित झालो होतो. पण, बाळासाहेबांमुळे... – इसाक बागवान 
 
शरद पवार यांच्याआधीपासून इसाक बागवान यांच्यामुळे दिल्लीला बारामती माहित झाली. – संजय राऊत 
 
काश मै बागवान साहब से पहले मिलता.... – नवाजुद्दीन सिद्दीकी 
 
चित्रपटांत गुन्हेगारीचे होणारे उदात्तीकरण चिंताजनक – उज्ज्वल निकम 
 
इसाक बागवान लिखित ‘मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड’ प्रकाशित
 
“५६ इंचाची छाती म्हटल्यावर सगळय़ांना हसू का येते तेच कळत नाही. त्यात हसण्यासारखे काय आहे? त्या ५६ इंच छातीचे मोजमाप त्या छातीवर किती शौर्यपदके आहेत त्यावर ठरते. इसाक बागवान यांच्या सारख्या पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल तीन वेळा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकं मिळाली. बागवानांच्या छप्पन इंच छातीवरची ती तीन शौर्यपदके मुंबई पोलीस दलाच्या शौर्याची प्रतिकं आहेत. चांगल्याला चांगले म्हणणे आणि कर्तव्यदक्ष पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाणे, ही आमची परंपरा आहे. हे पुस्तक सगळ्यांनी तर वाचायलाच हवे; पण जो पोलिसात नवीन भरती होतोय त्याने अवश्य वाचायला हवे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या पुस्तकाच्या रूपाने माझ्या मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचा झेंडा जगाच्या नकाशावर डौलाने फडकणार आहे.”अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इसाक बागवान यांच्या शौर्याचा आणि मुंबई पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा केला.
भुजबळांचे प्राण वाचवले म्हणून मी निलंबित झालो होतो. पण, बाळासाहेबांमुळे... – इसाक बागवान
“बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब हे माझ्यासाठी उर्जास्रोत आणि प्रेरणास्थान आहेत. बाळासाहेबांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. बाळासाहेब पाठीशी खंबीरपणे उभे राहीले म्हणून नाहीतर मी पोलीस दलातून निलंबित झालो असतो. छगन भुजबळ विरोधीपक्ष नेता असताना यांच्या घरावर सुमारे ३०० शिवसैनिकांनी हल्ला केला होता.  त्या वेळी मी मंत्रालयात डय़ुटीवर होतो. आम्ही जीवची बाजी लावून तो हल्ला परतवून लावला. त्यामुळे भुजबळांचे प्राण वाचवले, मात्र तरीही आम्ही कर्तव्यात कसूर केली, असा ठपका ठेवून आम्हा अधिकाऱ्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर माझे बंधु संजय राऊत यांनी मला बाळासाहेबांकडे नेले. बाळासाहेबांना आमची सर्व हकीकत शांतपणे ऐकून घेतली. त्यांनी पंताना म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना फोन लावला. ते फोनवर आल्यावर बाळासाहेब म्हणाले, तुमचे सरकार गेले ख़ड्ड्यात… या पोरांची काय चूक आहे? त्यांनी त्यांची ड्युटी इमानदारीने केली आहे. त्यांना परत ड्युटीवर घ्या. बाळासाहेबांचे ते बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्यानंतर काही दिवसांतच सर्व आरोप मागे घेऊन मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सन्मानाने नोकरीवर रुजू करून घेण्यात आले.”पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना इसाक बागवान भावुक झाले.
शरद पवार यांच्याआधीपासून इसाक बागवाना यांच्यामुळे दिल्लीला बारामती माहित झाली. – संजय राऊत
बारामती हे नाव शरद पवार आणि इसाक बागवान यांच्यामुळे ओळखले जाते. पण, बारामतीच्या शरद पवारांचे नाव दिल्लीला माहीत नव्हते त्या आधीपासून बारामतीचे इसाक बागवान दिल्लीत ओळखले जाऊ लागले. कारण बागवान यांनी दाऊदचा भाऊ साबीर खून खटल्यातील आरोपीवर हल्ला करण्यासाठी दाऊदने पाठवलेल्या हल्लेखोराला भरकोर्टात गोळ्या झाडल्या होत्या. त्या एन्काऊंटरची बातमी तेव्हा दिल्लीच्या सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकली होती. तेव्हा बारामतीचे इसाक बागवान दिल्लीत चर्चिले गेले., अशी आठवण खा. संजय राऊत यांनी सांगितली.  
काश मै बागवान साहब से पहले मिलता.... – नवाजुद्दीन सिद्दीकी
चित्रपटात मी अनेक भूमिका केल्या आहेत. कधी गँगस्टर तर कधी पोलीस अधिकारी. पण कहानी, रईस या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करताना मला खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्यासोबत काही दिवस घालवावेत असे वाटायचे. पण, ते शक्य झाले नाही. जर तसं झालं असतं तर मला त्या भूमिका अधिक सक्षमपणे वठवता आल्या असत्या. पण, आज माझी इसाक बागवान नावाच्या सुपरकॉपशी ओळख झालीय. इथून पुढे मी त्यांच्याशी सल्लामसलत करत जाईन, असे उद्गार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी काढले. 
चित्रपटांत गुन्हेगारीचे होणारे उदात्तीकरण चिंताजनक – उज्ज्वल निकम
हल्ली चित्रपटांत गुन्हेगारांना हिरो केले जातंय. खरी वस्तुस्थिती लपवली जाते. पोलीसांचे शौर्य दडपले जाते आणि गुन्हेगारांचे उदात्तीकरण केले जातेय. पण, ‘मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड’म्हणजे खऱ्या हिरोचे पुस्तक आहे. हे पुस्तक मुंबई पोलीस दलाच्या शौर्याचा महत्त्वाचा दस्तावेज आहे, अशा भावना विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या.
 
इसाक बागवान यांच्या कडून माहिती घेऊन गुन्हेगारीविश्वावर अनेक पुस्तके आणि चित्रपट प्रकाशित झाले. मन्यासुर्वेच्या एनकाउंटरवर शुटआऊट अॅट वडाळा हा चित्रपट आला. पण, बागवान यांनी दिलेल्या माहितीची मोडतोड करून गु्न्हेगारांचे उदात्तीकरण केले जात असल्याने बागवान यांनाच पुस्तक लिहावे लागले. जेणे करून सत्य जनतेसमोर येईल. हा या पुस्तकाचा हेतू आहे. 
इसाक बागवान यांच्या ‘मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड’ह्या इंग्रजी पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. वांद्रय़ाच्या रंगशारदा सभागृहात रंगलेल्या ह्या दिमाखदार सोहळ्याची सुरूवात लेखक व सहायक पोलीस आयुक्त(निवृत्त) इसाक बागवान यांच्या जीवनावरील दृकश्राव्य चित्रफितीने झाली. या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद, पत्रकार हुसैन जैदी, अभिनेते रझा मुराद, पेंग्विन पब्लिकेशनच्या ऐश्वर्या मिली आदी उपस्थित होते.